आपण भारतात कुठेही गेलो की आपण हिंदी भाषेला (Hindi Language) प्राधान्य देतो. आपल्याला माहित असतं समोरच्याची भाषा कुठलीही असो, त्याला हिंदी कळणारच. मग दोन वेगवेगळ्या भाषेचे लोक हिंदीवर येऊन एक होतात. आज 14 सप्टेंबर, हिंदी दिवस? हिंदी दिवस अत्यंत उत्साहात आणि आवर्जून साजरा केला जातो. ठिकठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम आयोजित केले जातात. पण आजच हा हिंदी दिवस साजरा का केला जातो? 14 सप्टेंबर हीच तारीख का म्हणून निवडली गेली? असं काय कारण आहे की आजच हा दिवस “हिंदी दिवस” (Hindi Diwas) म्हणून साजरा केला जातो? आपली अधिकृत आणि राजभाषा (Rajyabhasha) असलेल्या हिंदी बद्दल आपल्याला ही माहिती असायलाच हवी चला जाणून घेऊया…
हिंदी विषयी बोलताना महात्मा गांधी एकदा म्हणाले होते, ‘हिन्दी भाषेशिवाय मी मुका आहे.’ बाळ गंगाधर टिळक यांनी सुद्धा हिंदी विषयी मत मांडताना म्हटलं होतं, “हिंदी ही भारताची राष्ट्रभाषा बनू शकते अशी इच्छा आणि विचार ठेवणाऱ्या लोकांपैकी मी एक आहे.”
आजही हिंदी ही राष्ट्रभाषा नाही. ती राजभाषा आहे. देशातील अनेक ठिकाणी ही भाषा बोलली जाते. या भाषेला अधिकृत भाषेचा दर्जा आहे.
हिंदीसाठी 14 सप्टेंबर ही तारीख खूप खास आहे. याची दोन महत्त्वाची कारणे आहेत. पहिलं कारण आहे, व्यौहार राजेन्द्र सिंह यांचं.त्यांच्या प्रयत्नांमुळेच हिंदीला भारतात राजभाषेचा दर्जा मिळाला.
हजारीप्रसाद द्विवेदी, काका कालेलकर, मैथिली शरण गुप्ता आणि सेठ गोविंद दास यांच्यासारख्या काही जणांसोबत व्यौहार राजेन्द्र सिंह हिंदीसाठी लढले,असं इतिहास सांगतो.
आज 14 सप्टेंबरला व्यौहार राजेन्द्र सिंह यांचा वाढदिवसही असतो. भारतीय राज्यघटना तयार होत असताना आपल्या संविधान सभेने 14सप्टेंबर 1949 रोजी हिंदी ही देशाची अधिकृत भाषा म्हणून स्वीकारली.
हिंदी दिन पहिल्यांदा 69 वर्षांपूर्वी 1953 मध्ये साजरा करण्यात आला.
जेव्हा 2011 मध्ये जनगणना झाली तेव्हा असं आढळून आलं की, भारतात 43.63 टक्के लोक हिंदी भाषिक आहेत. भारतात हिंदी प्रामुख्याने उत्तर, पश्चिम राज्यांत बोलली जाते.
ज्या देशात 700 प्रकारच्या भाषा बोलल्या जातात, जिथे राज्यघटनेतील अधिकृत भाषांच्या यादीत 22 भाषांचा समावेश झाला आहे, तिथे 43.63 टक्के लोकांनी हिंदी भाषेचा वापर करणे ही मोठी गोष्ट आहे. भारतीय संविधानाची पहिली अधिकृत भाषा हिंदी आणि दुसरी इंग्रजी आहे.