जम्मू-काश्मीरमधील विधानसभा निवडणुकीत भाजपला सत्ता मिळवता आली नसली तरी जम्मूमध्ये भाजपला चांगलं यश मिळाले आहे. काश्मीर खोऱ्यात भाजपला यश मिळणार नाही हे अपेक्षित होतं. कलम 370 हटवल्यानंतर ही पहिलीच निवडणुक होती. ज्यामध्ये भाजपला मोठा दिलासा मिळाला आहे. कारण जनतेच्या मनात याबाबत कोणताही रोष नसल्याचं समोर आलं आहे. जम्मूमध्ये भाजपने एका तरुण उमेदवाराला संधी दिली होती. जिचे वडील आणि काका यांची दहशतवाद्यांनी हत्या केली होती.
किश्तवाड मतदारसंघातून भारतीय जनता पक्षाची उमेदवार शगुन परिहार हिने विजय मिळवला आहे. निवडणूक आयोगाच्या म्हणण्यानुसार, परिहार यांनी नॅशनल कॉन्फरन्सच्या सज्जाद अहमद किचलू यांचा 521 मतांनी पराभव केला आहे. शगुन परिहार यांना उमेदवार करुन त्यांना सांत्वन मिळेल अशी भाजपला आशा होती. त्यात भाजपला यश मिळालं. किश्तवाडा विधानसभा मतदारसंघात मुस्लीम लोकसंख्या मोठी आहे, त्यामुळे भाजपने दोन्ही समाजाच्या लोकांचा पाठिंबा मिळेल अशा चेहऱ्याला संधी दिली.
शगुन परिहार यांना उमेदवारी दिल्याने दोन धार्मिक गटांमधील दरी कमी होईल, अशी भाजपची अपेक्षा होती. तिला भावनिक आधारही मिळेल. शगुन परिहार यांनी पहिल्यांदाच निवडणूक लढवली होती. निवडणुकीत विजयी झाल्यानंतर शगुन परिहार यांनी सांगितले की, ती परिसरात समृद्धी आणि शांतता नांदावी यासाठी प्रयत्न करणार आहे.
शगुन परिहार यांचे कुटुंब सुरुवातीपासून भाजपशी संबंधित होते. त्यांचे काका अनिल परिहार हे जम्मू-काश्मीरमधील भाजपचे प्रमुख नेते होते. ते जम्मू-काश्मीर भाजपचे सचिव होते. नोव्हेंबर 2018 मध्ये शगुन परिहारचे वडील अजित परिहार आणि काका अनिल परिहार यांची किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांनी गोळ्या झाडून हत्या केली होती. आपल्या निवडणूक प्रचारात शगुनने लोकांना आश्वासन दिले की ती शांतता, सुरक्षा आणि समृद्धी आणण्यासाठी निवडणुकीच्या मैदानात उतरली आहे.
शगुन परिहार यांनी एम.टेक केले असून त्या जम्मू-काश्मीर लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचीही तयारी करत आहे. शगुनचे वडील अजित परिहार आणि तिचे काका अनिल परिहार हे भाजपचे ज्येष्ठ नेते होते. राज्यातील पंचायत निवडणुकीपूर्वी 1 नोव्हेंबर 2018 रोजी दहशतवाद्यांनी त्यांची हत्या केली होती. शगुनचे काका अनिल यांचाही मुस्लीम समाजात चांगलाच प्रभाव होता. त्याचा परिणाम या निवडणुकीतही दिसून आला.