काँग्रेसच्या रामटेकच्या उमेदवार रश्मी बर्वे यांची उमेदवारी रद्द झाली आहे. रश्मी बर्वे यांचं जातप्रमाणपत्र आज सकाळीच रद्द झालं होतं. त्यानंतर आज संध्याकाळी रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद झाल्याची माहिती समोर आली आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे. रश्मी बर्वे यांच्यासह त्यांचे पती श्यामकुमार बर्वे यांच्याकडूनही उमेदवारी अर्ज भरण्यात आला आहे. रश्मी बर्वे यांचे जातप्रमाणपत्र अवैध असल्याचा आरोप गेल्या काही दिवसांपासून केला जात होता. पण रश्मी यांनी सर्व आरोप फेटाळले होते. आपल्याविरोधात विरोधकांचं हे षडयंत्र असल्याचं रश्मी बर्वे म्हणाल्या होत्या. पण त्यानंतर त्यांचं जातप्रमाणपत्र आज सकाळी जात पडताळणीत रद्द झालं होतं. त्यानंतर आज संध्याकाळी रश्मी बर्वे यांची उमेदवारी निवडणूक आयोगाकडून रद्द करण्यात आली आहे.
रामटेक ही जागा अनुसूचित जातीसाठी राखीव आहे. काँग्रेसकडून या मतदारसंघातून रश्मी बर्वे यांना उमेदवारी जाहीर झाली होती. पण रश्मी बर्वे यांचं जातप्रमाणपत्र आणि जात वैधता प्रमाणपत्र हे जात पडताळणी समितीने रद्द केलं आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाकडून त्यांचा उमेदवारी अर्ज आज छाननीत रद्द करण्यात आला आहे.
रश्मी बर्वे यांच्या जात प्रमाणपत्राविरोधात कोर्टात याचिका दाखल करण्यात आली होती. रश्मी बर्वे यांच्याविरोधात बाजू मांडणाऱ्या वकिलांनी टीव्ही 9 मराठीला प्रतिक्रिया दिलीय. “आमचा आक्षेप मंजूर करण्यात आलाय. रश्मी बर्वे यांच्या एबी फॉर्मवर श्यामकुमार बर्वे यांचं नाव देण्यात आलं आहे. त्यामुळे श्यामकुमार बर्वे हेच उमेदवार असतील, असं निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे”, अशी माहिती वकिलांनी दिली.
रश्मी बर्वे यांची कास्ट वैलिडिटी प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने आज रद्द केलं. त्यानंतर अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या रामटेक मतदारसंघातून रश्मी बर्वे यांचा उमेदवारी अर्ज रद्द करण्यात आला. सुनील साळवे नावाच्या व्यक्तीने रश्मी बर्वे यांचं जात प्रमाणपत्र तयार करताना बनावट कागदपत्र दिल्याची तक्रार केली होती. सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य विभागाकडे ही तक्रार करण्यात आली होती. त्यानंतर याप्रकरणी चौकशी करून अहवाल तात्काळ देण्याची सूचना जात पडताळणी समितीला सामाजिक न्याय विभागाने केली होती.
जात पडताळणी समितीने आज रश्मी बर्वे यांचे अनुसूचित जातीतील ‘चांभार’ जातीचे जात वैधता प्रमाणपत्र रद्द केलं. यानंतर निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकून घेत सुनावणी पूर्ण केली. यावेळी रश्मी बर्वे यांची रामटेक मधून काँग्रेस तर्फे देण्यात आलेले उमेदवारी रद्द करण्याचा निर्णय देण्यात आला. आता रश्मी बर्वे यांच्या नंतर पर्यायी उमेदवार म्हणून अर्ज दाखल केलेले त्यांचे पती श्यामकुमार बर्वे हे काँग्रेसचे रामटेकमधून अधिकृत उमेदवार असतील, अशी प्रतिक्रिया आक्षेपकाचे वकील मोहित खजानची यांनी दिली.