पणजीः गोवा विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नव-नवीन घडामोडी समोर येत आहेत. विशेष म्हणजे राजधानी पणजी मतदार संघ आणि माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांचे चिरंजीव उत्पल पर्रीकर यांच्याकडे गोवेकरांचे आणि देशाचे लक्ष लागले आहे. गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी उत्पल पर्रीकर यांना पणजीमधून उमेदवारी दिली नसल्याचे जाहीर केले. भाजपकडून बाबूश मॉन्सेरात हे पणजीतून उमेदवार आहेत. त्यातच आज शिवसेनेने आरएसएसचे शिलेदार आणि गोव्यातील सामाजिक चळवळींचा नेता शैलेंद्र वैलिंगकर यांना पणजीतून उमेदावरी जाहीर केली आहे. त्यामुळे नाराज झालेले उत्पल पर्रीकर आता कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
गोवा विधानसभा निवडणुकीच्या आखाड्यात प्रथमच उतरत असलेल्या शिवसेनेने आज उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. गोव्यातील ज्येष्ठ राजकीय नेते सुभाष वेलिंगकर यांचे चिरंजीव आणि RSS चे शिलेदार शैलेंद्र वेलिंगकर यांना पणजीतून उमेदवारी देण्याचे शिवसेने जाहीर केले आहे. शैलेंद्र वेलिंगकर यांच्यावर शिवसेनेने विधानसभा निवडणुकीसाठी पक्ष संघटनाची प्रमुख जबाबदारीदेखील सोपवली आहे. भाजपच्या बाबूश मॉन्सेरात यांच्याविरोधात शिवसेनेने तगडा उमेदवार उतरवला आहे.
गोवा भाजपचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांनी काल गोव्यातील उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. त्यात पणजी मतदारसंघातून अतनासिओ उर्फ बाबूश मॉन्सेरात यांना उमेदवारी दिली आहे. या मतदारसंघातून त्यांनाच उमेदवारी मिळणार हे निश्चित होतं. मात्र उत्पल पर्रीकर यांनी मॉन्सेरात यांच्या नावाला विरोध केला होता. मॉन्सेरात यांना उमेदवारी दिली तर मी गप्प बसणार नाही, अशा इशारा त्यांनी दिला होता. मात्र भाजपने उत्पल पर्रीकर यांना दोन जागांचा पर्याय दिला असून त्यापैकी एका जागेसाठी त्यांनी नकार दिला असून दुसऱ्या जागेविषयी त्यांची समजूत घालणं सुरु आहे, अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली होती.
काहीही झालं तरी पणजीतून उत्पल पर्रीकर यांचा पाठींबा देणार असं शिवसेनेनं याआधी जाहीर केलं होतं. मात्र आता शैलेंद्र वेलिंगकर यांच्यासारखा मोठा मासा गळाला लागल्यावर शिवसेनेने आपले शब्द फिरवले आणि पणजीतून शैलेंद्र यांना उमेदवारी दिली. आता पणजीतून भाजप विरोधात शिवसेना अशी जंगी लढत पहायला मिळणार आहे. मात्र नाराज झालेले उत्पल पर्रीकर आता कोणती भूमिका घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
इतर बातम्या-