सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर NTA ने NEET परीक्षेचा निकाल वेबसाईटवर अपलोड केला आहे. मात्र ,NTA ने अपलोड केलेल्या निकालातून गडबड कुठल्या केंद्रात झाली हे स्पष्ट होत नाहीये. असे म्हणत याचिकाकर्ते यांनी शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान आणि NTA संचालकांना पत्र लिहिले आहे. गेल्या काही दिवसांपासून नीट परीक्षा 2024 चा वाद सातत्याने वाढताना दिसतोय. यंदा झालेल्या नीट परीक्षेत मोठा गोंधळ झाल्याचा आरोप केला जातोय. 720 पैकी 720 मार्क मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांना पडल्याने हा सर्व हैराण करणारा प्रकार पुढे आला. नीट परीक्षा रद्द करण्याची मागणीच अनेक विद्यार्थ्यांनी केली.
विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरत नीट परीक्षा परत घेण्याची आणि रद्द करण्याची मागणी केली. हेच नाहीतर हे प्रकरण थेट कोर्टात पोहोचले. NTA ने सुप्रीम कोर्टाच्या आदेशाची योग्य अंमलबजावणी केली नाही अशी तक्रार करण्यात आलीये. यामुळे आता हे स्पष्ट आहे की, हा वाद अजून वाढणार.
सुप्रीम कोर्टाने आदेश दिला होता की NEET चा निकाल NTA च्या वेबसाईटवर परीक्षा केंद्रनिहाय प्रकाशित करावा. असा निकाल जाहीर केल्याने कोणत्या केंद्रावर काही गडबड झाली आहे की नाही याचा अंदाज येईल असे कोर्टाने म्हटले होते. त्यानुसार केंद्रनिहाय निकाल वेबसाईटवर टाकण्यात आला.
मुलांची ओळख सार्वजनिक होऊ नये, म्हणून त्यांची नावे लपवावीत असे देखील कोर्टाने आपल्या आदेशात म्हटले होते. NTA ने जाहीर केलेल्या निकालात नाव आणि रोल नंबर दोन्ही लपवण्यात आले आहे. रोल नंबरच्या जागी दिलेले अनुक्रमांक देखील रोल नंबरच्या क्रमाने दिलेले नाहीत.
त्यामुळे कोणत्याही केंद्राची माहिती स्पष्ट होत नाही, असे याचिकाकर्त्यांचे मत आहे म्हणून त्यांनी हे पत्र लिहिलं आहे. 18 जुलै रोजी झालेल्या सुनावणीदरम्यान सर्वोच्च न्यायालयाने एनटीएला परीक्षा शहर आणि केंद्रनिहाय बसलेल्या सर्व उमेदवारांचे निकाल जाहीर करण्याचे आदेश दिले होते. आता उद्या म्हणजेच 22 जुलै रोजी या प्रकरणातील पुढील सुनावली होणार आहे.