जयपूर : क्रिकेट विश्वात नाव कमावण्यासाठी लोक जंगजंग पछाडत असतात. काही तरुण तर शिक्षण सोडून क्रिकेटच्या मैदानावर घाम गाळत असतात. क्रिकेटमुळे मिळणारी प्रसिद्धी आणि पैसा यामुळे अनेक तरुण क्रिकेटपटू होण्याचं स्वप्न उराशी बाळगून असतात. पण एका तरुणाने चक्क क्रिकेटला राम राम ठोकून यूपीएससी परीक्षेची तयारी केली. अन् विशेष म्हणजे तो त्यात यशस्वीही ठरला आहे. पहिल्याच प्रयत्नात या पोट्ट्याने यूपीएससीची परीक्षा क्रॅक केली आहे.
मनोज महरिया असं या तरुणाचं नाव आहे. तो राजस्थानच्या कूदन गावचा रहिवासी आहे. त्याने यूपीएससी परीक्षेत 628 वा क्रमांक मिळवून आपल्या गावाचा नाव लौकिक वाढवला आहे. मनोजचे वडील हयात नाहीत. तीन बहीण भावांमध्ये तो सर्वात मोठा आहे. त्यामुळे घरची संपूर्ण जबाबदारी त्याच्यावर येऊन पडली. मात्र, त्याही परिस्थितीत त्याने शिक्षण सुरू ठेवलं. प्रसंगी रणजी क्रिकेटला रामराम ठोकला अन् अखेर यश पदरात पाडून घेतलं. मुलगा पास झाल्याचं ऐकून त्याची आई तारा देवी अत्यंत भावूक झाली असून मनोजच्या घरात सध्या दिवाळी साजरी करण्यात येत आहे.
मी कोणत्याही क्लासेसला गेलो नाही. घरीच अभ्यास करून यश मिळवलं आहे, असं मनोजने सांगितलं. मनोजच्या यशाची माहिती मिळताच अख्ख्या गावातून त्याच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे. गावातही जणू दिवाळीचं वातावरण निर्माण जालं आहे. आपल्या गावचा पोरगा आता मोठा अधिकारी होणार या कल्पनेने गावातील लोक सुखावले आहेत. तसेच मनोजच्या यशामुळे गावातील इतर मुलांनाही शिकून पुढे जाण्याचा हुरूप येईल, असं गावकरी म्हणत आहेत.
मनोज सध्या समाजशास्त्र हा विषय घेऊन एमए करत आहे. गावात इयत्ता दहावीपर्यंत शिक्षण घेतल्यानंतर त्याने सीकरमधून 12 वी केली होती. इयत्ता 12 वीनंतर त्याने क्रिकेट खेळण्यास सुरुवात केली होती. मनोज हा रणजी प्लेअर आहे. 2018मध्ये दुखापतीमुळे त्याने रणजी क्रिकेट सोडलं. त्यानंतर पुन्हा त्याने शिक्षणावर जोर दिला. त्यानंतर त्याने अनेक सरकारी नोकर भरतीच्या परीक्षा पास केल्या. पण तरीही चांगली सरकारी नोकरी मिळावी म्हणून त्याने तयारी सुरू केली. लॉकडाऊनच्या काळातच त्याने यूपीएससीच्या परीक्षेची तयारी सुरू केली होती.
कोचिंग क्लासमध्ये मला कंफर्टेबल वाटत नव्हतं. त्यामुळे घरच्या घरीच अभ्यास करण्यास सुरुवात केली, असं त्याने सांगितलं. त्याला आता आयएएस व्हायचं आहे. त्यासाठी तो आता परीक्षा देणार आहे. कोणत्याही माध्यमातून मिळणारी माहिती वाया घालवू नका. सोर्सेज मर्यादित ठेवा. म्हणजे गोंधळ उडणार नाही. यूपीएससीसारख्या परीक्षांची तयारी करत असताना नातेवाईक आणि लग्न सोहळे टाळावे लागतात. सिलेक्शन होण्यासाठी एवढी किंमत तर मोजावीच लागते, असा सल्ला त्याने दिला आहे.