देशभरात लोकसभेच्या 543 जागांसाठी गेल्या महिन्याभरात 7 टप्प्यांमध्ये मतदान पार पडलं. लोकसभा निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यासाठीचं मतदान आज पार पडलं. यानंतर आता एक्झिट पोलची आकडेवारी समोर आली आहे. लोकसभा निवडणुकीचा निकाल येत्या 4 जूनला समोर येणार आहे. त्याआधी आज लोकसभेत कोण बाजी मारणार? याबाबतचा अंदाज वर्तवणारी आकडेवारी समोर आली आहे. एक्झिट पोलच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात महाविकास आघाडीला 25 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महायुतीला 22 आणि अपक्षाला 1 जागा मिळण्याची शक्यता आहे. महाराष्ट्रात लोकसभेच्या एकूण 48 जागा आहेत. यापैकी सर्वाधिक 25 जागांवर महाविकास आघाडीचे उमेदवार जिंकून येण्याची शक्यकता आहे. महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षात अनेक राजकीय घडामोडी घडल्या. महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन मोठ्या पक्षांमध्ये फूट पडली. या फुटीचा मोठा फटका महायुकीला बसल्याचा अंदाज एक्झिट पोलची आकडेवारीतून स्पष्ट होत आहे.
टीव्ही 9 पोलस्ट्रेटच्या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात भाजपला सर्वाधिक 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. भाजप हा महाराष्ट्रातील सर्वात मोठा पक्ष ठरण्याची शक्यता आहे. तर त्यापाठोपाठ उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वातील शिवसेना पक्ष नंबर दोनचा पक्ष ठरणार आहे. ठाकरे गटाला महाराष्ट्रात 14 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पक्षाला 4 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर काँग्रेसला 5 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. शरद पवार गटाला 6 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाला एकही जागा मिळणार नाही, असा अंदाज एक्झिट पोलने वर्तवला आहे.
टीव्ही 9 पोलस्ट्रेटच्या आकडेवारीनुसार, अहमदनगर लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुजय विखे पाटील पिछाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार निलेश लंके या मतदारसंघात आघाडीवर आहेत. अमरावतील लोकसभा मतदारसंघात भाजपच्या नवनीत राणा आघाडीवर आहेत. बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत. चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात काँग्रेसचे उमेदवार प्रतिभा धानोरकर आघाडीवर आहेत. या मतदारसंघात भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार पिछाडीवर आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात खासदार उदयनराजे भोसले पिछाडीवर आहेत. तर राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शशिकांत शिंदे आघाडीवर आहेत. सांगली लोकसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवार विशाल पाटील हे आघाडीवर आहेत. मुंबई वायव्य लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाचे अमोल कीर्तिकर आघाडीवर आहेत.
महाराष्ट्राची आकडेवारी महायुतीला धक्का देणारी असली तरी देशात महायुतीला सर्वाधिक जागा मिळण्याची शक्यता आहे. एनडीएला देशभरात 353 ते 368 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीला 188 ते 133 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे. तर अपक्षांना 43 ते 48 जागांवर यश मिळण्याची शक्यता आहे.