पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप; माजी रेल्वे मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश

| Updated on: Mar 06, 2021 | 12:49 PM

निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ सुरू झाली आहे. (Former TMC MP Dinesh Trivedi joins BJP in presence of JP Nadda)

पश्चिम बंगालमध्ये राजकीय भूकंप; माजी रेल्वे मंत्र्याचा भाजपमध्ये प्रवेश
दिनेश त्रिवेदी, माजी खासदार, तृणमूल काँग्रेस
Follow us on

कोलकाता: निवडणुकांच्या तारखा जाहीर होताच पश्चिम बंगालच्या राजकारणात खळबळ सुरू झाली आहे. ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील टीएमसीच्या 76 नेत्यांनी थेट भाजप नेत्यांची भेट घेऊन भाजपमध्ये प्रवेश करण्याची इच्छा व्यक्त केली आहे. त्यानंतर आता ममता बॅनर्जी यांना आणखी एक झटका बसला आहे. ममता दीदींचे विश्वासू सहकारी आणि, माजी रेल्वे मंत्री, माजी खासदार दिनेश त्रिवेदी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला आहे. ममता बॅनर्जींसाठी हा मोठा झटका असल्याचं बोललं जात आहे. (Former TMC MP Dinesh Trivedi joins BJP in presence of JP Nadda)

भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्या उपस्थितीत माजी खासदार दिनेश त्रिवेदी यांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. सकाळपासूनच त्रिवेदी यांच्या भाजपप्रवेशाच्या चर्चा सुरू झाल्याने टीएमसीच्या तंबूत प्रचंड खळबळ उडाली होती. त्रिवेदी यांनी पत्रकार परिषद घेऊन एकट्यानेच भाजपमध्ये प्रवेश केला आहे. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपकडून त्रिवेदी यांच्यावर मोठी जबाबदारी दिली जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता

त्रिवेदी हे तृणमूलचे राज्यसभा सदस्य होते. विशेष म्हणजे संसदेचं कामकाज सुरू असतानाच त्यांनी राजीनामा दिला होता. देशाच्या इतिहासात पहिल्यांदाच एखाद्या खासदाराने संसदेचं कामकाज सुरू असताना राजीनामा दिला होता. पक्षात जीव गुदमरत असल्यानेच आपण राजीनामा दिल्याचं त्यांनी म्हटलं होतं.

रेल्वेमंत्री होते त्रिवेदी

2011मध्ये ममता बॅनर्जी यांनी रेल्वेमंत्रीपद सोडून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती. त्यावेळी ममता बॅनर्जी यांनी त्रिवेदी यांना रेल्वेमंत्री केलं होतं. त्यावरून त्रिवेदी हे ममता दीदींचे अत्यंत जवळचे असल्याचं स्पष्ट होतं आहे.

76 नाराजही सोडचिठ्ठी देणार?

दरम्यान, भाजपला पराभूत करत बंगालचा गड कायम राखण्यासाठी ममता बॅनर्जी यांन कसरत सुरू केलेली असताना तिकीट न मिळाल्याने पक्षात मोठ्या प्रमाणावर नाराजी निर्माण झाली आहे. त्यामुळे या नाराजांनी आता थेट भाजप नेते मुकुल रॉय यांची भेट घेऊन भाजपमध्ये येण्याची इच्छा व्यक्त केली आहे. या 76 नाराजांमध्ये माजी आमदारही आहेत. तसेच ज्या 28 आमदारांचे तिकीट कापण्यात आले ते सुद्धा भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता आहे. या शिवाय विद्यमान आमदार दिनेश बजाज आणि गीता बख्शी हे सुद्धा भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे.

पश्चिम बंगालमध्ये 8 टप्प्यात मतदान

पहिला टप्पा – 27 मार्च, 30 जागा
दुसरा टप्पा – 1 एप्रिल, 20 जागा
तीसरा टप्पा – 6 एप्रिल, 31 जागा
चौथा टप्पा – 10 एप्रिल, 44 जागा
पाचवा टप्पा – 17 एप्रिल, 45 जागा
सहावा टप्पा – 22 एप्रिल, 43 जागा
सातवा टप्पा – 26 एप्रिल, 36 जागा
आठवा टप्पा – 29 एप्रिल, 25 जागा
मतमोजणी आणि निकाल – 2 मे रोजी (Former TMC MP Dinesh Trivedi joins BJP in presence of JP Nadda)

 

संबंधित बातम्या:

तृणमूल काँग्रेसला सर्वात मोठं खिंडार?, नाराज 76 नेते मुकुल रॉय यांना भेटले; भाजप प्रवेशाची शक्यता

बंगालमध्ये M फॅक्टरचीच लढाई; भाजपच्या ‘जय श्रीराम’च्या नाऱ्याविरोधात दीदीचे स्पेशल ’42 M’ वाचा स्पेशल रिपोर्ट

आसाममध्ये भाजपचा युतीचा फॉर्म्युला ठरला; वाचा भाजप किती जागांवर लढणार

(Former TMC MP Dinesh Trivedi joins BJP in presence of JP Nadda)