पणजी: शिवसेना नेते संजय राऊत यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा साधला आहे. फडणवीसांनी मला नटसम्राट म्हणून पणजीतील रसिकांचा अपमान केला आहे. ते आम्हाला नटसम्राट म्हणत असले तरी आम्ही सोंगाड्या मात्र नक्कीच नाही. तर चंद्रकांत पाटील यांच्या प्रत्येक विधानावर प्रतिक्रिया द्यायला ते काही टॉलस्टॉय नाहीत, असा टोला संजय राऊत यांनी लगावला आहे.
संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना हा टोला लगावला आहे. देवेंद्र फडणवीस मला नटसम्राट म्हणतात. पण नटसम्राट हे महाराष्ट्रचं वैभव आहे. गोव्याला रंगभूमीची मोठी परंपरा आहे हे त्यांना माहीत नाही. राज्यातील सर्व नटसम्राट गोव्यातून गेले आहेत. संगीत, कला, नाट्य ही गोव्याची भूमी आहे. नटसम्राटची खिल्ली उडवून ते गोव्याच्या रसिकजनांचा आणि गोव्यातील कलाप्रेमींचा ते अपमान करत आहेत. नटसम्राटमध्ये एक वाक्य आहे. गणपतराव बेलवलकरांच्या तोंडी. कुणी मला घर देता का घर… तशी फडणवीसांची अवस्था आहे, कुणी मला खुर्ची देता का खुर्ची… नटसम्राट म्हटल्याने आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही. आम्ही रंगभूमीचे उपासक आहोत. आम्हाला आनंद आहे की त्यांनी नटसम्राट म्हटलं. पण आम्ही सोंगड्या नक्कीच नाही. शब्द फिरवणारे राजकारणी आम्ही नक्कीच नाही, असा टोला त्यांनी लगावला.
चंद्रकांत पाटील यांनी आघाडीत राहून शिवसेना रसातळाला गेली आहे अशी टीका केली होती. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. चंद्रकांत पाटील म्हणजे टॉलस्टॉय नाही. त्यांच्या प्रत्येक शब्दांचा अर्थ काढून आम्ही त्यावर बोलावं असं काही नाही. त्यांना काय बोलायचं ते बोलत राहू द्या. तुम्ही लोकांना ऐकवत राहा. लोकांचं मनोरंजन होईल. ते टॉलस्टॉय नाहीत की विद्यापीठातून त्यावर चर्चा व्हावी. राजकारणात अशी विधान होत असतात सोडून दिली पाहिजे, असं ते म्हणाले.
महाराष्ट्रातही शिवसेना-राष्ट्रवादी एकत्र येण्याचे संकेत आहेत का? असा सवाल केला असता ते म्हणाले, भविष्यात काय होणार हे मी गोव्यात बसून कसे सांगू? पुढल्या वाटचालीत हे दोन पक्ष नक्कीच एकत्र राहतील. गोव्यात आमच्यासोबत यावं अशी सुबुद्धी काँग्रेसला सूचली नाही. पण महाराष्ट्रात आम्ही एकत्र आहोत. राज्यात कुणीही स्वबळाचा नारा दिला नाही. स्थानिक स्वराज्य संस्थेत काही ठिकाणी वेगळे लढलो. कारण तळागाळातील कार्यकर्त्यांचा तो निर्णय होता, असं ते म्हणाले.
नगरपंचायतीच्या निकालानंतर भाजप नेत्यांनी केलेल्या दाव्याची राऊत यांनी खिल्ली उडवली. भाजप क्रमांक एकचा विरोधी पक्ष आहे. इतरही विरोधी पक्ष आहेत. लहान लहान पक्ष आहेत. त्यात भाजप क्रमांक एकचा विरोधी पक्ष म्हणून त्यांनी त्यांचं स्थान नगरपंचायतीत कायम ठेवल्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. त्यांना शुभेच्छा देतो की अशीच लढाई लढा. सेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादीची तुम्हाला बेरीज करावी लागेल. ती तुमच्यापेक्षा अधिकच आहे, असं ते म्हणाले.
शिवसेनेला नगरपंचायतीत अपेक्षित यश मिळालं नाही, त्याचं कारणही त्यांनी सांगितलं. शिवसेना हा शहरी भागातील पक्ष आहे. नगरपंचायतीत राष्ट्रवादीने जास्त जागा लढवल्या. पुणे, ठाण्यात निवडणुका झाल्या नाहीत. जिथे झाल्या तिथे आम्ही लढलो, त्यामुळे निकालाचं वेगळं चित्रं दिसत असल्याचं ते म्हणाले. निकालाच्या आकडेवारीकडे महाविकास आघाडी म्हणून पाहिले पाहिजे. दोडा मार्गाला राष्ट्रवादी विजयी झाली. कुडाळमध्ये आमचा विजय झाला. या गोष्टींकडे आम्ही सकारात्मक पाहतो. महाविकास आघाडी म्हणून पाहतो. तसंच पाहावं लागेल. राज्यात महाविकास आघाडी म्हणूनच एकत्रं आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/3sHFQq82Tk#liveupdates | #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 20, 2022
संबंधित बातम्या: