पणजी : गोवा विधानसभा निवडणुकीत (Goa Assembly Election) भाजपला स्पष्ट बहुमत मिळताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंतच्या निकालानुसार भाजप गोव्यात 20 जागांवर आघाडीवर आहे. तर तीन अपक्ष आणि अन्य स्थानिक पक्षांनी भाजपला पाठिंबा दिलाय. त्यामुळे गोव्यात भाजप सत्ता स्थापन करणार हे स्पष्ट आहे. महत्वाची बाब म्हणजे भाजपला जोरदार टक्कर देण्याच्या इराद्यानं गोव्याच्या मैदानात उतरलेल्या शिवसेना (Shivsena) आणि राष्ट्रवादीला (NCP) भोपळाही फोडता आलेला नाही. इतकंच नाही या दोन्ही पक्षाच्या उमेदवारांची अनामत रक्कमही वाचू शकलेली नाही. याच पार्श्वभूमीवर विरोधी पक्षनेते आणि गोव्याचे भाजप प्रभारी देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी गोव्यातील शिवसेनेच्या पराभवावर मीठ चोळलंय.
शिवसेना-राष्ट्रवादीच्या पराभवाबाबत पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना फडणवीस यांनी शिवसेनेला जोरदार टोला हाणलायय. ‘मी पहिल्या दिवशीच सांगितलं होतं की शिवसेनेची लढाई आमच्याशी नाही तर नोटाशी आहे. तुम्ही पाहिलं तर राष्ट्रवादी आणि शिवसेना यांची एकत्रित मतं पाहिली तरी ती नोटापेक्षा कमी आहेत. आमच्या मुख्यमंत्र्यांच्या मतदारसंघात जाऊन त्यांनी मोठी सभा घेतली. तिथे त्यांच्या उमेदवाराला 97 मतं मिळाली आहेत’, अशा शब्दात फडणवीस यांनी शिवसेना आणि राष्ट्रवादीवर टीकास्त्र डागलंय. त्याचबरोबर काँग्रेसला आत्मचिंतन करायची गरज आहे. विशेषत: परिवारवादी पार्ट्यांना हा मोठा संदेश असल्याचंही फडणवीस यावेळी म्हणाले.
उत्पल पर्रिकर यांच्या पराभवाबाबत विचारलं असता फडणवीस म्हणाले की, बाबूश विजय होणार हे पहिल्या दिवशीच स्पष्ट होतं. त्याचा मला आनंद आहे. पण उत्पल पर्रिकर पराभूत झाल्याचा आनंद मी व्यक्त करत नाही. ते आमच्याच परिवारातील आहेत. त्यांनी योग्य निर्णय घेतला असता तर आज ते आमदार असते.
चार राज्यात भाजपनं घवघवीत यश मिळवल्यानंतर महाराष्ट्रात भाजप कुरघोडी करणार का? असा सवाल विचारला जातोय. भाजप नेते आणि माजी मंत्री गिरीश महाजन यांनी ‘उत्तर प्रदेश तो झांकी है, महाराष्ट्र अभी बाकी है’ असा इशाराच दिलाय. याबाबत बोलताना फडणवीस यांनी महाराष्ट्रात आम्ही 2024 ची तयारी केलीय. तेव्हा आम्ही बहुमतानं निवडून येऊ. पण तोवर सरकार पडलं तर आम्ही सरकार देऊ, असं मोठं वक्तव्य केलंय. त्यामुळे चार राज्यातील भाजपच्या मोठ्या विजयानंतर फडणवीस यांचा महाविकास आघाडी सरकारला हा इशारा असल्याचं बोललं जातंय.
इतर बातम्या :