दक्षिण-मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे उमेदवार अनिल देसाई तब्बल 53 हजार 384 मताधिक्याने विजयी ठरले. त्यांनी शिंदे गटाचे राहुल शेवाळे यांचा पराभव केला. या मतदारसंघात शिवसेना विरुद्ध शिवसेना अशी लढत होती. देसाई हे प्रभादेवी ते ट्रॉम्बेपर्यंत पसरलेल्या जागेचं प्रतिनिधीत्व करणार आहेत. यामध्ये शिवसेनेचं जन्मस्थान असलेलं दादर आणि आशियातील सर्वांत मोठी झोपडपट्टी असलेल्या धारावीचा समावेश आहे. अनिल देसाई यांची ओळख उद्धव ठाकरे यांचे विश्वासू अशी आहे. 2022 मध्ये शिवसेनेत जेव्हा एकनाथ शिंदे यांनी बंड केलं, तेव्हा राहुल शेवाळे त्यांच्यासोबत गेले. अनिल देसाईंनी त्यांचा पराभव करून शिंदे गटाला मोठा धक्का दिला.
2014 आणि 2019 च्या निवडणुकीत राहुल शेवाळे यांनी एकनाथ गायकवाड यांचा पराभव केला होता. दोन वेळा खासदार ठरलेले राहुल शेवाळे यंदाच्या निवडणुकीत सहज ही जागा जिंकतील, असा अंदाज होता. मात्र शिवसेनेत फूट पडल्यानंतर मराठी मतदार हा अत्यंत महत्त्वाचा घटक मानला जात होता. निवडणुकीच्या प्रचारादरम्यान उद्धव ठाकरे यांच्याप्रती लोकांची सहानुभूती दिसून आली. त्याचा फायदा अनिल देसाई यांना झाल्याचं राजकीय विश्लेषक सांगतात.
उद्धव ठाकरे यांचे निकटवर्तीय आणि विश्वासू म्हणून अनिल देसाई यांचं नाव घेतलं जातं. 1997 मध्ये ते पहिल्यांदा बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात आले. त्यानंतर 2002 मध्ये शिवसेनेच्या कार्यकारिणीमध्ये सचिव पदावर त्यांची वर्णी लागली होती. तेव्हापासून त्यांनी पक्षाने सोपवलेल्या अनेक जबाबदाऱ्या पार पाडल्या. देसाई हे गेल्या दोन टर्मपासून राज्यसभेचे खासदार होते. मात्र लोकसभेत निवडणूक लढवण्याची ही त्यांची पहिलीच वेळ होती.
अनिल देसाई यांचं कौशल्य पक्षाच्या धोरणात्मक कामकाजात आणि प्रशासकीय व्यवस्थापनात आहे. शिवसेनेच्या दोन्ही गटांमधील कायदेशीर लढाईत त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली होती. अनिल परब आणि वकिलांच्या टीमसोबत सुप्रीम कोर्टासमोर युक्तिवाद करण्यासाठी त्यांनी सहकार्य केलं होतं. उत्तर श्रोता, शांत स्वभाव आणि विनयशील वागणूक अशा शब्दांत शिवसेनेतील देसाईंचे सहकारी त्यांचं वर्णन करतात.