एनडीएत आणखी घटक पक्ष जोडण्याचा भाजपचा प्रयत्न, काय आहे भाजपचा मास्टर प्लान?

| Updated on: Mar 19, 2024 | 9:30 PM

भाजप कोणतीही रणनीती तयार करताना पूर्ण समीकरणं जुळवून पाहते. भाजपने आता जुन्या नाराज मित्र पक्षांना देखील एकत्र करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे. इतकंच नाही तर नव्या पक्षांना देखील भाजप आपल्या सोबत जोडत आहे. एनडीएला मजबूत करण्याचा भाजपता मास्टर प्लान आहे.

एनडीएत आणखी घटक पक्ष जोडण्याचा भाजपचा प्रयत्न, काय आहे भाजपचा मास्टर प्लान?
Follow us on

नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीची घोषणा झालीये. केंद्रातील सत्ताधारी भाजप सध्या जुन्या मित्र पक्षांना तसेच इतर प्रादेशिक पक्षांना सोबत घेण्याचा प्रयत्न करत आहे. कारण भाजप नेतृत्वाने 2024 च्या लढाईत एनडीएसाठी 400 पेक्षा जास्त जागांचे लक्ष्य ठेवले आहे. त्यामुळे ते साध्य करण्यासाठी भाजपच्या नेत्यांकडून प्रयत्न होऊ लागले आहेत. हे लक्ष्य गाठण्यासाठी भाजपने अनेक पक्षांना सोबत घेतले आहे. दक्षिणेतही चांगली कामगिरी करता यावी यासाठी ही भाजपचा प्रयत्न सुरु आहे. नवीन पक्षांना एनडीएत आणून जागा वाढण्याचा भाजपचा प्रयत्न आहे.

तामिळनाडूमध्ये भाजपने पीएमकेसोबत युती करण्याची घोषणा केली. दुसरीकडे महाराष्ट्रात राज ठाकरे यांच्या मनसेला देखील भाजपने सोबत घेण्यासाठी बोलणी सुरु केलीये. पंजाबमध्ये अकाली दल यांच्यासोबत बैठका आणि बोलणी सुरू आहे.

लोकसभा निवडणुका जाहीर झाल्या आहेत. सर्वच प्रमुख राजकीय पक्ष कामाला लागले आहेत. पण भाजपने रणनीती आखत ग्राऊंड लेव्हलपासून कामाला सुरुवात केली आहे. एनडीएला 400 जागा कशा मिळतील यासाठी समीकरणं जुळवली जात आहेत. एनडीएत नवीन मित्रपक्ष जोडले जात आहेत. जेडीयू, टीडीपी नंतर आता पीएमकेसोबत भाजपची युती झाली आहे. पीएमके (पट्टाली मक्कल काची) तामिळनाडूमध्ये लोकसभेच्या दहा जागा लढवणार आहे.

भाजपसोबत युती करण्याचा निर्णय पीएमकेचे संस्थापक डॉ. एस. रामदास यांनी घेतला आहे. राज ठाकरेही एनडीएत सामील होणार आहे हे जवळपास नक्की झाले आहे. 2024 च्या निवडणुकीपूर्वी एनडीएचा विस्तार होऊ शकतो. राज ठाकरे यांना किती जागा मिळतात याकडे आता सर्वांचं लक्ष लागलं आहे. मनसे महायुतीतील चौथा भागीदार असेल. युतीचा फॉर्म्युला निश्चित करण्यासाठी राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली.

पंजाबमध्ये भाजप आपला जुना मित्र अकाली दलला पुन्हा एनडीएमध्ये आणण्याचा विचार करत आहे. हे भाजपसाठी खूप महत्त्वाचे असेल. कारण दोघे एकत्र लढले तर अधिक जागा जिंकता येऊ शकतात. 22 मार्च रोजी अकाली दलची महत्त्वाची बैठक होणार आहे. भाजप आणि अकाली दल यांच्यात बैठक होणार असून, त्यात युती निश्चित होणार असल्याची चर्चा आहे. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही युती झाली तर आम आदमी पक्ष आणि काँग्रेस या दोन्ही पक्षांसाठी ही लढाई कठीण होणार आहे.