पणजी: गोव्यात शिवसेना आणि राष्ट्रवादी एकत्र मिळून निवडणूक लढणार आहेत. या निवडणुकीत शिवसेनेने खास रणनिती तयार केली आहे. राष्ट्रवादीसोबत जागा वाटप करताना शिवसेनेने काही महत्त्वांच्या परिसरातील जागांवरच लक्ष केंद्रीत केलं आहे. शिवसेनेने जागा घेताना महाराष्ट्राच्या लगतच्या मतदारसंघातील जागाच घेतल्या आहेत. मराठी बहुल परिसर असल्याने त्याचा फायदा मिळवण्यासाठी शिवसेनेने ही खेळी केल्याचं सांगितलं जात आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना ही माहिती दिली. मापूसा, मांद्रे, वाळपई, मये, पराये असे जे महाराष्ट्राच्या लगतचे मतदारसंघ आहेत. या ठिकाणी शिवसेनेचे उमदेवार उभे राहतील. मुंबईतील कार्यकर्ते आणि गोव्यातील कार्यकर्ते काम करणार आहेत. राष्ट्रवादी आज किंवा उद्या त्यांचे उमेदवार जाहीर करतील. आमच्यात मतदारसंघावरून वाद नाही. एखादं दुसऱ्या मतदारसंघावरून किरकोळ वाद होते. दोन्ही ठिकाणी दोन्ही पक्षाच्या कार्यकर्त्यांचा दावा होता. विशेषता कुठळी मतदार संघावर दोन्ही पक्षाचा दावा होता. तो बसून सोडवला, असं राऊत म्हणाले.
गोव्यातील चित्रं धुसर आणि अस्पष्ट आहे. प्रत्येक राजकीय पक्ष देशातील त्याने गोव्याची प्रयोग शाळा केली. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल येऊन बसले आहेत. मुख्यमंत्रीपदाचा चेहरा जाहीर करण्यात आला आहे. तृणमूलचे प्रमुख बसले आहेत. आमचे देवेंद्र फडणवीसांचा तंबू इथे पडला आहे. काँग्रेस आहे. शिवसेना तर आहेच. लढू आणि जिंकू, असंही त्यांनी सांगितलं.
बाबूश मॉन्सेरात यांच्या कुटुंबातील सदस्यांना भाजपने तिकीट दिल्याने त्यावरही त्यांनी टीका केली. बाबूश मॉन्सेरात यांच्या बाबतीत ‘बाबूशचं कुटुंब, भाजपची जबाबदारी’ असं चित्रं आहे. महाराष्ट्रातील ‘माझं कुटुंब, माझी जबाबदारी’ सारखं. आमची पर्रिकर कुटुंबाशी सदभावना आहे. ती व्यक्त केली. या पलिकडे भाजपच्या यादीशी आमचा काहीही संबंध नाही. त्यांच्या निवडणुकीशीही संबंध नाही. प्रत्येकाने आपल्या पद्धतीने लढावं, असंही ते म्हणाले.
राऊतांनी मनोहर पर्रिकरांवर टीका केली होती, असं फडणवीस म्हणाले होते. त्यालाही त्यांनी उत्तर दिलं. तुम्हीही महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या आजारावर बोलला आहात. तेव्हा पर्रिकर सक्रिय नव्हते. त्यावर कुणी बोलू शकतो. याचा अर्थ पर्रिकरांच्या बाबतीत दुर्देवी घटना व्हावी अशी आमची इच्छा नव्हती. एवढे आम्ही निर्दयी नाहीत. त्यांना उदंड आयुष्य लाभावं अशी आम्ही प्रार्थना करत होतो. उत्पल पर्रिकरांना तिकीट द्यायचं की नाही हा भाजपचा प्रश्न आहे. पण ते अपक्ष राहिले तर त्यांच्याबाबत सर्वांनी मदत केले पाहिजे, असंही ते म्हणाले. गोव्यातील आजची परिस्थिती त्रिशंकूकडे चालली आहे. आम्ही आमच्या जागा जिंकून आणू, जिंकू शकलो तर सरकारमध्ये आमचे स्थान असेल, असंही ते म्हणाले.
संबंधित बातम्या:
गोव्यातील राजकारण प्रस्थापितांच्या हाती गेलं, आम्ही सर्वसामान्यांना उमेदवारी देणार: संजय राऊत