भारतीय शिक्षण प्रणालीचा प्रवास गुरुकुल ते व्यावसायिक कोचिंग व्हाय शाळा, महाविद्यालय असा झाला आहे. गुरुकुलमध्ये विद्यार्थी गुरुंच्या घरी म्हणजे आश्रमात जाऊन शिक्षण घेत होते. त्यासाठी कठोर नियम होते. गुरुकुलमध्ये जाऊन शिष्य गुरुंकडून विज्ञान, वेद, कला, साहित्य, शस्त्र चालवण्याचे आदी प्रकारचे शिक्षण घेत होते. त्या ठिकाणी गरीब श्रीमंत काहीच भेद नव्हता. अगदी राजा महाराजांची मुले गुरुकुलमध्ये शिक्षणासाठी येत होते. त्या गुरुकुलमध्ये विद्यार्थ्यांचा संपूर्ण विकास होत होता. काळानुसार शिक्षण बदलले. शिक्षण प्रणाली बदलली. गुरुकुलऐवजी शाळा, महाविद्यालये सुरु झालीत. शाळांमध्ये कठोर शिस्तीचे शिक्षक असायचे. त्यामुळे “छडी लागे छम छम विद्या येई घम घम” हा वाक्यप्रचार प्रचलित झाला. परंतु काळाच्या ओघात शाळांमध्ये छडीचा वापर बंद झाला.
हसत खेळत शिक्षण सुरु झाले. त्या काळातही शिकवणी म्हणजे कोचिंग लावणे म्हणजे कच्चा विद्यार्थी समजला जात होता. परंतु आता नामांकीत क्लास लावणे हे स्टेट्स झाले आहे. अगदी मुलगा नर्सरीत आल्यापासून त्याची शिकवणी सुरु केली जाते. ते शिक्षण पूर्ण होईपर्यंत संपत नाही. घरातील मुलगा आठवीत आला की क्लासचा शोध सुरु होतो. मोठा क्लास लावण्यासाठी पालकांकडून पैशांची जुळवाजुळव केली जाते. कारण क्लासची फी हजारोंमध्ये नाही तर लाखोंमध्ये असते. पालकांना मुलांना डॉक्टर, इंजिनिअर बनवायचे असते. त्यासाठी शाळा, महाविद्यालयांपेक्षा कोचिंग क्लासेस महत्वाचे वाटू लागले आहेत. कारण मोठ्या क्लासमधील विद्यार्थ्यांच्या यशाची संख्या जास्त आहे. त्यामुळे शाळा नाही तर क्लास हवे…असे सूत्र आजच्या शिक्षण पद्धतीत रुजू झाले आहे.
नुकताच जेईई एडवांस अन् नीट परीक्षांचा निकाल आला. या निकालात तो कोणत्या कॉलेजचा विद्यार्थी आहे, त्यापेक्षा तो कोणत्या कोचिंगचा विद्यार्थी आहे, ही चर्चा रंगली. माध्यमांमध्ये टॉपरच्या कॉलेजचे नाव दिसले नाही तर टॉपरच्या कोचिंग क्लासेची नावे आली. कारण त्या टॉपर विद्यार्थ्यांनी कॉलेजचे तोंडही वर्ष, दोन वर्षात पाहिले नाही. फक्त परीक्षा देणे अन् प्रॅक्टीकलसाठी कॉलेजला जाणे हाच उपक्रम राहिला आहे. त्यासाठी सध्या डमी कॉलेज म्हणून नवीन पद्धत भारतीय शिक्षण प्रणालीत जन्माला आली आहे. हे डमी कॉलेज अन् क्लास यांचा अलिखित करार झालेला असतो. डमी कॉलेजने फक्त प्रवेश द्यावा, क्लासेस मात्र कोचिंगमध्ये होणार आहे, असा फंडा तयार झाला आहे. देशातील टॉपर ठरलेले विद्यार्थी कोटाचे तर महाराष्ट्रातील टॉपर ठरलेले विद्यार्थी लातूरचे… कारण देशात कोटा अन् राज्यात लातूर हे कोचिंगचे गाव झाले आहे. लाखोंची फी भरुन विद्यार्थी या शहरात येतात. कोट्यवधींची उलाढाल या शिक्षणाच्या व्यवसायात आहे. यामुळेच या दोन शहरातील अर्थव्यवस्था आता कोचिंगवर निर्माण झाली आहे.
