राज्यभरात सध्या होळी सणाचा उत्साह आहे. पुढच्या दोन दिवसात होळी आहे. या होळीच्या दुसऱ्या दिवशी देशभरात रंगपंचमीच्या निमित्ताने धुळवड उडवली जाणार आहे. देशभरातील नागरीक विविध रंगांची रंगपंचमी खेळणार आहेत. पण या धुळवडीनंतर देशात राजकीय धुळवड देखील उडताना बघायला मिळणार आहे. कारण देशातील सर्वात मोठी 18वी लोकसभा निवडणूक जाहीर झाली आहे. येत्या 19 एप्रिलला या निवडणुकीसाठी पहिल्या टप्प्यातलं मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी मुंबईपासून दिल्लीपर्यंत राजकीय पक्षांच्या बैठाका सुरु आहेत. कोणत्या मतदारसंघांमध्ये आपल्या पक्षाचा उमेदवार उभा करावा, प्रचाराचा मुद्दा काय ठेवावा, विरोधकांना चितपट कसं करावं, यासाठी प्रत्येक पक्षात रणनीती आखली जात आहे.
विशेष म्हणजे या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात विविध पक्षांकडून सेलिब्रिटी मंडळींनाही मोठी संधी मिळणार आहे. अनेक नावाजलेल्या सिनेकलाकारांना विविध पक्षांकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे. तर काही सिनेकलाकार हे विविध पक्षांचे स्टार प्रचारक देखील असण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे बॉलिवूडचा 90 चा काळ गाजवणारा सर्वात प्रसिद्ध अभिनेता गोविंदा देखील यामध्ये आघाडीवर असणार आहे. लोकसभा निवडणुकीत गोविंदा आघाडीवर असणार असला तरी तो आघाडीचा उमेदवार किंवा आघाडीचा प्रचार करणार नाही. कारण गोविंदा युती धर्मांचं पालन करणार आहे. त्यामागील कारणही तसं आहे. कारण गोविंदाने महायुतीमधील महत्त्वाच्या असलेल्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अभिनेता गोविंदाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेना पक्षात प्रवेश करणार आहे. तसेच गोविंदा फक्त प्रवेश करणार नाही तर निवडणूकही लढवणार असल्याची माहिती समोर येत आहे.
अभिनेता गोविंदाने 5 दिवसांपूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतल्याची माहिती समोर आली आहे. गोविंदा लवकरच शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. गोविंदा उत्तर पश्चिम मतदारसंघातून निवडणूक लढण्याची शक्यता आहे. तर उत्तर मध्य मतदारसंघासाठी काँग्रेसकडून स्वरा भास्कर आणि राज बब्बर यांचं नाव चर्चेत आहे. विशेष म्हणजे स्वरा भास्कर यांनी दिल्लीत काँग्रेस नेते रमेश चेन्निथला यांची भेट घेतल्याचीदेखील माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. शिंदेंच्या शिवसेनेसाठी बॅालिवूड, टॅालिवूड आणि अनेक मराठी सिनेकलाकार प्रचार करणार आहेत. शिवसेनेने बॅालिवूड सिनेकलाकारांची स्टार प्रचारक यादी तयार केली आहे. हे सिने कलाकार राज्यभरात शिवसेनेचा प्रचार करणार आहेत. मतदारसंघ निहाय भाषिक आधारावर त्या-त्या मतदारसंघात हे सिने कलाकार प्रचार करतील. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वीच अभिनेता गोविंदाने ‘वर्षा’ बंगल्यावर मुख्यमंत्र्यांची भेट घेतली होती. गोविंदा मुंबईत शिवसेनेचा स्टार प्रचारक असणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. असे अनेक सिने कलाकार आहेत ज्यांच्याशी शिवसेनेच्या नेत्यांनी चर्चा केली आणि त्यांची भेट घेतली आहे