पणजी: पंतप्रधान नरेंद्र मोदी (pm narendra modi) यांनी गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्याबाबत भाष्य केलं होतं. गोव्याशी आपलं जुनं नातं असल्याचंही पंतप्रधान मोदींनी म्हटलं होतं. मोदींच्या या विधानावर शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांनी टीका केली आहे. गोव्याच्या स्वातंत्र्यासाठी गोव्यातील स्थानिक क्रांतीकारक, महाराष्ट्रवादी गोमंतक पक्ष, राममनोहर लोहिया आणि महाराष्ट्राने मोठं योगदान दिलं आहे. नेहरुंनी गोव्यासाठी मोठं काम केलं तर इंदिरा गांधींनी गोव्याला (goa) स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला. गोव्याच्या स्वातंत्र्य लढ्यावेळी या व्यतिरिक्त कुणीच नव्हते, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे. तसेच आधी त्यांनी लडाखच्या स्वातंत्र्यावर बोलावं. लडाखला चीनच्या तावडीतून सोडवावं. गोव्याबाबत नंतर बोलू, असा चिमटाही राऊत यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना नाव न घेता लगावला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गोल्डन गोवा असा नारा दिला होता. त्यावरूनही राऊत यांनी टोलेबाजी केली. गोवा गोल्डनच आहे. या गोल्डन गोव्यावर तुम्ही फार उशिरा आला. गोवा स्वतंत्र झाला. स्थिर स्थावर झाला. त्यानंतर तुम्ही आला. नेहरुंनी त्या काळात गोव्यात मोठं काम केलं. इंदिरा गांधींनी गोव्याला स्वतंत्र राज्याचा दर्जा दिला. पंडित नेहरू आणि स्वतंत्र चळवळीचा इतिहास समजून घेतला पाहिजे. गोव्याच्या लढ्याबाबत बोलणारे ते लोकं कुठे होते? तशा कुठे नोंदी सापडतात का हे पाहावं लागेल. पण नोंदी सापडत नाहीये. गोव्याच्या लढ्यात महाराष्ट्र होता. राममनोहर लोहिया होते. समाजवादी विचारसरणीचे नेते होते. स्थानिक क्रांतीकारक होते. त्यांनी गोवा स्वतंत्र केला. 1961 सालापर्यंत इतर कोणीही गोव्यात नव्हते. मराठी माणसाशिवाय इथे कोणी आले नव्हते, असं राऊत म्हणाले.
गोव्याने सर्वांना भरभरून दिलं. अख्खा देश गोव्यात येतो. गोव्याने इंदिरा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, लोहिया आणि बाळासाहेब ठाकरेंनाही भरभरून दिलं. गोव्याने सर्वांना दिलं. गोवा ही देवभूमी आहे. गोवा सर्वांचा आहे. गोव्यावर एखाद्या राजकीय पक्षाचा कधीच हक्क राहिला नाही, असं सांगतानाच लडाखमध्ये चीनी सैन्य घुसलं याची आम्हाला चिंता आहे. लडाखला कधी स्वातंत्र्य करता ते सांगा? मग गोव्यावर बोलू. चीनी सैन्य एक वर्षापासून लडाखमध्ये येऊन बसलं आहे. तुम्ही फक्त वाटाघाटी करत आहात. गोवा स्वतंत्र होऊन जमाना लोटलाय. हे तुमच्या नाकासमोर सुरू आहे. त्यांना कसं पाहता ते पाहा. तुम्ही सांधं चीनचं नाव घेऊन बोलायला तयार नाही अन् गोव्यावर बोलत आहात, असा हल्लाही राऊत यांनी चढवला.
काँग्रेस नेते राहुल गांधी आज गोव्यात येत आहेत. त्यावरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी गोव्यात येऊ शकतात, तर राहुल गांधी आणि आम्ही का गोव्यात येऊ नये? देशाचे गृहमंत्री वारंवार गोव्यात येत आहेत. आम्ही आल्यावर तुम्ही प्रश्न का निर्माण करत आहात? असा सवालही त्यांनी केला.
36 जिल्हे 50 बातम्या | 11 February 2022 pic.twitter.com/rDcm3KOJ8Q
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 11, 2022
संबंधित बातम्या:
Goa Assembly Election 2022 : ‘गोव्यात येतो तेव्हा मनोहर पर्रिकरांची आठवण येते’