गोव्यासाठी विधानसभा निवडणुकांचं (Goa Assembly Elections 2020) बिगुल वाजलेलं आहे आणि राजकीय पक्ष एकमेकांच्याविरोधात फास टाकताना दिसतायत. शिवसेनेचे नेते संजय राऊत यांनी आज प्रेस कॉन्फरन्समध्ये गोव्यावर जास्तीत जास्त भर दिला. विशेष म्हणजे राऊतांनी दिवंगत मनोहर पर्रिकर (Late Manohar Parrikar) यांच्या मुलावर भाष्य केलं. गोव्यात भाजपाचे मुख्यमंत्री आहेत प्रमोद सावंत. पण भाजपची गोव्यात कुठली पुण्याई असेल तर ती आहे मनोहर पर्रिकरांचं काम. त्याच शिदोरीवर अजूनही भाजपा निवडणुकांचे ढोल वाजवतेय. आता पर्रिकरांच्या मुलालाच गळाला लावून भाजपची अडचण करण्याचा प्रयत्न शिवसेना करताना दिसतेय. प्रश्न आहे मनोहर पर्रिकर यांचा मुलगा उत्पल पर्रिकरांचा. त्यांना तिकीट देणार का? अशा सवालावर संजय राऊतांनी सविस्तर स्पष्टीकरण दिलं. त्यात काही डावपेचही आहेत.
काय म्हणाले संजय राऊत?
संजय राऊत आघाडीचं सरकार आलंय तेव्हापासून रोज सकाळी प्रेस कॉन्फरन्स घेतात. कधी ते आघाडीतल्या मुद्यांवर बोलतात तर कधी मोदींच्या. सध्या पाच राज्यात विधानसभा निवडणुकांची घोषणा झालीय. त्यात गोव्यात शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र निवडणूक लढतायत. प्रतिस्पर्धी म्हणून अर्थातच भाजपा आहे. आज पत्रकारांनी राऊतांनी मनोहर पर्रिकरांच्या मुलाला शिवसेना तिकीट देणार का म्हणून विचारलं तर राऊत म्हणाले- दादरा नगर हवेलीमध्ये आम्ही लोकसभेची निवडणूक जिंकलो. दिवंगत मोहन डेलकर यांचं कुटुंब शिवसेनेत आलं आणि आम्ही संपूर्ण ताकद पणाला लावली. जर पर्रिकरांच्या कुटुंबानं हिंदुत्ववादी म्हणून शिवसेनेसोबत संबंध जोडण्याचा प्रयत्न केला तर नक्कीच शिवसेना त्यांच्यासाठी ताकद पणाला लावेल. उत्पल पर्रिकर यांनी हिंमत दाखवायला हवी. त्यांच्या वडीलांनी गोव्यात भारतीय जनता पक्षाला एक स्थान निर्माण करुन दिलं. त्यांच्या वडीलांनी भारतीय जनता पक्ष गोव्यात रुजवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्याच प्रतिमेवर भारतीय जनता पक्ष टिकलाय. नाही तर तो गोव्यात आयाराम गयारामवरच होता. त्यामुळे हे उत्पल पर्रिकरांवर अवलंबून आहे की त्यांनी काय करावं. शेवटी राजकारणात काही निर्णय हिंमतीनं, धाडसानं घ्यायला लागतात. शिवसेना हा एक हिंदुत्ववादी पक्ष आहे आणि भारतीय जनता पक्षाला पर्याय म्हणून लोक शिवसेनेचा भविष्यात विचार करतील असं मला वाटतं.
मुख्यमंत्री सावंतांना उत्तर
गेल्या काही दिवसांपासून गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत आणि संजय राऊत यांच्यावर आरोप प्रत्यारोप होतायत. त्यावरही बोलताना संजय राऊत म्हणाले- गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत हे जमीनी वर चार हात चालतायत. त्यांना माझ्या शुभेच्छा आहेत. ते म्हणतात की गोव्यात शिवसेनेला काय महत्व आहे, भारतीय जनता पार्टीला तरी कधी काळी लोक विचारायचे गोव्यात काय महत्व आहे म्हणून पण येणारा काळ ठरवले गोव्यात हिंदुत्ववादी पक्ष म्हणून शिवसेना रहाते की भाजपा?
कोण आहेत उत्पल पर्रिकर?
उत्पल पर्रिकर (Utapal Parrikar) हे मनोहर पर्रिकर यांचे चिरंजीव आहेत आणि पर्रिकरांच्या निधनानंतर रिकाम्या झालेल्या पणजी विधानसभा मतदारसंघातून ते तिकीट लढवू इच्छित होते. त्यांची इंजिनिअरींगची फर्म आहे जी मनोहर पर्रिकर यांनीच स्थापन केलीय. पर्रिकरांच्या निधनानंतर उत्पल पर्रिकरांना तिकीट मिळेल अशी आशा होती पण त्यांच्याऐवजी पर्रिकरांचेच एकनिष्ठ सिद्धार्थ कुंकोळीकर यांना भाजपानं तिकीट दिलं. पर्रिकरांच्या निधनानं निर्माण झालेली सहानुभूती असतानाही भाजपचे कुंकोळीकर पोटनिवडणूकीत पडले. त्यांना काँग्रेस बाबुश मॉन्सरेट यांनी पाडलं. आश्चर्य म्हणजे 90 पासून पणजी हा मनोहर पर्रिकरांचा बालेकिल्ला होता आणि तिथं त्यांच्या निधनानंतर भाजपचा उमेदवार पडला. आताची राजकीय स्थिती वेगळी आहे. काँग्रेसच्या तिकीटावर जिंकलेले मॉन्सरेट हेही भाजपसोबतच आहेत. त्यांची पत्नीही आमदार आहे. त्याच पणजी जागेवर पुन्हा एकदा उत्पल पर्रिकर यांनी दावा केलाय आणि भाजपनं जर तो दावा यावेळेस फेटाळला तर हार्ड डिसीजन घ्यायला मागे पुढे पहाणार नसल्याचेही म्हटलंय. त्यामुळेच शिवसेनेनेही आता उत्पल पर्रिकरांना गळाला लावण्याचा प्रयत्न केलाय. त्यामुळेच राऊत उत्पल पर्रिकरांना धाडसी निर्णय घेण्याचा सल्ला देतायत.
हे सुद्धा वाचा:
corona cases India : कोरोना रुग्णसंख्येचा वाढता आलेख, पावणे दोन लाखांचा टप्पा पार, ओमिक्रॉन बाधितांची संख्या वाढली
Grape : द्राक्ष बागांमध्येच कशामुळे पेटत आहेत शेकोट्या ? लागवडीपासून तोडणीपर्यंत जीवघेणी कसरत