सर्व पालकांना आपले मुले डॉक्टर, इंजिनिअर झालेली हवी असतात. इजिनिअरींगचे शिक्षण आयआयटीमधून तर वैद्यकीय अभ्यासक्रमाचे शिक्षण एम्समधून पूर्ण करण्याचा हट्टहास असतो. त्यासाठी मुलांची क्षमताही समजून घेतली जात नाही. आयआयटीमध्ये प्रवेशासाठी संयुक्त प्रवेश परीक्षा (जेईई) तर एम्समध्ये प्रवेशासाठी राष्ट्रीय प्रवेश पात्रता परीक्षा (नीट) परीक्षा द्यावी लागते. या परीक्षांना दरवर्षी लाखो विद्यार्थी बसतात. लाखो विद्यार्थ्यांच्या या स्वप्नात यश केवळ हजारो विद्यार्थ्यांना येत असते. यामुळे त्यासाठी स्पर्धा किती मोठी आहे, हे लक्षात येते. या स्पर्धेत टिकण्यासाठी शाळा, महाविद्यालये निरुपयोगी ठरु लागली. कारण शाळा, महाविद्यालयांनी या नवीन स्पर्धात्मक शिक्षण प्रणालीशी जुळवून घेतले नाही. शाळा-महाविद्यालयांनी पारंपारीक शिक्षण प्रणालीने शिक्षण देणे सुरु ठेवले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना पंख देण्यासाठी त्यांच्यासाठी कोचिंग नावाचा स्वप्नदूत जन्माला आला. त्याच्या मदतीने काही विद्यार्थ्यांची स्वप्न पूर्ण होऊ लागली. अन् कोचिंगचे गाव निर्माण झाले.
राजस्थानातील कोटा हे चंबळ नदीच्या तीरावर वसलेले शहर आहे. आता हे शहर भारताची “कोचिंग राजधानी” म्हटले जात आहेत. देशात कोचिंगसाठी कोटा शहर प्रसिद्ध झाले आहे. खासगी शिकवणीचे गाव झालेले हे शहर विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचे शहर बनले आहे. त्यांना चांगल्या कॉलेजमधून डॉक्टर आणि इंजिनीअर बनवणारे माध्यम ठरले आहे. कोटा भारताचे शैक्षिणक हब बनले आहे. त्याला कारण या ठिकाणी असलेले खासगी कोचिंग क्लासेस आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून जेईई मेन्स, ॲडव्हान्स अन् नीटमध्ये कोटा येथील खासगी क्लासेसचे विद्यार्थी टॉपर येत आहेत. यामुळे सर्व पालकांची धाव आपल्या गावापासून लांब असणाऱ्या राजस्थानमधील कोटापर्यंत होऊ लागली आहे.
1991 मध्ये कोटा शहरात बोटावर मोजण्याइतके कोचिंग सेंटर होते. त्या वर्षी एका कोचिंगमधील 10 विद्यार्थ्यांची निवड आयआयटीत झाली. पुढील वर्षी 50 विद्यार्थी आयआयटीत गेले. मग ही संख्या वाढतच गेली. त्यामुळे कोटा कोचिंग क्लासेसाठी प्रसिद्ध होऊ लागले. 2015 पर्यंत कोटा शहरातील कोचिंगचा व्यवसाय कोट्यवधी रुपयांमध्ये झाला. आता कोटामधील क्लासेसची वार्षिक उलाढाल दहा हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त झाली आहे. कोटामधील कोचिंगमधून सरकारला 700 कोटींपेक्षा जास्त कर मिळत आहे. कोटा शहरातील कोचिंग क्लासेची एक वर्षाची फी एका लाखांपासून अडीच लाखांपर्यंत आहे. हॉस्टेल अन् मेसचा खर्च वेगळ असतो. क्लासेससोबत त्याला लागणारे पूरक व्यवसाय म्हणजे मेस, हॉस्टेल, शैक्षणिक बाजारपेठची कोटा शहरात भरभराट झाली आहे. सध्या कोटा शहरामध्ये जवळपास 150 कोचिंग क्लास असून अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांची संख्या चार लाखांच्या घरात आहे.
