पणजी: गोव्याातील राजकारणात उत्पल पर्रिकर यांचं योगदान काय? हे विचारण्यापेक्षा राजकारणातील ग्रेट गॅम्बलर्स आणि ठकस् ऑफ गोवा घेऊन तुम्ही निवडणुका लढू इच्छिता का? देवेंद्र फडणवीसांचं गोव्यात येऊन अध:पतन झालं आहे त्याचं वाईट वाटतं. फडणवीस साहेबांकडे आम्ही वेगळ्या पद्धतीने पाहतो. पण गोव्याची हवा त्यांना लागलेली दिसते, अशी खोचक टीका शिवसेना नेते संजय राऊत यांनी भाजप नेते देवेंद्र फडणवीस यांच्यावर केली आहे.
गोव्यातील भाजप नेते उत्पल पर्रिकर यांनी तिकीट वाटपावरून भाजप नेत्यांवर हल्लाबोल केला आहे. गोव्यात खुनी, बलात्कारींना तिकीट मिळतं. मला का मिळत नाही? असा सवाल उत्पल पर्रिकर यांनी केला होता. याकडे संजय राऊत यांचं लक्ष वेधलं असता राऊत यांनी फडणवीसांवर खोचक टीका केली. उत्पल पर्रिकर यांच्या मताशी मी सहमत आहे. भाजपने नैतिकता, साधन शुचितेच्या गप्पा मारू नयेत. गोवा ही देवभूमी आहे. भाजपच्या तोंडी कायम नैतिकतेचं भजन असतं. भाजपच्या गोव्यातील नेत्यांवर गंभीर आरोप आहेत. ते लँड माफिया आहेत. काहींवर अफू चरस, गांज्याचे आरोप आहेत. त्यांना पक्षात घेतलं आहे. त्यामुळे उत्पल पर्रिकरांचं योगदान काय? या पेक्षा राजकारणातील ग्रेट गॅम्बलर्स आणि ठकस् ऑफ गोवा घेऊन तुम्ही निवडणुका लढू इच्छिता का? फडणवीसांचं गोव्यात येऊन अध:पतन झालं आहे त्याचं वाईट वाटतं. फडणवीसांकडून ही अपेक्षा नव्हती. फडणवीस साहेबांकडे आम्ही वेगळ्या पद्धतीने पाहतो. पण गोव्याची हवा त्यांना लागलेली दिसते, असा हल्लाबोल राऊत यांनी चढवला आहे.
शिवसेनेचं गोव्यात अस्तित्व नाही या देवेंद्र फडणवीस यांच्या प्रश्नावरही त्यांनी उत्तर दिलं. कधी काळी गोव्यात भाजपच्या सर्वच उमेदवारांचे डिपॉझिट झालेले आहे. तरी तुम्ही थांबला का? नाही थांबला. महाराष्ट्रातही त्यांचं डिपॉझिट जप्त होत होतं. शिवसेनेमुळे तुम्हाला महाराष्ट्रात बळ मिळालं. सर्वच पक्ष सुरुवातीला या फेजमधून जातात. त्यातूनच राजकीय पक्ष उभे राहत असतात, असा टोलाही त्यांनी लगावला.
कुठे जायचं याचा विचार उत्पल पर्रिकरांनी करायचा आहे. मनोहर पर्रिकरांबाबत आमच्या मनात सदभावना आहे. गोव्यातील लहान राज्यातील माणूस संरक्षण मंत्री झाला. त्यांनी गोव्यात भाजप वाढवला, रुजवला. सत्तेवर आणला. त्यांचे चिरंजीव समाजकारण करत आहेत. त्यांना राजकारणात यायचं आहे. मनोहर पर्रिकरांच्या चिरंजीवांना उमेदवारी द्यायला काहीच हरकत नव्हती, असं सांगतानाच उत्पल यांनी धाडस आणि हिंमत दाखवली, आत्मविश्वासाने काही भूमिका घेतली तर शिवसेनाच कशाला गोव्यातील जनता सुद्धा उत्पल पर्रिकर यांच्या पाठी ठामपणे उभी राहिल याची मला खात्री आहे, असं ते म्हणाले.
गोव्यातील दहा-बारा लोकं सत्तेची सूत्रं फिरवत असतात. ते इकडे तिकडे फिरत असतात. गोव्यात कोणत्याही नेत्याला पक्ष नाही. ते आज एका पक्षात असतील तर उद्या दुसऱ्या पक्षात असतील. गोव्यात जे चाललंय ते बंड नाही. त्याला माकड उड्या म्हणतात. जिथे पिक येईल त्या शेतात काही दहाबारा लोक घुसत असतात. त्यांच्याकडे कोणताही विचार नाही. शिवसेनेकडे हिंदुत्वाचा विचार आहे, असं ते म्हणाले.
संबंधित बातम्या: