ठाणे: आर.टी. ई 25% प्रवेशाची (RTE Entrance) तिसरी प्रतीक्षा यादी (Waiting List Of RTE) नुकतीच जाहीर झाली. या प्रतीक्षा यादीनुसार ठाणे जिल्ह्यातील एकूण 249 बालकांची प्रवेशासाठी निवड झाली आहे. निवड झालेल्या बालकांचे 13 जुलै 2022 पर्यंत प्रवेश निश्चित करण्याचे आवाहन ठाणे जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षणाधिकारी डॉ. भाऊसाहेब कारेकर यांनी केले आहे. प्रतीक्षा यादी मधील बालकांचे प्रवेश घेण्याकरता पालकांनी अलॉटमेंट लेटरची (Allotment Letter) प्रिंट आणि आवश्यक कागदपत्रे घेऊन संबंधित तालुका महानगरपालिकेच्या पडताळणी केंद्रावर जावे आणि पडताळणी समितीकडून आपला प्रवेश निश्चित करावा. तसेच प्रवेश निश्चित झाल्याची पावती व कागदपत्रे शाळेत जमा करून प्रवेश निश्चित करावा.
प्रवेश पात्र बालकांच्या पालकांना अर्ज करताना नोंदवलेल्या मोबाईलवर एसएमएस प्राप्त झाले असतील, परंतु फक्त एसएमएस वर अवलंबून न राहता आरटीई पोर्टलवरील अर्जाची स्थिती या टॅबवर अर्ज क्रमांक लिहून आपल्या पाल्याची निवड झाली अथवा नाही याची खात्री करून घ्यावी. प्रवेश प्रक्रियेतील अडचणीसाठी संबंधित तालुका मनपा कार्यक्षेत्रातील सक्षम अधिकाऱ्यांशी संपर्क साधावा.
वंचित गटातील व दुर्बल घटकातील प्राथमिक स्तरावरील पहिली ते आठवीपर्यंतचे शालेय शिक्षण विनामूल्य मिळावे यासाठी राज्य शासनामार्फत दरवर्षी आर टी ई ( मोफत व सक्तीचा शिक्षण हक्क कायदा) अंतर्गत २५% मोफत ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येते. या प्रवेश प्रक्रिया अंतर्गत सन 2022-23 करीता, ठाणे जिल्ह्यातील पाच तालुके व सहा मनपा कार्यक्षेत्रात ही प्रवेश प्रक्रिया राबवली जात आहे.