प्रतिष्ठेच्या लढाईत वयाच्या 83 व्या वर्षीही शरद पवारांची अजित पवारांना धोबीपछाड

| Updated on: Jun 05, 2024 | 9:41 PM

शरद पवार आणि अजित पवारांपैकी लोकसभेच्या निवडणुकीत जनतेनं शरद पवारांना पसंती दिली. तर अजित पवारांना पत्नीलाही निवडणूक आणता आलेलं नाही. वयाच्या 83 व्या वर्षीही शरद पवारांनी अजित पवारांना कसा राजकीय धोबीपछाड दिलाय पाहुयात.

प्रतिष्ठेच्या लढाईत वयाच्या 83 व्या वर्षीही शरद पवारांची अजित पवारांना धोबीपछाड
Follow us on

फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या नजरा लागलेल्या बारामतीच्या लढाईत मोठे पवार, अर्थात शरद पवारांनीच बाजी मारली. आणि पूर्ण ताकद लावूनही अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांचा पराभव झाला. प्रतिष्ठेच्या लढाईत बारामती मतदारसंघातल्या जनतेनं अजित पवारांना नाकारत शरद पवारांच्याच बाजूनं उभं असल्याचं दाखवून दिलं.

सुप्रिया सुळेंनी 7 लाख 32 हजार 312 मतं घेतली आणि अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवारांना 5 लाख 73 हजार 979 मतं मिळाली म्हणजेच 1 लाख 58 हजार 333 मतांनी सुप्रिया सुळे यांनी अजित पवारांच्या पत्नीचा पराभव केला. पण बारामतीच्या पराभवाला अजित पवार गटाचे प्रवक्ते अमोल मिटकरींनी भाजप आणि शिंदे गटाला जबाबदार धरलंय. आणि दगाफटका केल्याचा आरोप केलाय.

विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीआधी शिंदे गटाचे नेते विजय शिवतारे आणि भाजपचे नेते हर्षवर्धन पाटलांनी असहकाराचं धोरण स्वीकारलं होतं. पण नंतर बैठकांमध्ये मार्ग निघाला आणि दोघांनीही मदतीचा वायदा केला. मात्र प्रत्यक्ष निकालातच या दोन्ही नेत्यांचा मतदारसंघात सुनेत्रा पवार पिछाडीवर आहेत.

बारामती लोकसभा मतदारसंघात, एकूण 6 मतदार संघ आहेत. अजित पवारांच्याच बारामती मतदारसंघात सुप्रिया सुळेंना 47 हजार 381 मतांची आघाडी मिळाली. आधी इशारा नंतर सोबत आलेल्या शिंदे गटाचे नेते विजय शिवतारेंच्या पुरंदरमधून प्रिया सुळेंनाच लीड मिळाला, 35 हजार 281 मतांनी सुळेंनी आघाडी घेतली.

भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार असलेल्या इंदापूर विधानसभा मतदारसंघातही सुप्रिया सुळेच आघाडीवर आहेत. सुळेंना इथं 25 हजार 951 मतांनी आघाडी मिळाली. भोरमध्ये काँग्रेसचे संग्राम थोपटे आमदार आहेत. इथूनही सुप्रिया सुळेंनाच 43 हजार 805 मतांचा लीड मिळाला.

दौंडमध्ये भाजपचे राहुल कुल आमदार आहेत. इथंही 26 हजार 337 मतांची सुप्रिया सुळेंनाच आघाडी मिळाली. भीमराव तापकीर हे भाजपचे आमदार असलेल्या खडकवासल्यात फक्त सुनेत्रा पवारांना 20 हजार 746 मतांची आघाडी मिळाली.

एकूण दीड लाखांच्या पराभवामुळंच अमोल मिटकरींनी स्थानिक भाजप आणि शिंदे गटावरच आरोप केलेत. शरद पवार आणि अजित पवार या राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादी या लढाईत शरद पवारांनीच बाजी मारली.

शरद पवारांनी महाविकास आघाडीत 10 जागा लढल्या आणि त्यांपैकी तब्बल 8 जागा जिंकल्या. म्हणजेच 80 %चा स्ट्राईक रेट
अजित पवारांनी महायुतीत 4 जागा लढल्या आणि त्यापैकी रायगडची तटकरेंची एकमेव जागा जिंकली. अजित दादांचा स्ट्राईक रेट आहे, फक्त 25 %

  • बारामतीत सुप्रिया सुळे आणि सुनेत्रा पवारांच्या लढाईत शरद पवार गटाच्या सुळे जिंकल्या.
  • शिरुरमध्येही राष्ट्रवादी विरुद्ध राष्ट्रवादीच्या लढाईत अमोल कोल्हेंनी शिवाजीराव आढळरावांना पराभूत केलं
  • अहमदनगरमध्ये निलेश लंकेंनी भाजपच्या सुजय विखेंना पराभव केला
  • बीडमध्ये बजरंग सोनावणेंनी भाजपच्या दिग्गज नेत्या पंकजा मुंडेंचा पराभव केला
  • माढ्यात धैर्यशील मोहितेंनी भाजपच्या रणजित सिंह निंबाळकरांना पराभूत केलं
  • वर्ध्यात पवार गटाच्या अमर काळेंनी भाजपचे विद्यमान खासदार रामदास तडस यांना पराभूत केलं
  • दिंडोरीत भास्कर भगरे यांनी भाजपच्या केंद्रीय मंत्री डॉ. भारती पवारांना पराभूत केलं
  • भिवंडीत बाळ्या मामा म्हात्रेंनी भाजपचे केंद्रीय मंत्री कपिल पाटील यांना हरवलं.

म्हणजेच 6 ठिकाणी शरद पवारांच्या राष्ट्रवादीनं भाजपला पराभूत केलं. ज्यात 2 केंद्रीय मंत्र्यांचा समावेश आहे. त्यामुळं शरद पवारांनी जनतेची मानसिकता कळेल, असा टोला अजित पवारांना लगावला. तर अजित पवारांनी, पराभव मान्य करत नव्यानं तयारीनं उतरणार असल्याचं म्हटलंय.

राष्ट्रवादी काँग्रेस आणि महायुतीला राज्यात अपेक्षित यश मिळू शकलं नसलं तरी, भविष्यात हे चित्र बदलण्याची ताकद आपल्यात आहे. कुठलंही अपयश अंतिम नसतं. अपयशानं खचून न जाता नव्या उत्साहानं, उमेदीनं सर्व कार्यकर्त्यांनी पुन्हा एकदा स्वत:ला लोकसेवेला वाहून घ्यावं. महायुतीचे सर्व कार्यकर्ते चार महिन्यांनी होणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीसाठी कामाला लागतील.

राष्ट्रवादीत फूट पडल्यानंतरही अजित पवारांनी सुप्रिया सुळेंविरोधातच पत्नीलाच उमेदवारी दिली. अजित पवारांनी बारामतीत छोट्या मोठ्या अशा तब्बल 20 सभा घेतल्या. याउलट शरद पवारांनी बारामतीत फक्त 1 सभा आणि बारामती मतदारसंघात एकूण 6 सभा घेतल्या. काका शरद पवारांशी बंड करुन अजित पवारांनी पक्ष आणि चिन्हंही मिळवलं. पण जनता शरद पवारांसोबत आहे, हे लोकभेच्या निकालातून स्पष्ट झालं.