लोकसभा निवडणुकीचा पहिला टप्पा संपला आहे. आता दुसरा टप्पा २६ एप्रिल रोजी होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वत: निवडणूक प्रचारात गुंतले आहेत. महायुतीच्या उमेदवारांचा एकत्र प्रचार केला जात आहे. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सभांनाही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जात आहेत. या सर्व धावपळीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होणार आहे? याबाबत माहिती दिली. येत्या लोकसभा निवडणुकीनंतर राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होणार असल्याचे एकनाथ शिंदे यांनी एका मुलाखतीत सांगितले.
शिवसेनेने दोन विद्यमान खासदारांना उमेदवारी का दिली नाही? या संदर्भात बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, भावना गवळी आणि हेमंत पाटील यांना पुन्हा उमेदवारी दिली नाही. त्याची कारणे वेगळी आहेत. भाजपच्या सर्वेक्षणामुळे त्यांची उमेदवारी नाकारलेली नाही. हिंगोलीत हेमंत पाटील यांच्या पत्नी राजश्री पाटील यांना उमेदवारी दिली आहे. तसेच भावना गवळी यांना अधिक चांगली जबाबदारी देण्यात येणार आहे. यामुळे त्यांना उमेदवारी दिली गेली नाही.
सध्या आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री करण्याचा विषयाची चर्चा सुरु आहे. उद्धव ठाकरे यांनी हा मुद्दा पुढे आणला. उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांनी आदित्यला अडीच वर्ष मुख्यमंत्री करण्याचा प्रस्ताव दिल्याचे सांगितले होते, असा दावा केला होता. त्याला फडणवीस यांनी मुख्यमंत्री लांब साधे मंत्री देखील आदित्यला करणार नाही, असे उत्तर दिले. आता त्यावर एकनाथ शिंदे यांनीही मत व्यक्त केले आहे. माझ्याकडे नगरविकास खाते होते. परंतु माझ्या खात्यात कोणत्याही अधिकाराशिवाय आदित्य ठाकरे यांचा हस्तक्षेप होत होता.
अनेक वेळा ते नगरविकास, एमएमआरडीए, सिडको आणि महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या बैठका परस्पर होते होते. आदित्य ठाकरे यांना मुख्यमंत्री बनवण्याच्या मार्गात उद्धव ठाकरे यांना मी स्पीडब्रेकर वाटत होतो. तसेच उद्धव ठाकरे माझ्याकडून नगरविकास खाते काढून घेण्याचा डाव आखत होते. मला नक्षलवाद्यांकडून धमकी मिळाल्यानंतर माझी झेड प्लस सुरक्षा काढून घेतली, असा आरोप एकनाथ शिंदे यांनी केली.