सुरत आणि इंदूर लोकसभा निवडणुकी दरम्यान सर्वच उमेदवारांनी माघार घेतले होती. त्यानंतर त्या ठिकाणी लोकसभा निवडणूक बिनविरोध झाली. यामुळे त्या ठिकाणी नोटा आणि उमेदवार यांच्यात लढत झाली पाहिजे होती, असा मतप्रवाह सुरु झाला. त्यावर निवडणूक आयुक्तांनी सोमवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत उत्तर दिले. निवडणूक आयुक्त राजीवकुमार म्हणाले की, आमची धारणा आहे सर्वच ठिकाणी मतदान झाले पाहिजे. परंतु निवडणुकीदरम्यान उमदेवार आपला उमेदवारी अर्ज माघारी घेत असेल तर आम्ही काय करु शकतो? आम्ही स्वइच्छेने माघार घेतल्यामुळे काहीच करु शकत नाही. परंतु उमेदवारावर कोणाचा दबाब असेल तर आम्ही काही भूमिका घेऊ शकतो, असे निवडणूक आयुक्तांनी सांगितले.
लोकसभा निवडणूक निकालापूर्वी निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेतली. मंगळवारी ४ जून रोजी होणाऱ्या मतमोजणीची तयारी पूर्ण झाली असल्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी सांगितले. यावेळी त्यांनी या निवडणुकीत जागतिक विक्रम झाल्याचे सांगितले. जगात प्रथमच ६४ कोटी २ लाख लोकांनी मतदानाचा हक्क बजावला. जगभरातील कोणत्याही देशात इतक्या विक्रमी संख्येने मतदान झाले नाही. देशातील ३१ कोटी २० लाख मतदारांनी मतदान केले. देशातील ज्येष्ठ लोकांनी मोठ्या संख्येने मतदान केले.
देशातील मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी मोठ्या प्रमाणावर यंत्रणा कार्यरत होती. १३५ स्पेशल ट्रेन सातत्याने निवडणूक यंत्रणा आणि कर्मचाऱ्यांना नेण्याचे आणि आणण्याचे काम करत होते. या निवडणुकीत देशात कुठेही हिंसा झाली नाही. त्यासाठी गेल्या दोन वर्षांपासून सातत्याने प्रयत्न सुरु होते. मणिपूर, काश्मीर यासारख्या ठिकाणी शांततेत मतदान झाले. काश्मीरमध्ये 51.05 टक्के मतदान झाले. आता जम्मू-काश्मीरमध्ये निवडणूक घेतली जाणार आहे.