Assembly election Result : चार राज्यांमध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. मध्य प्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगडच्या निवडणुकीच्या ट्रेंडमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तेलंगणात काँग्रेसला बहुमत मिळत आहे. चारपैकी तीन राज्यांमध्ये भाजपचं कमळ फुललं आहे. हा विजय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा असल्याचं भाजपच्या नेत्यांनी म्हटले आहे. चारही राज्यातील चित्र जवळपास स्पष्ट झालं आहे. त्यामुळे आता मुख्यमंत्री कोण होणार याबाबत चर्चा सुरु झाल्या आहेत. पाहा कोणत्या राज्यात कोण आहेत मुख्यमंत्रीपदाचे दावेदार.
मध्य प्रदेशात सध्या तीन नावे मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत आहेत. यामध्ये शिवराज सिंह चौहान, नरेंद्र सिंह तोमर, कैलाश विजयवर्गीय, व्हीडी शर्मा आणि प्रल्हाद पटेल यांच्या नावांचा समावेश आहे.
राजस्थानमध्ये मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत वसुंधरा राजे सिंधिया, दिया कुमारी, बाबा बालकनाथ, राज्यवर्धन सिंह राठोड आणि लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्या नावांचा विचार केला जात आहे.
छत्तीसगडमध्ये माजी मुख्यमंत्री डॉ. रमण सिंह, भाजपच्या राष्ट्रीय उपाध्यक्षा सरोज पांडे आणि माजी मंत्री बृजमोहन अग्रवाल यांच्या नावांचा समावेश आहे.
तेलंगणात मुख्यमंत्री चेहऱ्याबाबत बोलायचे झाले तर अनेक नेते दावेदार मानले जात आहेत. यामध्ये प्रदेश काँग्रेस अध्यक्ष रेवंत रेड्डी, खासदार कॅप्टन एन उत्तमकुमार रेड्डी, कोमातीरेड्डी व्यंकट रेड्डी आणि मल्लू भट्टी विक्रमार्क यांसारख्या नावांचा समावेश आहे.
तेलंगणात बीआरएस नेते केटीआर राव यांनी काँग्रेस पक्षाचे अभिनंदन केले आहे. बीआरएस सरकारला सलग दोन टर्म दिल्याबद्दल तेलंगणातील जनतेचे आभारी असल्याचे राव म्हणाले.
छत्तीसगड, मध्य प्रदेश आणि राजस्थानमध्ये भाजपच्या आघाडीवर केंद्रीय मंत्री आणि पक्षाच्या नेत्या स्मृती इराणी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. स्मृती इराणी म्हणाल्या की, नरेंद्र मोदींनी केवळ हमीभाव दिला आणि लोकांनी त्यांच्यावर विश्वास व्यक्त केला. मोदींची जादू पुन्हा एकदा दिसून आली आहे.