लोकसभा निवडणुकीच्या निकालामुळे महायुतीत खळबळ उडाली आहे. महायुतीला या निवडणुकीत प्रचंड मोठं नुकसान झालं आहे. चार पक्ष आणि छोट्या संघटना आणि राजकीय पक्षांना घेऊनही महायुतीला यश मिळवता आलं नाही. महायुतीसाठी हा धक्का मानला जात आहे. मराठा, मुस्लिम, दलित आणि आदिवासी मते हातून गेल्यानेच महायुतीला मोठा फटका बसल्याचं सांगितलं जात आहे. या मतांचा फटका कसा बसला? महायुतीला पराभूत का व्हावं लागलं? त्यावेळी नेमकं काय घडलं? याचं परखड विश्लेषण महायुतीचे बडे नेते आणि राज्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी केलं आहे.
टीव्ही9 मराठीचे मॅनेजिंग एडिटर उमेश कुमावत यांनी छगन भुजबळ यांची मुलाखत घेतली. संपादक उमेश कुमावत यांनी विचारलेल्या प्रश्नांना भुजबळ यांनी सडेतोड उत्तरे दिली. यावेळी त्यांनी लोकसभा निवडणुकीचं विश्लेषण करताना अजितदादा गटावर होणाऱ्या आरोपांचीही चिरफाड केली. या निवडणुकीत मुस्लिम समाज युतीपासून दूर गेला होता. याचं एकच उदाहरण सांगतो. धुळ्यात सहा मतदारसंघापैकी पाच मतदारसंघात युतीचा उमेदवार फार पुढे होता.
मालेगाव या एकाच मतदारसंघात महायुतीचा उमेदवार अत्यंत पिछाडीवर होता. त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या उमेदवार शोभाताई यांना 1 लाख 96 हजार मते मिळाली. आणि युतीच्या उमेदवाराला फक्त 4 हजार मते पडली. एकाच मतदारसंघात शोभाताई तब्बल दोन लाखा मतांनी आघाडीवर होत्या. या एका मतदारसंघातील मतांमुळे त्यांनी दुसऱ्या पाच मतदारसंघातील खड्डा भरून काढला. म्हणजेच मुस्लिम समाज महायुतीच्या विरोधात होता हे स्पष्ट आहे, असं छगन भुजबळ म्हणाले.
पिंपळगावच्या मोदींच्या सभेत 400 पारचा नारा लगावला गेला. त्याचा अर्थ भाजप संविधान बदलणार असा लावला गेला. त्यामुळे दलित आणि आदिवासी घाबरले. तो घटकही महायुतीपासून बाजूला गेला. मराठा आंदोलन हे दोन तीन जिल्ह्यात प्रकर्षाने होते. ते मराठवाड्यात आहे. विदर्भात काही जाणवलं? विदर्भातही जिथे युतीचे 10 खासदार होते तिथे तीनच खासदार आले. तो परिणाम कसला आहे? हा परिणाम काही ठिकाणी झाला. पण तो दोन ते तीन जिल्ह्यात झाला, असं सांगतानाच अमोल कोल्हे का निवडून आले? मराठा मते गेल्यावर माणसे पडतात. अमोल कोल्हे आले ना निवडून. काही मतदारसंघात मराठा मतदारांचा प्रभाव जाणवला, असं भुजबळ यांनी स्पष्ट केलं.
अजितदादा गटाची मते भाजपला गेली हे म्हणणं चुकीचं आहे. जिथे भाजपचे आमदार आहे. त्या मतदारसंघात पाहा. तिथेही भाजपला लीड मिळाली नाही. तिथे लीड मिळाली असती तर भाजपची पिछेहाट झाली नसती. भाजपच्या आमदारांच्या मतदारसंघातही भाजपची पिछेहाट झाली आहे. त्यामुळे पराभवाचं खापर एकाच पक्षाला चिकटवणं आणि तेवढाच अभ्यास पुढे करणं योग्य नाही, असा टोला त्यांनी लगावला.