BJP List : लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने उमेदवारांची पाचवी यादी जाहीर केली आहे. भाजपच्या या यादीत अनेक नव्या लोकांना संधी देण्यात आली आहे. या यादीत सर्वात दोन नावांकडे सर्वांचे लक्ष लागले होते. पहिला बॉलीवूड अभिनेत्री कंगना राणौत आणि दुसरा अभिनेता अरुण गोविल जे ‘भगवान राम’च्या भूमिकेसाठी प्रसिद्ध झाले. भाजपने हिमाचल प्रदेशातील मंडीमधून कंगना राणौतला तिकीट दिले आहे तर अरुण गोविल यांना उत्तर प्रदेशातील मेरठमधून लोकसभा निवडणूक लढवणार आहेत.
भाजपच्या उमेदवारांच्या या पाचव्या यादीत आणखी अनेक नावांची चर्चा आहे. भाजपने सुलतानपूरमधून मनेका गांधी यांना उमेदवारी दिली आहे. तर उत्तर प्रदेशचे मंत्री जितिन प्रसाद यांना पीलीभीतमधून तिकीट मिळाले आहे. उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत जितिन प्रसाद यांनी काँग्रेस सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केलाय. या लोकसभा निवडणुकीत वरुण गांधींच्या जागी त्यांना पिलीभीतमधून उमेदवारी देण्यात आली आहे.
भाजपने केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांना संबलपूरमधून आणि संबित पात्रा यांना पुरीमधून उमेदवारी दिली आहे. याशिवाय झारखंडच्या दुमका मतदारसंघातून भाजपने सीता सोरेन यांना उमेदवारी दिली. सीता सोरेन या JMM प्रमुख आणि झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांच्या सून आहेत आणि सीता सोरेन झारखंडचे माजी मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या वहिनी आहेत. उत्तरा कन्नड मतदारसंघातून माजी केंद्रीय मंत्री अनंतकुमार हेगडे यांचे तिकीट कापले गेले आहे.
काँग्रेस सोडून भाजपमध्ये दाखल झालेले माजी खासदार नवीन जिंदाल यांना भाजपने कुरुक्षेत्रमधून उमेदवारी दिली आहे. केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह पुन्हा एकदा बेगुसरायमधून निवडणूक लढवणार आहेत, तर अन्य केंद्रीय मंत्री बिहारमधून नित्यानंद राय, उझियारपूरमधून आरके सिंह, पाटलीपुत्रमधून रामकृपाल यादव निवडणूक लढवणार आहेत. माजी केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांना पुन्हा एकदा पटना साहिबमधून तर सुशील कुमार सिंह यांना औरंगाबादमधून तिकीट देण्यात आले आहे.
भाजपने आतापर्यंत 291 लोकसभा जागांसाठी उमेदवारांची नावे जाहीर केली आहेत. यामध्ये उत्तर प्रदेश, गुजरात, पश्चिम बंगाल, झारखंड, राजस्थान, हरियाणा, कर्नाटक, तामिळनाडू, उत्तराखंड, केरळ आणि तेलंगणा या राज्यांसह इतर राज्यांतील उमेदवारांचा समावेश आहे.