कोचिंगच्या शुल्कानंतर दरमहा तीन ते पाच हजार रुपये हॉस्टेलचा खर्च मुलांचा असतो. ज्याप्रमाणे हॉस्टेलच्या भाड्याचे दर असतील त्याप्रमाणे त्या वसतीगृहात सुविधा दिल्या जातात. कोटा शहरात मुलांच्या निवासाची सोय करणाऱ्या वसतीगृहाची उलाढाल शंभर कोटींपेक्षा अधिक आहे. वसतीगृहासोबत बाहेर गावावरुन येणाऱ्या विद्यार्थ्यांची गरज खानावळ म्हणजेच मेस असते. तो व्यवसाय कोचिंगच्या या गावात भरभराटीला आला आहे. कोटामध्ये देशभरातून विद्यार्थी येतात. देशातील विविध प्रदेशातून आलेल्या सर्वच विद्यार्थ्यांना कोटामधील जेवणाची पद्धत रुचत नाही. तसेच कोटमधील प्रचंड उन्हाचा सामना त्यांना करावा लागतो. त्यामुळे अनेक पालक दोन वर्षांसाठी कोटामध्ये स्थाईक होतात. त्यांना सर्व सुविधांयुक्त घर भाड्याने देण्याचा व्यवसाय या शहरात वाढला आहे.
अनुदानित शाळा, महाविद्यालयातील शिक्षकांना राज्य अन् केंद्र शासनाकडून समाधानकारक पगार मिळतो. सामान्य खासगी शाळेतील अन् महाविद्यालयातील शिक्षकांच्या पगारावर चर्चा करणेच योग्य आहे. परंतु टॉप कोचिंगमधील शिक्षकांच्या पगाराचे आकडे पाहून चकीत होण्याची वेळ येईल. मोठ्या कोचिंगमधील शिक्षकांना पगार कोट्यवधी रुपयांमध्ये आहेत. चांगल्या शिक्षकांकडे जाण्याचा ओढा विद्यार्थ्यांचा असतो. त्यासाठी चांगल्या शिक्षकांसाठी कोचिंगमधून पळवापळवी होत असते. कोचिंगचा कोटा पॅटर्ननंतर महाराष्ट्रात शिक्षणाचा लातूर पॅटर्न तयार झाला आहे.
देशाची कोचिंगची राजधानी कोटा तर महाराष्ट्राची कोचिंगची राजधानी लातूर शहर आहे. परंतु लातूर पॅटर्नची सुरुवात व्यावसायिकरित्या झालेली नाही. शाळांनी सुरु केलेला हा चांगला उपक्रम होता. पाच दशकांपूर्वी लातूरच्या देशी केंद्र शाळेचे मुख्याध्यापक शि.वे. खानापुरे यांच्या कल्पनेतून लातूर पॅटर्न तयार झाला. त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी शाळेत कोणतेही मानधन न घेता अतिरिक्त विशेष वर्ग घेण्याची कल्पना मांडली. त्यांना शाळेतील शिक्षकांनी पाठिंबा दिला. मग विद्यार्थ्यांचा अभ्यास, त्यांच्या शंकांचे निरसन करण्यासाठी अतिरिक्त वर्ग सुरु झाले. हाच फंडा म्हणजे लातूर पॅटर्नचा जन्म होय. या लातूर पॅटर्नचे यश दिसू लागले. शाळेचा निकालात चांगला सकारात्मक बदल झाला. विद्यार्थ्यांच्या यश लक्षणीयरित्या वाढले. ते पाहून इतर शाळांनी ही योजना सुरु केली.
लातूरमधील लालबहादूर शास्त्री विद्यालयातील विद्यार्थी राज्यात दहावीच्या परीक्षेत गुणवत्तेत पहिला आला अन् लातूर पॅटर्न राज्यात चर्चेत आला. शाळांमधून सुरु झालेला हा प्रयोग महाविद्यालयात सुरु झाला. त्यासाठी लातूरमधील दयानंद विज्ञान महाविद्यालयात अतिरिक्त विशेष वर्ग सुरु झाले. त्यांचाही निकाल चांगला येऊ लागला. त्यानंतर राजर्षी शाहू महाविद्यालयानेही हा उपक्रम राबवला. अन् लातूरचे विद्यार्थी राज्यस्तरावर झळकायला लागले. यामुळे लातूर पॅटर्नची चर्चा सर्वत्र सुरु झाली. अनेक शाळामधील शिक्षक लातूरमध्ये येऊ लागले. लातूर पॅटर्न समजवून घेऊ लागले. त्याची अंमलबजावणी आपल्या भागात करण्याचा प्रयत्न करु लागले.
