लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर आता विजय-पराभवाची चर्चा सुरु झाली आहे. विजयाचा जल्लोष सुरु आहे तर दुसरीकडे पराभवाची जबाबदारी निश्चित केली जात आहे. त्यावेळी विविध राजकीय नेत्यांकडून विविध प्रकारची वक्तव्य केली जात आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी धक्कादायक विधान केले आहे. बारामतीमध्ये लोकसभेसाठी सुप्रिया सुळे अन् विधानसभेसाठी अजितदादा असे लोकांच्या मनात होते, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे. यामुळे बारामतीमध्ये अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा पराभव होणार होतो, हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना माहीत होते की काय? अशी चर्चा सुरु झाली आहे.
देशात अनेक ठिकाणी पडझड झाली, त्यात कोल्हापूरचा सामावेश झाला. कोल्हापूरमध्ये जवळजवळ 6 लाख लोकांनी संजय मांडलिक यांना मतदान केले आहे. संजय मांडलिक यांना कागलमधून मताधिक्क मिळाले नाही, त्याचा धक्का आम्हाला बसला आहे. पण आम्ही खचून न जाता विधानसभा निवडणुकासाठी कामाला लागलो आहेत. शक्तीपीठ महामार्गाला शेतकऱ्यांनी विरोध केला होता, त्याच्या नाराजीचा देखील फटका बसला आहे. आम्हाला मागच्या वेळी एक जागा होता ती कायम आहे, असे हसन मुश्रीफ यांनी म्हटले आहे.
बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांना लोकसभेसाठी पाठिंबा द्यावा आणि विधानसभेला अजितदादा यांना पाठिंबा द्यावा, असे लोकांच्या मनात होते. त्यामुळे बारामती लोकसभा मतदार संघात सुनेत्रा पवार यांचा पराभव झाला. आता येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत अजित पवार दोन लाखांच्या मताधिक्याने निवडून येतील, यात शंका नाही. पराभव झाला असला तरी पुन्हा पराभवाचे आत्मचिंतन करुन ज्या बाबी राहिल्या आहेत त्या दुरुस्त करून पुन्हा नव्या जोमाने सुनेत्रा पवार कामाला सुरुवात करतील, असे ते म्हणाले.
निवडणुकीत जय-पराजय होत असतो. तो विनम्रपणे स्वीकारला पाहिजे. विजय झाला तर त्याचा उन्माद करायचा नाही आणि पराजय झाला म्हणून खचून जायचे नाही. आपला नेता हा वाघाच्या काळजाचा आहे. पराभव झाला म्हणून खचून जाणारा नाही. त्यामुळे आपल्या नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहून येणार्या विधानसभा निवडणुकीला सामोरे जाऊ.