मुंबई : राज्यातील शाळा (School) 15 जूनपासून सुरू करण्याचे आदेश शिक्षण विभागाने दिले होते. मात्र, शिक्षण विभागाच्या आदेशाला राज्यातील बहुतांश शाळांनी केराची टोपली दाखवलीये. 13 जूनपासून शैक्षणिक वर्ष सुरू करून वर्ग मात्र 15 जूनपासून सुरू करण्याचे स्पष्ट आदेश शिक्षण विभागाने (Department of Education) दिलेले असताना राज्यातील शाळांनी 13 तारखेपासूनच वर्ग सुरू केले. अचानक शाळा 13 तारखेपासून सुरू झाल्यामुळे पालकांची चांगलीच कसरत झाली. कोरोनामुळे गेल्या दोन वर्षांपासून शैक्षणिक वर्ष आॅनलाईन (Online) पध्दतीनेच सुरू होते. यंदा दोन वर्षांनी विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेमध्ये जाऊन शिक्षणाचे धडे घेणार आहेत.
महापालिकेंच्या शाळेमध्ये तर 13 तारखेला पाहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना पाठ्य पुस्तकाचे वाटप करण्यात आले. शिक्षकांनी शाळा सुरू करण्यासाठी जय्यत तयारी अगोदरच केली होती. यामुळे सर्वच शाळा या 13 तारेखपासूनच सुरू झाल्या आहेत. दोन वर्षांनंतर शाळा सुरू झाल्या आहेत, मात्र अजूनही राज्यामध्ये कोरोनाच्या रूग्णांची संख्या ही झपाट्यानेच वाढताना दिसते आहे. यामुळे विशेष खबरदारी ही शाळा प्रशासनाला घ्यावी लागणार आहे. जर मुलांना ताप किंवा सर्दी झाली असेल तर शाळेमध्ये काही दिवस पाठू नका, असे आदेशच पालकांना देण्यात आलेत.
खासगी शाळांसह मुंबईतील महापालिकेच्या शाळा या 13 तारखेपासूनच सुरू करण्यात आला. 15 ऐवजी 13 तारखेपासून शाळा सुरू करण्याच्या निर्णयावर शाळा प्रशासनाने सांगितले की, निकाल देतानाच 13 तारखेपासून शाळा सुरू होणार असल्याची माहिती पालकांना दिली होती. शाळा सुरू करण्यासंदर्भातील सर्वच तयारी शाळेंची झाली असल्यामुळे 13 तारखेलाच शाळा सुरू करण्यात आल्या. शाळेच्या पहिल्या दिवशी शाळेमध्ये येणाऱ्या विद्यार्थ्यांना पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. मात्र, हे सर्व असताना शाळेंनी शिक्षण विभागाच्या आदेशाकडे सर्रासपणे दुर्लक्ष केले आहे.