मुंबई : छत्रपती शिवाजी महाराज (Shivaji Maharaj) यांनी स्वराज्य स्थापन करुन इथं रयतेचं राज्य निर्माण केलं. स्वराज्याचं स्वप्न शिवाजी महाराजांचे वडील शहाजीराजे (Shahajiraje) भोसले आणि राजमाता जिजाऊ यांनी पाहिलं होतं. शहाजीराजे आणि राजमाता जिजाऊ (Rajmata Jijau) यांनी जे स्वप्न पाहिलं होतं ते शिवाजी महाराजांनी अठरा पगड जातीच्या मावळ्यांना एकत्र करुन पूर्ण केलं आणि देशाच्या इतिहासात स्वराज्याची नोंद अभिमानानं घेतली जाऊ लागली. शहाजीराजे यांचे स्वराज्य निर्मितीत मोठे योगदान राहिलेले आहे. शिवाजी महाराज यांच्यावर जिजामाता यांनी बालपणी संस्कार दिले. तर, शहाजी महाराज यांनी शिवरायांना स्वराज्य निर्मितीसाठी लागणारं धाडस आणि पाठबळ दिलं. स्वराज्य निर्मितीसाठी शिवरायांना शहाजी महाराजांकडूनच प्रेरणा मिळालेली होती.
शहाजारीजे यांच्या वडिलांचं नाव मालोजीराजे भोसले होते. मालोजीराजे यांना दोन मुलगे होते. शहाजीराजे यांचा जन्म 18 मार्च 1594 तर शरिफजी यांचा जन्म 1597 ला वेरुळ येथे झाला. शहाजीराजे यांचा विवाह लखोजीराव जाधव यांच्या कन्या जिजाऊ यांच्याशी झाला.
शहाजीराजे यांनी त्यांच्या कारकीर्दीत निजामशाही, आदिलशाही आणि मोघलांकडे काही दिवस काम केलं. शहाजीराजे यांनी आदिलशाही तसेच निजामाकडे सुभेदार म्हणून मोठे पराक्रम केले. त्यांनी पुण्यासारख्या भागात मराठी जनतेला आपला पराक्रम तर दाखवला होताच पण त्याचबरोबर कर्नाटकातदेखील त्यांनी आपले कर्तृत्व गाजवले होते. 1636 मध्ये शहाजीराजे यांनी पेमगिरी किल्ला शहाजहान बादशहाच्या स्वाधीन केला. यानंतर आदिलशहा आणि शहाजाहान बादशहा यांच्यात तह झाला. भीमेपलीकडील निजामशहाचा मुलूख मोगलांस तर अलीकडील आदिलशहास द्यावा असे ठरला. त्याचबरोबर आदिलशहाने शहाजीराजांना जहागीर द्यावी असेही ठरले.
फेब्रुवारी 1637 मध्ये शहाजीराजे हे पत्नी जिजाबाई, मुलगा संभाजी व बाल शिवाजीसह विजापूरला गेले. येथे या सर्वांना शहाजीराजे यांनी स्वराज्य संपादनाचा मनोदय सांगितला. येथूनच शिवाजी महाराज यांच्या मनात स्वराज्याचे बीज रुजत गेले. शिवाजी महाराज यांचे मोठे बंधू संभाजीराजे यांनी कर्नाटकात स्वराज्य कमवावे आणि शिवरायांनी मातोश्री जिजाबाई यांच्यासह पुण्यात राहून महाराष्ट्रात स्वराज्याची स्थापना करावी, असे शहाजीराजे यांनी सांगितले. त्यानंतर शहाजीराजे 25 फेब्रुवारी रोजी कर्नाटकात आल्यानंतर राजासारखे राहू लागले. तेथे त्यांनी आपले स्वतंत्र असे अस्तित्व निर्माण केले होते.
शिवाजी महाराजांच्या वयाच्या 10 व्या वर्षी शहाजीराजांनी त्यांना जिजामाता यांच्यासह 1640 मध्ये बंगळुरु येथे पाठवले. त्यांनी शिवरायांना बंगळुरु येथे दोन वर्षे प्रशिक्षण दिले. या काळात शिवाजी महाराजांना यांना शहाजीराजे यांच्याकडून स्वराज्य निर्मितीची प्रेरणा तसेच इतर सहाय्य मिळाले. जी गोष्ट शहाजीराजे यांना करणे शक्य झाले नाही. ती गोष्टी आपल्या दोन्ही प्रतापी पुत्रांकडून करुन घेण्यासाठी शहाजीराजे यांनी या काळात प्रचंड मेहनत घेतली. त्यांनी आपल्या पुत्रांसाठी स्वराज्याची योजना आखली. याच स्वराज्य स्थापनेच्या पूर्ततेसाठी त्यांनी बंगळुरुहून शिवरायांबरोबर आपले विश्वासू सरदार त्यांनी पाठवले.
शहाजीराजे यांनी स्वराज्य निर्मितीत दिलेल्या योगदानाचे वर्णन करताना प्रा. शेजवलकर यांनी खालीलप्रमाणे सांगितलेले आहे. “शिवराय बंगळुरुमध्ये शहाजीराजे यांच्या सानिध्यात होते, तेव्हा त्यांच्या संस्कारक्षम मनावर शहाजीराजे यांनी स्वराज्याचा महामंत्र कोरला. नंतर बंगळुरुहून पुण्याला परत येताच शिवाजी महाराज यांनी स्वराज्य स्थापनेच्या दिशेने हालचाली सुरु केल्या होत्या. शहाजीराजे यांची स्वराज्य स्थापनेत काय भूमिका होती हे सांगणारी ही फक्त प्राथमिक माहिती आहे. मुळात शहाजीराजे यांचे कार्य, त्यांचे शिवाजी महाराजांना केलेले मार्गदर्शन हे अमूल्य होते. शहाजीराजांच्या मुशीतून शिवाजी महाराज घडले. शहाजीराजांचे धाडस, त्यांचे कर्तृत्व, लढाऊ वृत्ती पुढे शिवाजी महाराज यांच्यात वाढत गेली आणि छत्रपती शिवाजी महाराज यांनी पुढे काय काय पराक्रम केले हे आपण सर्व जाणतोच.
(टीप- वरील माहिती महाराष्ट्राचा इतिहास मराठा कालखंड- 1 शिवकाल, लेखक डॉ. वि. ग. खोबरेकर यांच्या पूस्तकातून घेण्यात आली आहे.)
इतर बातम्या:
Holi 2022 : यंदा मित्र, कुटुंबांसोबत खेळा इको-फ्रेंडली होळी, केमिकलयुक्त कलरचा वापर टाळा