मुंबई : किच्चा सुदीप ( Kiccha Sudeep ) भाजपचा प्रचार करणार आहे. यादरम्यान किच्चा सुदीपला दोन धमकीची पत्रे मिळाली आहेत. ज्यामध्ये किच्चा सुदीपचा खासगी व्हिडिओ लीक होण्याची धमकी देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. बंगळुरूमधील पुट्टेनहल्ली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी या संदर्भात तपास सुरू केला आहे. हे पत्र कोणी पाठवले आहे याचा शोध सुरू आहे.
सुदीपचे मॅनेजर जॅक मंजू यांना हे पत्र मिळाल्याचे सांगण्यात येत आहे. या पत्रात सुदीपबद्दल अपशब्द वापरले आहेत. सुदीपचा खासगी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यामुळे सुदीपचा मानसिक छळ होत आहे. अभिनेत्याच्या प्रतिष्ठेला हानी पोहोचवण्याचा कट रचला जात असल्याची तक्रार मंजू यांनी दिली आहे.
सध्या पुट्टेनहल्ली पोलिसांनी आयपीसी कलम ५०६, कलम ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. हे पत्र कुठून आले आणि कोणी पाठवले, याचा तपास सुरू आहे. वरिष्ठ पोलीस अधिकारी हे प्रकरण सीसीबीकडे सोपवण्याचा विचार करत असल्याचे सांगण्यात येत आहे.
मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी आज दुपारी पत्रकार परिषद बोलावली. या पत्रकार परिषदेत सुदीपही सहभागी होण्याची शक्यता आहे. ही पत्रकार बैठक खासगी हॉटेलमध्ये होणार आहे. पत्रकार परिषदेत सुदीप भाजपला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. मात्र, तो पक्षात प्रवेश करतील याबाबत साशंकता आहे.
सुदीपचा मोठा चाहता वर्ग आहे. ज्याचा फायदा भाजपला होणार आहे. या कारणासाठी सुदीपला ऑफर देण्यात आली होती. कमल यांच्या प्रचारासाठी त्यांनी होकार दिल्याचे सांगण्यात येत आहे. याचे स्पष्ट चित्र आज दुपारपर्यंत समोर येईल.