मनोहर पर्रिकर (Manohar Parrikar) होते त्यावेळेस गोव्याचे प्रभारी होते नितीन गडकरी. आता पर्रिकर नाहीत तर तिथले प्रभारी म्हणून महाराष्ट्राचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) काम पहातायत. गोवा छोटं राज्य असलं तरीसुद्धा भाजपानं त्यासाठी आधी काय काय करुन सत्ता आणली तो इतिहास आहे. पण यावेळेस गोव्याची निवडणूक दोन कारणांमुळे महाराष्ट्रात चर्चेत आहे. पहिलं कारण म्हणजे फडणवीस आणि राऊत या दोघात रोज सुरु असलेले आरोप प्रत्यारोप आणि दुसरं कारण आहे ते मनोहर पर्रिकरांचा मुलगा उत्पल्ल पर्रिकर. उत्पल पर्रिकरांनी (Utapal Parrikar) गोव्याची विधानसभा निवडणूक लढण्याची इच्छा व्यक्त केलीय. पण त्यासाठी भाजपा राजी नसल्याचं दिसतंय. त्यातच फडणवीसांनी जे वक्तव्य केलंय त्यानंतर तर उत्पल पर्रिकरांना तिकीट मिळण्याची शक्यता धूसर होत चाललेली दिसतेय.
काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
देवेंद्र फडणवीस गोव्यात तळ ठोकून आहेत. काल त्यांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली ती पंतप्रधानांच्या पंजाब दौऱ्यातल्या घडलेल्या चुकीच्या निर्णयावर. पण त्यांना उत्पल पर्रिकरांबद्दल प्रश्न विचारला त्यावेळेस ते म्हणाले, असंय की मनोहर भाईंनी गोव्यामध्ये भारतीय जनता पार्टी इस्टॅबलिश करण्या करता भरपूर काम केलेलं आहे. पण केवळ मनोहरभाईंचा किंवा एखाद्या नेत्याचा मुलगा आहे म्हणून भारतीय जनता पार्टीत तिकीट मिळत नाही. त्यांचं कर्तृत्व असेल तर त्यांचा विचार होतो. त्यामुळे या संदर्भातला जो निर्णय घ्यायचाय, तो मी घेऊ शकत नाही, आमचं जे पार्लमेंटरी बोर्ड आहे, हेच त्यासंदर्भातलं निर्णय घेऊ शकतं.
उत्पल पर्रिकरांची भूमिका काय?
उत्पल पर्रिकर हे मनोहर पर्रिकरांचे पूत्र आहेत. मनोहर पर्रिकरांच्या निधनानंतर पणजी सीटवरुन त्यांनी निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती. पण त्यावेळेस भाजपनं त्यांना तिकीट दिलं नाही. त्यांच्याऐवजी कुंकोळीकर यांना उमेदवारी दिली गेली. त्यात कुंकोळीकर काँग्रेसच्या बाबूश मोन्सेरेट यांच्याकडून पराभूत झाले. नंतर हे बाबूश काही काँग्रेस आमदारांसह भाजपात दाखल झालेत. पणजी विधानसभा मतदारसंघ हा मनोहर पर्रिकरांचा पारंपारीक मतदारसंघ होता. पण बाबूश यांनी भाजपच्या बाजूनं सहानुभूती असतानाही निवडणूक जिंकली होती. आताही त्यांनीच पणजीच्या जागेवर दावा केलाय. पण दुसरीकडे उत्पल पर्रिकरांनीही पुन्हा दंड थोपटलेत. त्यामुळे पणजीसाठी उत्पल पर्रिकर की बाबूश मॉन्सेरेट अशी चर्चा सुरु होती. फडणवीसांनी अप्रत्यक्षपणे त्याचा फैसला दिल्याचं चित्रं आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकर त्यांनीच म्हटल्याप्रमाणे ‘हार्ड डिसिजन’ घेणार का? याची उत्सुकता आहे.
राऊतांचं धाडसाचं आवाहन
उत्पल पर्रिकरांना गळाला लावण्याचे सर्व प्रयत्न शिवसेना करताना दिसेतय. राजकारणात टिकण्यासाठी जे एक धाडस असायला लागतं ते उत्पल पर्रिकर दाखवणार का हा सर्वस्वी त्यांना निर्णय घ्यायचाय असं राऊत प्रेस कॉन्फरन्समध्ये म्हणालेत. गेल्या दोन तीन दिवसात ज्यावेळेसही राऊतांना हा प्रश्न विचारला गेलाय, त्या त्या वेळेस त्यांनी उत्पल पर्रिकरांना ‘धाडस’ दाखवण्याचं आवाहन केलंय.
हे सुद्धा वाचा: