मुंबई : आधुनिक महाराष्ट्राच्या विचारांची दिशा ठरवण्याचं काम महात्मा फुले (Mahatma Phule), राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी केलं. या तीन महापुरुषांप्रमाणंच बडोद्याचे महाराजा सयाजीराव गायकवाड (Sayajirao Gaikwad) यांचं देखील कार्य राहिलं. सयाजीराव गायकवाड हे बडोदा संस्थानचे राजे असले तरी त्यांचं मूळगाव आणि जन्मगाव हे महाराष्ट्रातील आहे. महाराष्ट्रामध्ये त्याचं बालपण गेलं. सयाजीराव गायकवाड यांचं मूळगाव महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील हवेली तालुक्यातील भरे हे गाव होय. गायकवाड घराण्याचे मूळ पुरुष नंदाजी हे हवेली तालुक्यातील भरे गावचे होते. नंदाजी यांचा मुलगा दमाजीराव पेशव्यांच्या सैन्यात होते. पानिपतच्या लढाईनंतर गायकवाड घरण्यातील एक भाऊ बडोद्यात तर एक भाऊ नाशिक जिल्ह्यात आले. त्यांनी शाहू महाराजांसाठीही अनेक लढल्या होत्या. सयाजीराव महाराजांचा जन्म 11 मार्च 1863 रोजी नाशिक (Nashik) जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातील कळवणा येथे झाला. वयाच्या बाराव्या वर्षापर्यंत ते कळवणा येथे वास्तव्यास होते.
खंडेराव गायकवाड यांचं बडोद्यात 1870 मध्ये अचानक निधन झालं. त्यांच्यानंतर त्यांचे छोटे बंधू मल्हारराव गायकवाड गादीवर आले पण त्यांना राज्यकारभार व्यवस्थित पाहता न आल्यानं पायउतार व्हावं लागलं. एका प्रकरणात मल्हारराव गायकवाड यांना इग्रंजांकडून अटक करण्यात आली. यानंतर खंडेराव गायकवाड यांच्या पत्नी महाराणी जमनाबाई यांना दत्तकपुत्र घेण्याची परवानगी देण्या आली. कळवणा येथून पाच मुलं बडोद्याला नेण्यात आली होती त्यातून सयाजीराव गायकवाड यांची वारस म्हणून निवड करण्यात आली.
1881 मध्ये सयाजीराव गायकवाड यांचं शिक्षण पूर्ण झालं होतं. 1881 साली राज्यकारभार महाराजांना मिळावा म्हणून जमनाबाई यांनी यांनी इंग्रजांची परवानगी घेतली. आणि 28 डिसेंबर 1881 रोजी सयाजीराव गायकवाड यांनी राज्यकारभाराची सूत्रं स्वीकारली. 6 जानेवारी 1880 रोजी तंजावर घराण्याशी संबंधित मोहिते कुळातील प्रिन्सेस लक्ष्मीबाई यांच्याशी त्यांचा विवाह झाला. लक्ष्मीबाई यांचं नाव बदलून चिमणाबाई असं करण्यात आलं होतं. पहिल्या पत्नीचा मृत्यू झाल्यानंतर वडिलधाऱ्या व्यक्तींच्या सांगण्यावरुन सयाजीराव गायकवाड यांनी घाडगे घराण्यातील राजकन्येशी दुसरा विवाह केला. हा विवाह 28 डिसेंबर 1885 रोजी झाला होता.
सयाजीराव गायकवाड यांनी बडोदा संस्थानात अनेक सुधारणा केल्या त्यापूर्वी राज्य कारभार सुधारणेवर त्यांनी भर दिला. लॉ कमिटी नेमली, अधिकारांचं विकेंद्रीकरण करण्यासाठी धारासभा नेमण्याचं काम त्यांनी केलं. जात धर्म पंथ देश वगैरे कोणत्याही प्रकराचा भेदभाव न करता अधिकाऱ्यांची नेमणूक करण्यावर त्यांचा भर होता. सयाजीराव गायकवाड वेळेच्या बाबतीतही काटोकोर होते. सरकारनं केलेले नियम जनतेला कळावेत आणि नियमांविषयी गैरसमज होऊ नयेत म्हणून त्यांनी आज्ञापत्रिका नावाचं साप्ताहिक सुरु केलं. रयतेस तात्काळ आणि योग्य न्याय मिळावा अशी भूमिका सयाजीराव गायकवाड यांची होती.
