महाराष्ट्राच्या राजकारणात आता नवा भूकंप आलाय. कारण उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा देण्याची इच्छा व्यक्त केली आहे. महाराष्ट्रात भाजपच्या झालेल्या पराभवाची जबाबदारी आपण स्वीकारत असून केंद्रीय नेतृत्वाने आपल्यावर उपमुख्यमंत्री पदाच्या जबाबदारीतून बाजूला करावं. आपल्याला संघटनेसाठी काम करायचं आहे, अशी भावना देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या या भूमीकेवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “एका निवडणुकीत सर्व काही संपत नसतं. एका निवडणुकीत हार-जीत झाली म्हणून आम्ही खचून जाणारे नाही आहोत. त्यांनी भावना व्यक्त केल्या असतील. पण टीम म्हणून आम्ही एकत्र काम करत राहणार”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
“मी आता त्यांची प्रतिक्रिया ऐकली. निवडणुकांमध्ये हार-जीत होत असते. काही आता जी निवडणूक झाली त्यामध्ये मतदानाची टक्केवारी पाहिली तर मविआला जागा जास्त मिळाल्या असल्या तरी मतांची टक्केवारी सारखी आहे. मुंबईत तर आम्हाला 2 लाख मतं जास्त मिळाली आहे. त्यामुळे आम्ही सर्वांनी मिळून काम केलेलं आहे. सगळ्यांचं जे काही यश-अपयश आहे, ती आमची सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे, असंच समजतो. आम्ही टीम म्हणून हे काम केलं आहे. राज्यातदेखील खूप चांगलं काम झालेलं आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मी, उपमुख्यमंत्री अजित पवार असतील, आम्हाला पुढेदेखील राज्यासाठी एकत्र काम करायचं आहे”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.
“मी देवेंद्र फडणवीस यांच्याशी नक्की बोलेन आणि राज्यासाठी एकत्र काम करु. आम्ही एकत्र काम केलं आणि निवडणुकांचे जदे निकाल आले त्याची आमची सर्वांची जबाबदारी आहे. त्यामुळे कुणाच्या एकट्याची जबाबदारी आहे, असं म्हणणारा मी कार्यकर्ता नाही. त्यामुळे मी नक्की त्यांच्याशी बोलेन”, असं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“महायुतीला कमी जागा मिळण्याचं कारण सर्वांना माहिती आहे. संविधान बदलणार, आरक्षण काढणार, अशी दिशाभूल करुन, एक अपप्रचार करुन, या ठिकाणी मिळवलेली मतं आहे. त्यामध्ये विरोधकांना काही प्रमाणात यश मिळालं. या विरोधकांची खरे चेहरे जनतेला दिसतील. मूळ मतदार त्यांच्यापासून दुरावले आहेत. त्यांना दोन-दोन लाखांचा लीड मिळायला होतं. पण ते मिळालं नाही. काही काळानंतर ज्यांचा संभ्रम झालाय, तो संभ्रम दूर होईल आणि यांचा खरा चेहरा दिसेल”, असं शिंदे म्हणाले.
“हे तात्पुरती आहे. हे कायम नाही. मोदी हटाव या विचाराने पछाडलेले लोक होते. तर दुसरीकडे देशाच्या विकासाला पुढे घेऊन जाणारे मोदी होते. काही लोक म्हणत होते की, मोदींना तडीपार करा. पण देशाने मोदींना बहुमत दिलेलं आहे”, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला.