भाजपला 2014नंतर पहिल्यांदाच 272 चा आकडा गाठता आलेला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या तिसऱ्या टर्ममध्ये बहुमत मिळवू शकले नाहीत. त्यामुळे भाजपला आता मित्र पक्षांच्या भरवश्यावर सरकार चालवावं लागणार आहे. प्रत्येक निर्णय प्रक्रियेत मित्र पक्षांना घ्यावं लागणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या निवासस्थानी आज एनडीएची बैठक झाली. यावेळी सर्व मित्र पक्षांनी मोदींना पाठिंबा दिला आहे. एनडीएने सरकार स्थापन करण्याच्याही हालचाली सुरू केल्या आहेत. तर इंडिया आघाडीही केंद्रात सरकार स्थापन करू शकते, असं चित्र आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, केंद्रात सरकार स्थापन करण्यासाठी इंडिया आघाडी मोठा डाव टाकू शकते. मुख्यमंत्री नीतीश कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिली जाऊ शकते. नीतीश कुमार यांना पंतप्रधानपदाची ऑफर दिल्यानंतर चिराग पासवान आणि हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे संस्थापक जीतन राम मांझी हे सुद्धा इंडिया आघाडीत येऊ शकतात. तसेच बिहारच्या पूर्णियातून खासदार झालेले पप्पू यादव, सांगलीचे खासदार विशाल पाटील, लडाखमधून जिंकलेले मोहम्मद हनीफा आणि दमन व दीवमधून जिंकलेले पटेल उमेशभाई बाबूभाई हे सुद्धा इंडिया आघाडीला पाठिंबा देऊ शकतात.
बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार यांच्या जेडीयूचे 12 खासदार आहेत. चिराग पासवान यांच्या जनशक्ती पार्टीचे 5 खासदार आहेत. माजी मुख्यमंत्री जीतन राम मांझी यांचे खासदार आणि काही अपक्ष मिळून 22 खासदार इंडिया आघाडीकडे येऊ शकतात. इंडिया आघाडीच्या 234 खासदारांमध्ये 22 खासदारांची भर पडल्यास हा आकडा 256 एवढा होतो. वायएसआर काँग्रेसचे चार खासदार आणि एमआयएमने बाहेरून पाठिंबा दिला तर इंडिया आघाडीचा आकडा 261 वर जातो.
आंध्र प्रदेशाला विशेष राज्याचा दर्जा देण्याच्या मागणीवरून चंद्राबाबू नायडू हे एनडीएतून बाहेर पडू शकतात. चंद्राबाबू यांचे 16 खासदार आहेत. चंद्राबाबू इंडिया आघाडीसोबत आल्यास इंडिया आघाडीचा बहुमताचा आकडा पूर्ण होतो. मात्र, चंद्राबाबू नायडू आणि नीतीश कुमार यांनी एनडीएला पाठिंबा दिला असला तरी या दोघांची मने कधीही वळू शकतात असा विश्वास इंडिया आघाडीला आहे. त्यामुळे इंडिया आघाडीकडून या दोघांना आपल्याकडे खेचण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू झाले आहेत.
दरम्यान, इंडिया आघाडीची आज बैठक झाली. या बैठकीत काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी मित्र पक्षांची मते जाणून घेतली. यावेळी सर्वांनीच सरकार स्थापन करण्यासाठी प्रयत्न करण्याची गरज व्यक्त केली. त्यामुळे खरगे आता सर्व समविचारी पक्षांना इंडिया आघाडीत येण्याचं आवाहन करणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी एनडीएतील काही घटक पक्षांना खरगे यांच्याकडून ऑफर दिली जाऊ शकते, असं सूत्रांनी सांगितलं. खरगेंच्या या संकेतांमुळे दिल्लीतील राजकीय वातावरण चांगलंच तापण्याची शक्यता वर्तवली जात आहे.