अखेर अमरावतीमधून खासदार नवनीत राणा यांना तिकीट जाहीर करण्यात आलं आहे. भाजपने राणा यांना उमेदवारी दिली आहे. त्यामुळे नवनीत राणा या भाजपच्या चिन्हावरच लढणार असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, गेल्या अनेक वर्षापासून शिवसेनेकडे असलेला अमरावती मतदारसंघ नव्या युतीत भाजपकडे गेला आहे. त्यामुळे शिंदे गटाचे नेते, अमरावतीचे माजी खासदार आनंदराव अडसूळ प्रचंड नाराज झाले आहेत. आम्ही लाज लज्जा शरम सोडलेली नाही. त्यामुळे आम्ही नवनीत राणा यांचा प्रचार करणार नाही. मी स्वत: अमरावतीतून लढणार आहे, असं आनंदराव अडसूळ यांनी म्हटलं आहे. त्यामुळे शिंदे गटात फूट पडण्याची चिन्हे दिसत आहेत.
नवनीत राणा यांना भाजपने अमरावतीतून उमेदवारी जाहीर केल्यानंतर आनंदराव अडसूळ यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधला. यावेळी त्यांनी नवनीत राणा यांच्यावर टीका केली. भाजपने नवनीत राणा यांना दिलेली उमेदवारी ही राजकीय आत्महत्या आहे. महायुद्धात जापानने हाराकिरी केली. तेच भाजपने केलं आहे. सर्व विरोधात असताना कशाच्या जीवावर नवनीत राणा यांना उमेदवारी देण्यात आलीय? असा सवाल आनंदराव अडसूळ यांनी केला आहे.
नवनीत राणा यांच्या बच्चू कडू विरोधात आहे. पटेल विरोधात आहे. भाजपचे पदाधिकार विरोधात आहे. त्यामुळे राणा यांना तिकीट देणं ही आत्महत्या ठरणार आहे. कुणाच्या जीवावर तिकीट दिलं? बडनेरातून तरी त्यांना मते मिळणार आहेत का?, असा सवाल अडसूळ यांनी केला.
आनंदराव अडसूळ आमचा प्रचार करतील, असा दावा नवनीत राणा यांनी केला होता. त्यावरही त्यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली. ते निर्लज्ज आहेत. ते कोणतेही वक्तव्य करतात. आम्ही लाज, शरम सोडलेली नाही. आम्ही स्वाभिमान विकला नाही. आम्ही आहोत तिथे आहोत. आमच्या जीवावर आम्ही निवडणूक लढू शकतो आणि लढणार. अमरावतीतून उमेदवार देणार नाही. मी स्वत: उभा राहणार आहे, असं त्यांनी स्पष्ट केलं.
शिंदे गटाचा उमेदवार म्हणूनच मी उभा राहणार आहे. नवनीत राणा यांची उमदेवारी महायुतीने जाहीर केली नाही. भाजपने हा उमेदवार जाहीर केला आहे. आम्ही नाही. आढळराव पाटील तिघांच्या संमतीने राष्ट्रवादीत गेले. तसं नवनीत राणांबाबत घडलं नाही. मी साक्षीदार आहे, असं सांगतानाच अमरावतीतून मी माझ्या मुलाला उभं करणार नाही. मीच उभा राहील, असंही ते म्हणाले. नवनीत राणा यांच्या जात प्रमाणपत्राचा निकाल कधीही येईल. उद्या उमेदवारी अर्ज भरला आणि निकाल लागला तर काय होणार? असा सवालही त्यांनी केला.
भाजपने माझ्या नावाचा विचार केला नाही. त्यांना कमळावर लढणारी व्यक्ती हवी होती. त्याला मी काय करणार? मला भाजपकडून ऑफर आली तर मी जाईल. अजूनही ऑफर आली तर मी भाजपमध्ये जाईल, असं मोठं विधानही त्यांनी केलं.