पणजी: गोव्यात महाविकास आघाडीचा प्रयोग फसल्यानंतर शिवसेना नेते संजय राऊत यांनी काँग्रेसवर जोरदार हल्ला चढवला आहे. गोव्यात काँग्रेसला 40 पैकी 45 जागा मिळतील असं त्यांना वाटतं. त्यामुळेच काँग्रेस आघाडी करण्यास इच्छूक नसावी, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
शिवसेना नेते संजय राऊत यांनी टीव्ही 9 मराठीशी विशेष संवाद साधताना त्यांनी काँग्रेसला टोले लगावले. काँग्रेसचं माहीत नाही, पण शिवसेना आणि एनसीपी गोव्यात एकत्र आहेत. काँग्रेससाठी आम्ही प्रयत्न केला. त्यांच्यासोबत चर्चा केली. पण त्यांना असं वाटतं 40 पैकी 45 जागा मिळतील. पैकीच्या पैकी जागा त्यांना गोव्यात मिळू शकतात असं त्यांना वाटतं. इतका आत्मविश्वास एखाद्या पक्षावला असेल तर आपण त्यांच्या आत्मविश्वासाला कशाला तडा द्यायचा? त्यांनी 40 पैकी 45 जागा जिंकल्या तरी हरकत नाही, असा चिमटा राऊत यांनी काढला.
काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्याशी माझी चर्चा झाली. स्थानिक स्तरावरही चर्चा झाली. दिगंबर कामत, दिनेश गुंडूराव, गिरीश तोडणकर यांच्याशी चर्चा केली. त्यांचा सकारात्मक सूर असला तरी जागा वाटपाच्यावेळी त्यांच्या अडचणी येतात. आम्हाला दोन-तीन जागा देण्याचा प्रस्ताव त्यांनी नक्कीच ठेवला होता. आमची चर्चा झालीच नाही. चर्चेतून काहीच निष्पन्न झालं नाही असं मी म्हणणार नाही. चर्चा झाली. आम्हाला त्यांनी काही जागा देण्याचा प्रस्ताव दिला होता. पण आमच्यासोबत राष्ट्रवादीही आहे. त्यांचाही विचार व्हायला पाहिजे. महाविकास आघाडी जेव्हा आपण बोलतो तेव्हा केवळ शिवसेना राहत नाही. राष्ट्रवादी आहे. त्यांना कोणत्या जागा हव्यात, ते कोणत्या जागांवर लढू इच्छितात यावर चर्चा होणं गरजेचं आहे. ती होऊ शकली नाही. त्याच्यामुळे आम्ही काँग्रेसला शुभेच्छा दिला, असं ते म्हणाले.
ज्या जागा राष्ट्रवादीला हव्या होत्या त्या सोडायला काँग्रेस तयार नाही. काँग्रेस गोव्यातील मोठा पक्ष आहे. काँग्रेस अनेक वर्ष सत्ताधारी पक्ष होता. मागच्यावेळी त्यांना सर्वाधिक जागा मिळाल्या. 17 आमदार त्यांचे निवडून आले होते. आता त्यांच्याकडे दोन तीन आमदार राहिले आहेत. त्यांना वाटतं लोकांचा पाठिंबा अजून त्यांना आहे. असेल तर दिसेल. आम्हाला वाटत होतं की, काँग्रेसने 40 पैकी 30 जागा लढाव्यात. उरलेल्या दहा जागा शिवसेना, राष्ट्रवादी आणि त्यांचा मित्र पक्ष असलेल्या गोवा फॉरवर्डला द्याव्यात असं आम्हाला वाटत होतं. या दहा जागांवर आमचं समाधान झालं होतं. पण त्यांना त्याही जागा द्यायच्या नसतील तर त्यांच्याकडे एकापेक्षा जास्त उमेदवार एका मतदारसंघात असतील तर त्यांची अडचण समजू शकतो, असंही त्यांनी सांगितलं.
गोव्यात आम्ही 12 ते 15 जागांवर लढणार आहोत. आमची यादी तयार आहे. राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल आल्यावर आम्ही यादी फायनल करू. पटेल सध्या गोंदिया भंडाऱ्याच्या निवडणुकीत व्यस्त आहेत. ते आल्यावर निर्णय घेऊ. आदित्य ठाकरेंनी एक टीम गोव्यात पाठवली आहे. आदित्यच्या नेतृत्वात प्रमुख नेत्यांची बैठक झाली. आम्ही ज्या जागा लढवत आहोत. त्यातील काही जागांवर लक्ष देऊ, असंही त्यांनी सांगितलं. गोव्यात आमचा मंत्री असेल असंही त्यांनी स्पष्ट केलं.
शिवसेना, राष्ट्रवादी आणि तृणमूल एकत्र येण्याची वेळ निघून गेली आहे. शिवसेनेतून लढणारे सर्व आम आदमीच आहे. आमच्या हातात झाडू आणि धनुष्यबाणही आहे, असं सांगत गोव्यातील आघाडीत तृणमूल काँग्रेस नसेल असं त्यांनी स्पष्ट केलं.
संबंधित बातम्या:
Startup India: 16 जानेवारी हा दिवस ‘नेशनल स्टार्ट-अप डे’ म्हणून साजरा करणार; पंतप्रधान मोदींची घोषणा