मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच, महाराष्ट्र पाठोपाठ कर्नाटकातही संकट ओढवणार? निकालाआधीच घडामोडी वाढल्या

| Updated on: May 12, 2023 | 8:24 PM

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. कर्नाटकात काँग्रेस नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झालं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, के सी वेणूगोपाल, रणदीप सुरजेवाला यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडलीय.

मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच, महाराष्ट्र पाठोपाठ कर्नाटकातही संकट ओढवणार? निकालाआधीच घडामोडी वाढल्या
Karnataka Election
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

बंगळुरु : कर्नाटक विधानसभा निवडणुकांचा उद्या निकाल जाहीर होणार आहे. कर्नाटकात उद्या सकाळपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कर्नाटकात गेल्या काही दिवसांमध्ये राजकीय घडामोडींना चांगलाच वेग आलेला बघायला मिळाला. त्यानंतर 10 मे ला मतदान पार पडलं. मतदानानंतर कर्नाटक निवडणुकीच्या निकालाचे एक्झिट पोल समोर आले. त्यानुसार काँग्रेस हा राज्यातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची चिन्हं आहेत. काँग्रेससाठी हा मोठा दिलासा आहे. पण असं असताना काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदासाठी रस्सीखेच सुरु असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे कर्नाटकातील घडामोडींना आगामी काळात जास्त महत्त्व प्राप्त होण्याची चिन्हं आहेत.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीच्या निकालाआधीच राजकीय हालचालींना वेग आला आहे. कर्नाटकात काँग्रेस नेत्यांच्या बैठकांचे सत्र सुरू झालं आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे, के सी वेणूगोपाल, रणदीप सुरजेवाला यांच्यात महत्वपूर्ण बैठक पार पडलीय. बंगळुरूच्या हॉटेल रेडिसन ब्ल्यूमध्ये जवळपास पाऊणतास चर्चा झालीय. मुख्यमंत्री पदावरून कर्नाटक काँग्रेसमध्ये दोन गट आहेत. मुख्यमंत्री पदासाठी डी के शिवकुमार आणि सिद्धरामय्या यांच्यात स्सीखेच असल्याची माहिती मिळत आहे. त्यामुळे आता वरिष्ठ काँग्रेस नेते काय निर्णय घेतात याकडे संपूर्ण राज्यासह देशाचं लक्ष लागलेलं आहे.

काँग्रेस नेत्यांच्या प्रतिक्रिया काय?

काँग्रेस राष्ट्रीय प्रवक्ता गौरव वल्लभ यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “कर्नाटकात उद्या काँग्रेस पूर्ण बहुमताने जिंकणार आहे. उद्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस नेत्यांमध्ये बैठका सुरू आहेत. मुख्यमंत्री पदावरून काँग्रेसमध्ये वाद नाहीय. कर्नाटकातील कानडी जनता काँग्रेससोबत असणार आहे”, अशी प्रतिक्रिया गौरव वल्लभ यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनीदेखील प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “आम्हाला बहुमत मिळेल. मी भाजपच्या आत्मविश्वासाबद्दल बोलत नाही. मी फक्त माझे विश्लेषण करेन. उद्यापर्यंत वाट पाहू. मुख्यमंत्रीपदासाठी कुणाची निवड करणे ही समस्या नाही. आमची उद्याच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर बैठक होती”, अशी माहिती मल्लिकार्जुन खर्गे यांनी दिली.

मुख्यमंत्रीपदासाठीची रस्सीखेच पक्षासाठी अडचणीची ठरणार?

मुख्यमंत्रीपदासाठी काय राजकारण घडू शकतं हे महाराष्ट्राने गेल्या अडीच वर्षांमध्ये पाहिलं आहे. मुख्यमंत्रीपदासाठी शिवसेनेने भाजपसोबतची युती तोडली आणि राष्ट्रवादी-काँग्रेसच्या साथीने महाविकास आघाडी सरकार स्थापन केलं. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे हे राज्याचे मुख्यमंत्री बनले. पण नंतर वेगळ्याच घडामोडी घडल्या. एकनाथ शिंदे यांनी मोठं बंड पुकारत सत्तांतर घडवून आणलं. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. मुख्यमंत्रीपदासाठी जसा संघर्ष घडला आता तसाच संघर्ष कर्नाटकातही आगामी काळात घडतात का? ते पाहणं महत्त्वाचं आहे. अर्थात निकालाआधी याचे अंदाज बांधणे कठीण आहे.