हैदराबाद : कर्नाटक विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू असतानाच भाजपला मोठा धक्का बसला आहे. भाजपचे कर्नाटकातील सर्वात मोठे नेते, माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी भाजपला काल सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर त्यांनी आज काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे भाजपला मोठा फटका बसला आहे. शेट्टार यांच्या प्रवेशामुळे कर्नाटकातील काँग्रेसचं बळ वाढलं आहे. त्याशिवाय ऐन निवडणुकीच्या तोंडावर कर्नाटकातील राजकीय समीकरणेच बदलली आहेत. आधीच पक्षांतर्गत वादांनी डोकं वर काढलेलं असतानाच आता त्यात शेट्टार यांनी बंडाचा झेंडा फडकवल्याने भाजपची प्रचंड डोकेदुखी वाढली आहे.
माजी मुख्यमंत्री जगदीश शेट्टार यांनी काल भाजपच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर आज काँग्रेसच्या बंगळुरू येथील कार्यालयात येऊन त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, काँग्रेस नेते सिद्धारमैया, केसी वेणुगोपाल, रणदीप सुरजेवाला आणि काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डीके शिवकुमार यांच्या उपस्थितीत शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये प्रवेस केला. जगदीश शेट्टार हे लिंगायत समुदायातील आहेत. राज्यात लिंगायत समाज सर्वाधिक असून तो किंगमेकर आहे. त्यामुळे शेट्टार यांच्या धक्क्यामुळे भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. शिवाय शेट्टार यांनी राजीनामा दिल्याने भाजपची उलटीत गिनती सुरू झाल्यचं सांगितलं जात आहे.
कालच मी भाजपचा राजीनामा दिला आहे. आज काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. एक विरोधी पक्षनेता म्हणून अनेक लोक आश्चर्यचकीत झाले आहेत. माजी मुख्यमंत्री आणि माजी मुख्यमंत्र्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. भाजपने मला सर्व पदे दिली. मीही कार्यकर्ता म्हणून पक्षासाठी सर्व काही केलं. पक्ष बांधणीत मोठं योगदान दिलं, असं जगदीश शेट्टार यांनी काँग्रेसमध्ये आल्यानंतर सांगितलं.
भाजपने कर्नाटकात लिंगायत समाजाला डीप फ्रिजरमध्ये टाकलं आहे. लिंगायत समुदायाला भाजपकडून मान सन्मान दिला जात नाहीये. त्यात भाजपचे माजी मुख्यमंत्री येडियुरप्पा यांचाही समावेश आहे. पक्षाने येडियुरप्पा यांना अडगळीत टाकलं आहे. त्यांना शोभा करांडे यांच्या हाताखाली काम करावं लागत आहे, असं काँग्रेस नेते रणदीप सुरजेवाला म्हणाले.
कर्नाटक विधानसभा निवडणुकीसाठी राजकीय पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. प्रमुख राजकीय पक्षांकडून उमेदवारांची घोषणा केली जात आहे. तर भाजपचे असंतुष्ट आमदार पक्षाला सोडचिठ्ठी देत आहेत. तर दुसरीकडे काँग्रेसने आपली तिसरी उमेदवार यादी जाहीर केली आहे. काँग्रेसने 43 लोकांना तिकीट दिलं आहे. या यादीतून सिद्धारमैया यांचं नाव गायब आहे. त्यांना कोलारमधून तिकीट देण्यात आलेलं नाही. राज्यात येत्या 10 मे रोजी मतदान होणार आहे. एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. 13 मे रोजी मतमोजणी होणार आहे.