महाराष्ट्र भाजपामध्ये आज मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे. दोन दिवसांपूर्वी लोकसभा निवडणुकीचा निकाल जाहीर झाला. भाजपाला एकट्याला बहुमत मिळालं नाही. पण भाजपाप्रणीत NDA कडे बहुमताचा आकडा आहे. NDA च संख्याबळ 292 आहे. भाजपाने या निवडणुकीत 400 पारचा नारा दिला होता. प्रत्यक्षात त्यांना 240 जागा मिळाल्या. भाजपाला उत्तर प्रदेश प्रमाणे महाराष्ट्रात मोठा फटका बसला. 2014 आणि 2019 मध्ये महाराष्ट्रात महायुतीचे 40 पेक्षा जास्त खासदार निवडून आले होते. 2024 मध्ये महायुतीचा आकडा फक्त 17 आहे. त्यात भाजपाला फक्त 9 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे मागच्या दोन निवडणुकांपेक्षा भाजपाची कामगिरी खूप खराब आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्र भाजपामध्ये काही मोठ्या घडामोडी घडण्याची शक्यता आहे.
काल निकालाच्या दुसऱ्यादिवशी महाराष्ट्र भाजपाची मुंबईत बैठक पार पडली. यात राज्यात झालेल्या पराभवावर मंथन करण्यात आलं. त्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्रातील भाजपाच्या पराभवाची जबाबदारी आपल्यावर घेतली. देवेंद्र फडणवीस आज दिल्लीला जाणार असल्याची सूत्रांची माहिती आहे. दिल्लीत जाऊन फडणवीस पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांची आजच भेट घेतील अशी माहिती आहे. या भेटीनंतर देवेंद्र फडणवीस मोठा निर्णय घेऊ शकतात. कारण त्यांनी काल उपमुख्यमंत्रीपद सोडण्याची तयारी दाखवली होती.
‘जबाबदारी देवेंद्र फडणवीस म्हणून मी स्वीकारतो’
“पराभवाची जबाबदारी माझी आहे. मी स्वीकारतो. मी मान्य करतो, मी स्वत: कमी पडलोय. भाजपाला झटका बसला. महाराष्ट्रात जो पराभव झाला, त्याची सगळी जबाबदारी देवेंद्र फडणवीस म्हणून मी स्वीकारतो. आता मला विधानसभेकरता पूर्णवेळ उतरायच आहे. मी भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांना विनंती करणार आहे की, मला सरकारमधून मोकळ करावं. जेणेकरुन, मला पूर्णवेळ पक्षासाठी काम करण्याची संधी मिळेल. मी हरणार नाही. पूर्ण ताकदीने मैदानात उतरणार” असं काल देवेंद्र फडणवीस म्हणाले होते.