लोकसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु आहे. जनतेने आपला कौल दिला आहे. भाजपाचा 400 पारचा नारा अतिशोयक्ती ठरला आहे. प्रत्यक्षात 300 पर्यंत पोहोचतानाही भाजपाची चांगलीच दमछाक झाली आहे. मागच्या दोन अडीच तासांपासून भाजपाप्रणीत एनडीएचा आकडा 290 च्या आसपास घुटमळत आहे. काँग्रेस प्रणीत इंडिया आघाडी 234 पर्यंत पोहोचली आहे. भाजपा 244 जागांवर तर काँग्रेस 95 जागांवर आघाडीवर आहे. इंडिया आघाडीचे जे आकडे वाढलेत, त्यामुळे त्यांच्याकडून सरकार स्थापनेचा दावा केला जात आहे. इंडिया आघाडीमध्ये आप, काँग्रेस, शरद पवार गट, ठाकरे गट आणि अन्य पक्ष आहेत. मतमोजणी सुरु असताना काँग्रेसकडून नितीश कुमार यांच्या जेडीयू आणि चंद्राबाबू नायडू यांच्या टीडीपीशी संपर्क साधण्यात येणार असल्याच बोलल जातय.
नितीश कुमार आणि चंद्राबाबू नायडू दोघेही भाजपाप्रणीत एनडीएमध्ये आहेत. त्यांना आघाडीत घेऊन भाजपाला सरकार बनवण्यापासून रोखण्याचा उद्देश आहे. नितीश कुमार यांचा ट्रॅक रेकॉर्ड पाहता ते कधीही पलटी मारु शकतात. त्यामुळे मीडियाकडून सातत्याने जेडीयूला काँग्रेसकडे जाणार का? अशी विचारणा केली जात आहे. त्यावर जेडीयूचे नेते केसी त्यागी यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
जेडीयूच्या नेत्याने काय म्हटलं?
“आम्ही कुठेही जाणार नाही, जिथे आहोत तिथेच राहणार आहोत” असं केसी त्यागी यांनी म्हटलं आहे. भाजपासाठी ही दिलासा देणारी बाब आहे. “नितीश कुमार काल डॉक्टरला भेटण्यासाठी दिल्लीला आले होते. त्यावेळी त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली” असं केसी त्यागी म्हणाले. दरम्यान शरद पवार यांनी नितीश कुमार यांना फोन केल्याची माहिती आहे.