उत्तर प्रदेशातील मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार कुंवर सर्वेश सिंह यांचं निधन झालं आहे. त्यांनी आज संध्याकाळी 6.30 वाजता दिल्लीच्या एम्स रुग्णालयात अंतिम श्वास घेतला. कुंवर सर्वेश सिंह यांना भाजपने तिकीट दिलं होतं. त्यावेळी ते रुग्णालयात उपचार घेत होते. त्यांना कँन्सर झाला होता. या आजाराशी झुंज देत असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. विशेष म्हणजे काल 19 एप्रिल रोजी मुरादाबाद लोकसभा निवडणुकीसाठी मतदान झालं. त्यानंतर आज कुंवर सर्वेश सिंह यांचं निधन झाल्याने मतदारसंघात हळहळ व्यक्त केली जात आहे.
काल पहिल्या टप्प्याचं मतदान झालं. मुरादाबादमध्ये 60 टक्के मतदान झालं होतं. तर 2019मध्ये या मतदारसंघात 65.39 टक्के मतदान झालं होतं. कुंवर सर्वेश कुमार सिंह हे उत्तर प्रदेशातील बाहुबली नेत्यांपैकी एक आहेत. व्यवसायाने ते उद्योजक आहेत. 2014मध्ये ते मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून खासदार झाले होते. खासदार होण्यापूर्वी ते ठाकूरद्वारा विधानसभा मतदारसंघातून चार वेळा निवडून आले होते. 2014मध्ये कांठ विधानसभा मतदारसंघात झालेल्या लाऊडस्पीकर वादात सर्वेश यांची मोठी चर्चा झाली होती. या वादात ते असल्याने त्यांच्यावर आरोपप्रत्यारोप झाले होते.
सर्वेश सिंह यांनी पहिल्यांदा 1991मध्ये भाजपच्या तिकीटावर ठाकुरद्वारा विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढली होती. या निवडणुकीत ते विजयी झाले होते. त्यानंतर सलग चारवेळा ते विजयी झाले. सर्वेश सिंह 1991 नंतर 1993, 1996 आणि 2002 मध्ये सातत्याने निवडणूक जिंकले. मात्र, 2007मध्ये त्यांना बसपा उमेदवाराकडून पराभव पत्करावा लागला होता. सर्वेश सिंह यांचा मुलगा सुशांत सिंह हा बिजनौरच्या बढापूर विधानसभा मतदारसंघातील आमदार आहे.
सर्वेश सिंह यांना भाजपने चौथ्यांदा मुरादाबाद लोकसभा मतदारसंघातून तिकीट दिलं आहे. यापूर्वी 2009मध्ये त्यांनी माजी क्रिकेटपटू अझरुद्दीन यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. त्यानंतर 2014मध्ये त्यांचा सामना समाजवादी पार्टीच्या डॉ. एसटी हसन यांच्याशी झाला. या निवडणुकीत सर्वेश सिंह विजयी झाले होते. त्यानंतर 2019च्या निवडणुकीतही त्यांनी लढत दिली होती. पण त्यावेळी त्यांना पराभूत व्हावं लागलं होतं.