बारावीच्या गुणांवर वैद्यकीय अन् अभियांत्रिकाला प्रवेश बंद झाला. त्यासाठी सीईटी सुरु झाली. पालकांचा अभियांत्रिकी आणि वैद्यकीय शाखेकडे वाढलेला ओढा व टक्केवारीची स्पर्धा यातून लातूर नवीन पॅटर्नचा जन्म झाला. त्यात शाळा ऐवजी खासगी शिकवणी वर्ग सुरु झाले. राज्यातील शासकीय व खासगी वैद्याकीय महाविद्यालयांमधील प्रवेश क्षमतेच्या ३० टक्के विद्यार्थी एकट्या लातूर शहरामधून शिक्षण घेतलेले असतात. देशात चांगले शिकवणारे शिक्षक लातुरात दाखल होऊ लागले. त्यांनी कोचिंग क्लासेस सुरु केले. काहींनी इतर कोचिंग क्लासेमध्ये दुप्पट पगारात नोकरी पत्कारली.
दुसरीकडे अनेक क्लास संचालक आर्थिकरित्या भक्कम झाले. मग आपल्या आर्थिक साम्राज्याला कवचकुंडल मिळावे यासाठी त्यांनी राजकीय पाठबळ मिळवले. त्यातील व्यावसायीकरण पाहून राजकीय मंडळींचा हस्तक्षेप सुरु झाला. त्यातून खंडणीखोरांचा जन्म झाला. लातूरमध्ये अविनाश चव्हाण या शिकवणी चालकाचा खून या स्पर्धेमुळे झाला होता. कोटाप्रमाणे लातूरमधील उलाढाल हजारो कोटींवर गेली आहे. आता लातूरमधील कोचिंग व्यवसाय हजार-बाराशे कोटी रूपयांवर गेला आहे.
लातूर पॅटर्नसंदर्भात बोलताना लातूरमधील ज्येष्ठ पत्रकार श्रीपद सबनीस यांनी सांगितले की, सध्या लातूर शहरात क्लासेसची संख्या 75 आहे. या कोचिंगमध्ये शुल्क वेगवेगळे आहे. 1 लाख 20 हजार ते 1 लाख 50 हजार रुपये शुल्क वर्षाला आकरले जात आहे. लातूरमध्ये शिक्षणासाठी बाहेरून आलेले विद्यार्थी आता सुमारे 2 लाख 50 हजाराच्या जवळपास आहेत. त्या विद्यार्थ्यांना राहण्यासाठी हॉस्टेल अन् मेस तयार झाल्या आहेत. लातूरमधील विद्यार्थ्यांची संख्या काही वर्षांपूर्वी पाच लाख होती. परंतु आता प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी शाखा या कोचिंग क्लासेसच्या निर्माण झाल्या आहेत. त्यामुळे ही कमी झाली आहे.
लातूर पॅटर्नची चर्चा होत असताना मध्यंतरीच्या काळात महाराष्ट्रात चाटे कोचिंग क्लासेसचे प्रस्थ आले होते. चाटे कोचिंग क्लासेसच्या शाखा राज्यातील अनेक शहरांमध्ये सुरु झाल्या होत्या. त्यानंतर चाटे यांनी शाळाही काढल्या. परंतु काळाप्रमाणे चाटे यांनी कोचिंग क्लासेसमध्ये बदल केले नाही. त्यामुळे चाटे ऐवजी नवीन क्लासेसकडे विद्यार्थी गेले. आता ऑफलाईनप्रमाणे ऑनलाईन शिक्षण कोचिंग क्लासेसकडून मिळू लागले आहे.
मुलांची आवड आणि पालकांच्या अपेक्षा या विषयावर वर्षानुवर्षे चर्चा आणि विचारमंथन होत आहे. मुलांना कशाची आवड आहे, त्यांना कोणत्या विषयात रस आहे किंवा त्यांना भविष्यात काय बनायचे आहे, हे प्रश्न आजच्या स्पर्धेच्या काळात कालबाह्य ठरले आहेत. फक्त माझा मुलगा चांगल्या कॉलेजमधून इंजिनिअर किंवा डॉक्टर व्हावा, हीच अपेक्षा असते. त्यामुळे कोटा अन् लातूरमधील कोचिंग जन्माला आले. आता त्याचे पेव शहरा शहरात फुटले अन् शाळा-महाविद्यालये नावालाच राहिली. अनेक महाविद्यालयांमध्ये आता वर्ग होतच होत नाही. 70 टक्के हजेरीची अट डमी कॉलेजमध्ये प्रवेश घेतल्यावर नसते. परंतु शासनाची व्यवस्था कागदावर नियम करते, प्रत्याक्षात त्याची अंमलबजावणी होते की नाही? हे पाहणार कोण? हाच प्रश्न आहे.