पणजी: पणजीतून अपक्ष म्हणून निवडणूक लढतानाच भाजपचे बंडखोर नेते उत्पल पर्रिकर यांनी भाजपला धर्मसंकटात टाकलं आहे. माझ्या मनात रोजच भाजप आहे. आता भाजपने मला सोडलं का हे तुम्ही त्यांनाच विचारा, असं सांगून उत्पल पर्रिकर यांनी भाजपच्या कोर्टात चेंडू टाकला आहे. त्यामुळे पक्षविरोधी कारवाया केल्याप्रकरणी भाजप उत्पल पर्रिकरांची पक्षातून हकालपट्टी करणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
उत्पल पर्रिकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या त्यांच्या उमेदवारीवर भाष्य केलं. उत्पल यांनी मीडियाशी मनमोकळा संवाद साधताना भाजप नेत्यांना चिमटेही काढले. अपक्ष निवडणूक लढत आहात, तर तुम्ही भाजप सोडणार का? असा सवाल त्यांना विचारण्यात आला. त्यावर माझ्या मनात भाजप रोज असणार. भाजपने मला सोडलंय का ते तुम्ही त्यांनाच विचारा, असं सांगत उत्पल यांनी भाजपच्या कोर्टात चेंडू टाकला.
भाजपने पणजीत असा उमेदवार दिला त्यावर बोलायला मला लाज वाटते. त्यामुळे मला पर्याय राहिला नाही. म्हणून मी अपक्ष म्हणून निवडणूक लढत आहे, असं सांगतानाच माझ्या पार्टीच्या ऑफर घेतल्या नाही मी इतर पक्षाच्या ऑफरचा विचारही करू शकत नाही. मला लोकांना पर्याय द्यायचा आहे. माझ्यासाठी पर्याय मागत नाही, असं त्यांनी स्पष्ट केलं.
पणजीच्या लोकांनी केवळ मनोहर पर्रिकरांना मतदान दिलं होतं. कारण पर्रिकर हे मूल्यांच्या बाजूने होते. त्यामुळे मीही या मूल्यांना घेऊन लढत आहे. माझ्या वडिलांनी पक्ष मजबूत केला. मलाही पणजी मतदारसंघ मजबूत करायचा आहे. मला पणजीतून उमेदवारी दिली नाही. केवळ संधीसाधूला तिकीट दिलं आहे. दोन वर्षापूर्वी पक्षात आलेल्यांना तिकीट दिलं. त्यामुळे मी पणजीतून अपक्ष म्हणून लढणार आहे, असं ते म्हणाले.
मी खूप मोठी रिस्क घेत आहे. मी फार कठिण मार्ग निवडला आहे. माझ्या करियवर खूपजणांनी चिंता व्यक्त केली होती. माझ्या राजकीय भवितव्याची कुणी चिंता करू नये, गोव्याची जनता माझी चिंता करेल, असा टोला त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना लगावला.
गेल्यावेळीही मला संधी नाकारली होती. आताही नाकारली आहे. इथल्या लोकांना माहीत आहे. सध्या ज्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत, त्यावरून हे मनोहर पर्रिकराच्या पार्टीतील निर्णय वाटत नाही. कधी तरी जनतेसाठी थांबावं लागतं. मी अपक्ष लढतोय. माझं राजकीय करिअर मी पणजीच्या लोकांच्या हाती ठेवलं आहे. मी कोणत्याही पदासाठी मी लढत नाही. मूल्यांसाठी माझी लढाई आहे. हे युद्ध कठिण आहे. मला काही तरी मिळेल यासाठी मी काही करत नाही. पणजीचे लोक 30 वर्ष माझ्या वडिलांसोबत होते. येथील वर्ग उच्च शिक्षित आहे. त्यामुळे मी त्यांच्यासोबत जात आहे. माझ्या वडिलांची जी इमेज होती तीच इमेज मला द्यायची होती. मी पक्षातून त्यासाठी प्रयत्न केला. पण त्यात मी यशस्वी झालो नाही, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
भाजपची पहिली यादी जाहीर, 34 उमेदवारांना मिळाली संधी; तिकीट वाटपात जातीय समीकरण ?