पंतप्रधान नरेंद्र मोदी वाराणासीतून जिंकले आहेत. त्यांनी वाराणासीत विजयाची हॅट्रीक केली आहे. मोदींनी काँग्रेसचे उमेदवार अजय राय यांचा तब्बल दोन लाख मतांनी पराभव केला आहे. मोदी वाराणासीतून तिसऱ्यांदा विजयी झाले असले तरी मोदींचा करिष्मा मात्र संपुष्टात आल्याचं दिसून आलं आहे. गेल्या दोन निवडणुकांच्या तुलनेत मोदींच्या मताधिक्यामध्ये यंदा मोठी घट झाली आहे. यावरून मोदी यांची लाट ओसरल्याचं स्पष्ट दिसून येतं.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वाराणासीतून तिसऱ्यांदा उभे होते. त्यांच्या विरोधात इंडिया आघाडीने अजय राय यांना उमेदवारी दिली होती. अजय राय हे काँग्रेसचे उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष आहेत. मोदींनी राय यांना 1 लाख 50 हजार मतांनी पराभूत करत विजय मिळवला आहे. यावेळी मोदी आणि राय यांच्यात सरळ लढत होती. तरीही मोदींना दोन निवडणुकांच्या तुलनेत अत्यतं कमी मार्जिन मिळाली आहे.
2019मध्ये मोदींना वाराणासीत 6,74,664 मते मिळाली होती. त्यावेळी मोदी 4.79 लाख मताधिक्यांनी विजयी झाले होते. तर 2014च्या निवडणुकीत मोदींना 56.37 मते मिळाली होती. मोदी 3.72 लाख मताधिक्य घेऊन विजयी झाले होते. त्यांनी आम आदमी पार्टीचे नेते अरविंद केजरीवाल यांचा पराभव मोदींनी केला होता. यावेळी अजय राय हे तिसऱ्या क्रमांकावर होते. मोदींनी 2014मध्ये 3.72 लाखांचं मताधिक्य घेतलं होतं. त्यानंतर 2019मध्ये हे मताधिक्य वाढून 4.79 लाख झालं होतं. मात्र, यंदाच्या निवडणुकीत मोदींना केवळ 1.50 लाख मताधिक्य मिळालं आहे. म्हणजे गेल्यावेळीच्या तुलनेत यंदा मोदी यांच्या मताधिक्यामध्ये 3. 29 लाखाची घट झाली आहे. यावरून मोदी यांच्या लोकप्रियतेला ओहोटी लागल्याचं दिसून येत आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकांचे कल हाती आले आहेत. या कलांमध्ये भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. गेल्या सलग दोन निवडणुकात भाजपला बहुमत मिळालं होतं. त्यांना मित्रपक्षांचीही गरज भासली नव्हती. मात्र, यावेळी भाजप बहुमतापासून दूर आहे. त्यामुळे भाजपला मित्र पक्षांची गरज भासणार आहे. भाजपच्या नेतृत्वातील एनडीएला 294 जागा मिळाल्या आहेत. म्हणजे एनडीएला स्पष्ट बहुमत मिळालं आहे. मात्र, यातील जागा मित्र पक्षांच्याही आहेत. त्यामुळे हे मित्र पक्ष भाजपला कसं सहकार्य करतात याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.