पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा तिसरा कार्यकाळ सुरु झाल्यानंतर पहिल्याच विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. केंद्रातील सत्ता स्थापनेनंतर चार महिन्यात दोन राज्यांच्या विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर होत आहेत. हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये नुकत्याच विधानसभेच्या निवडणुका झाल्या. त्यांचे आज निकाल जाहीर होत आहेत. हरियाणामध्ये 5 ऑक्टोबरला मतदान झालं. जम्मू-काश्मीरमध्ये सुरक्षेची स्थिती लक्षात घेता तीन टप्प्यांमध्ये विधानसभा निवडणुका झाल्या. आर्टिकल 370 हटवल्यानंतरची जम्मू-काश्मीरमधील ही पहिली निवडणूक आहे. यात हरियाणाच्या निवडणूक निकालाचे आकडे खपूच रंगतदार आहे. विविध एक्झिट पोल्सनी जे अंदाज वर्तवले होते, हे आकडे त्यापेक्षा बिलकुल वेगळे दिसतायत. आधी जम्मू-काश्मीरचा कल जाणून घेऊया.
जम्मू-काश्मीरमध्ये विधानसभेच्या एकूण 90 जागा आहेत. यात जम्मूमध्ये हिंदू मतदार बहुसंख्य असल्याने भाजपाची ताकद आहे. काश्मीर खोऱ्यात नॅशनल कॉन्फरन्स आणि काँग्रेस हे दोन पक्ष चांगल्या स्थितीत आहेत. या विधानसभा निवडणुकीसाठी NC आणि काँग्रेसने आघाडी केली आहे. सध्याचे जे कल आहेत त्यानुसार, जम्मूमध्ये 43 जागा आहेत. एनसी 12 आणि भाजपा 26 जागांवर आघाडीवर आहे. अन्य 5 ठिकाणी आघाडीवर आहेत.
काश्मीरच चित्र स्पष्ट
काश्मीरमध्ये विधानसभेच्या 47 जागा आहेत. काँग्रेस एनसी 38, पीडीपी 5, अन्य 4 आणि भाजपा शुन्य अशी स्थिती आहे. एकूण मिळून जम्मू-काश्मीरमध्ये एनसी, काँग्रेस आघाडी 50 पेक्षा जास्त, भाजपा आणि इतर 9 अशी स्थिती आहे. म्हणून एनसी-काँग्रेस आघाडीकडे बहुमतापेक्षा जास्त जागा आहेत. काश्मीरची स्थिती सध्यातरी स्पष्ट आहे.
हरियाणात गेम कधी फिरला?
हरियाणा विधानसभेत मात्र मोठा उलटफेर झालाय. सर्व एक्झिट पोल्सनी काँग्रेस बहुमताने सत्तेवर येणार असा अंदाज वर्तवला होता. मतमोजणीला सुरुवात झाल्यानंतर प्राथमिक कल सुद्धा तसेच होते. पहिल्या दीड तासात काँग्रेस बहुमतापेक्षा जास्त जागांवर आघाडीवर होती. पण त्यानंतर अचानक चित्र पालटलं. आता भाजपा 49 आणि काँग्रेस 35 जागांवर आघाडीवर आहे. हरियाणात क्षणाक्षणाला चित्र बदलतय. अटी-तटीचा सामना सुरु आहे. हरियाणात मागच्या 10 वर्षांपासून भाजपाच सरकार आहे.
असं झाल्यास काँग्रेस डबल टेन्शनमध्ये
हरियाणात चित्र दुपारपर्यंत स्पष्ट होईल. हरियाणात विधानसभेच्या 90 जागा आहेत. बहुमताचा आकडा 46 आहे. काँग्रेसला हरियाणात काठावरच बहुमत मिळालं. भाजपा आणि त्यांच्या जागांमध्ये 4 ते 5 जागांच अंतर असेल तर सरकार बनवूही काँग्रेस दबावाखाली राहील. कारण याआधी भाजपाने गोवा, मध्य प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांमध्ये काँग्रेसकडे असलेलं काठावरच बहुमत आपल्या बाजूला वळवलं आहे. स्थानिक नेत्यांना हाताशी पकडून भाजपा हे करु शकते. कुठल्याही परिस्थितीत सत्ता स्थापनेची संधी सोडायची नाही, हा भाजपाचा प्रयत्न असतो. त्यामुळे हरियाणात काठावरच बहुमत मिळवल्यास काँग्रेस डबल टेन्शनमध्ये येईल.