यूपीएससीच्या माध्यमातून भारतीय सांख्यिकी विभागाच्या परीक्षांचा नुकताच निकाल जाहीर झालाय. या परीक्षेत पुण्याची सुजाता जाधव ही विद्यार्थिनी देशात 22 व्या क्रमांकाने उत्तीर्ण झाली आहे तर महाराष्ट्रात पहिल्या नंबरने उत्तीर्ण झाली आहे. त्यामुळे सुजाता जाधव हिचं सर्वच स्तरातून कौतुक केलं जात आहे. सुजाता जाधव हिने ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी तिने आपल्या संघर्षाच्या काळात मदत करणाऱ्या सर्वांचे आभार मानले. “खूप सारा आनंद होतोय. मागच्या पाच वर्षांचे प्रयत्न सत्कारणी ठरले असं वाटत आहे. सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे माझ्यासोबत जे शेतकरी कुटुंबातील विद्यार्थी प्रयत्न करत असतात त्यांच्यासाठी देखील छान वाटत आहे. प्रयत्न सगळ्यांनी केले पाहिजेत”, असं सुजाता जाधव म्हणाली.
“मी २०१४ मध्ये पुण्यात आली होती. तेव्हा माझी नुकतीच बारावी पूर्ण झाली होती. विद्यार्थी सहायती समिती म्हणून मला मोठा मंच मिळाला. विद्यार्थी सहायची समिती हे एक मोठं वटवृक्ष आहे. त्या वटवृक्षाने त्याच्या सावलीत आम्हाला सर्वांना सामावून घेतलं. आतापर्यंतच्या माझ्या प्रवासात लीला पूनावाला फाऊंडेशनकडून शिष्यवृत्ती मिळाली. अजून एका सरकारी संस्थेकडून इन्सपायर स्कॉलरशिप मिळाली. जरी आर्थिक अडचणी असल्या तरी जिद्द, चिकाटी असेल तर तुम्ही तुमचं यश संपादीत करु शकता, असं मला वाटतं”, अशी प्रतिक्रिया सुजाता जाधव हिने दिली.
“मी आधीपासूनच प्रशासनात जायचं आहे, असं ठरवलं होतं. माझी लहानपणापासून ती इच्छा होती. मी जेव्हा पदव्युत्तर शिक्षण घेत होती तेव्हा माहिती मिळाली की, यूपीएससीत भारतीय सांख्यिकी विभाग आहे. माझं शिक्षणही त्याच विभागातून झालेलं आहे. मी 2022 मध्ये सुद्धा यूपीएससीची मुलाखत दिली होती. पण त्यावेळी माझी निवड झालं नव्हतं. तेव्हा खूपच वाईट वाटलं होतं. तेव्हा मी स्वत:ला म्हटलं होतं की, सुजा तुझ्याकडे दोनच ऑप्शन आहेत, एकतर लढायचं किंवा रडायचं. मग मी लढण्याचं ऑप्शन स्वीकारलं आणि परत चिकाटीने प्रयत्न करुन आता हे यश संपादीत केलं”, असा अनुभव सुजाताने सांगितला.
“स्पर्धा परीक्षा हा खूप चांगला मंच आहे. पण तरीही तुम्ही तुमचा करिअरचा प्लॅन बी रेडी ठेवायला हवा. कारण अनेक जण बारावीनंतर लगेच यूपीएससी परीक्षांची तयारी करतात. पण ४० पैकी केवळ १ मुलाची निवड होत असेल तर आधी आपण आपला प्लॅन बी तयार ठेवा आणि मगच या क्षेत्राकडे वळा”, असा मोलाचा सल्ला सुजाता जाधव यांनी यूपीएससीचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांना दिला आहे.