सयाजीराव महाराजंनी बडोदा संस्थाना अनेक सुधारणा केल्या. सामाजिक सुधारणा सहजासहजी होत नसतील तर कायदे बनवले. बालविवाह, गोषाबंदी कायदे केले. हे कायदे करताना त्यांनी जनमत देखील आजमवलं होतं, असं संशोधक सागंतात. बालविवाहबंदी, घटस्फोट कायदा, दत्तक घेण्याविषयीचा कायदा, मुलींना वडिलांच्या मिळकतीतील संपत्ती वर हक्क कायदा, बालसंरक्षक कायदा, सोळा वर्षाखालील मुलांना व्यसन बंदी, बारा वर्षाखालील मुलांना गिरणीत आणि कारखान्यात नोकरीला न ठेवणे, ज्ञातित्रासनिवारक कायदा, पुरोहिताचा कायदा, जैनधर्मींयांचा दीक्षा कायदा, मुल्सिमांसाठी वफ्फ कायदा असे अनेक कायदे सयाजीराव गायकवाड यांनी केले होते,
सयाजीराव गायकवाड यांच्या काळात बडोदा संस्थानामधील लोकांचं उत्पन्नाचं साधन शेती होतं. महाराजांनी शेतीच्या विकासाला प्राधान्य देत आधुनिकता आणण्याचं काम केलं. सयाजीराव गायकवाड हे शेतकऱ्याचा मुलगा असल्यानं त्यांच्या मना शेतकऱ्यांविषयी आपुलकीची भावना होती. विहिरी खोदणे, जलसिंचनाची सोय करणे, शेतीतील संशोधनासाठी शिष्यवृत्ती देणे, लोकोपयोगी कामं सयाजीराव गायकवाड यांनी केली. बँक ऑफ बडोदाची स्थापना सयाजीराव गायकवाड यांनी केल्याचं काही संशोधकांचं मत आहे.
महाराजा सयाजीराव गायकवाड यांनी प्राथमिक शिक्षणानंतर स्त्री शिक्षण संस्थानात सुरु करण्यास प्राधान्य दिलं.फिरतं वाचनालयं हे सयाजीराव गायकवाड यांच्या राज्याचं वैभव होतं. सेंट्रल लायब्ररी गावोगावी पेट्यातून पुस्तकं पाठवत असे. फिरत्या वाचनालयांच्या पेट्यांना सयाजी वैभव नाव देण्यात आलं होतं. सयाजीराव गायकवाड यांनी 1882 मध्ये बडोद्यात महाराणी जमनाबाईसाहेब यांच्या नावानं मोठा दवाखाना उघडला होता.
महात्मा फुले यांचे मित्र रामचंद्र धामणस्कर हे बडोद्यात कार्यरत होते. धामणस्कर यांच्या माध्यमातून महात्मा फुले यांना सयाजीराव गायकवाड यांनी बोलावून घेतलं. शेतकऱ्यांचा आसूडचे हस्तलिखित ऐकलं आणि ग्रंथ प्रकाशित करण्यासाठी आर्थिक मदत केली. सयाजीराव गायगवाड यांच्या वयाच्या एकाहत्तरीनिमित्त महाराष्ट्रात सत्कार समारंभ झाले. त्यांनी कर्मवारी भाऊराव पाटील यांच्या वसतिगृहाला भेट दिली. सयाजीराव गायकवाड यांनी यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना शिक्षणासाठी सयाजीराव गायकवाड यांनी मदत केली.सयाजीराव गायकवाड यांनी जनेतला अधिकार दिला. नगरपालिका, महापालिकांची स्थापना त्यांनी केली. सयाजीराव गायकवाड यांचा अखेर 6 फेब्रुवारी 1939 रोजी त्यांचा मृत्यू झाला. गायकवाड महाराजांच्या निधनानंतर बाबासाहेब आंबेडकर यांनी लेख लिहिला. “श्री.सयाजीराव महाजारांचे निधन ही माझी वैयक्तिक फार मोठी हानी झील आहे. त्यांचे उपकार मी केव्हाही विसरणार नाही. मला त्यांनी जे शिक्षण दिले त्यामुळे आजची योग्यता मला प्राप्त झाली. अस्पृश्य जातींवर त्यांचे फार मोठे उपकार झाले आहेत. त्यांच्या इतके अस्पृश्य जातींसाठी कोणीही कार्य केले नाही. ते मोठे समाजसुधारक होते” असं बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलं होतं. सयाजीराव गायकवाड महाराज यांना स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन.. !
इतर बातम्या
Jio Network Down मुळे वैतागलेल्या ग्राहकांना Reliance चे ‘अमर्याद’ गिफ्ट, किती दिवसांसाठी मोफत डाटा?