लोकसभा निवडणुकीचे निकाल येत्या 4 जून रोजी लागणार आहेत. त्या दिवशी कुणाची सत्ता येणार आणि कुणाची नाही हे स्पष्ट होणार आहे. मात्र, त्यापूर्वीच एक्झिट पोलचे कल हाती आले आहेत. बहुतेक एक्झिट पोलच्या कलानुसार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. तर इंडिया आघाडी सत्तेपासून दूर राहणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. मात्र, इंडिया आघाडीच्या जागा वाढतानाही दिसत आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजप सत्तेची हॅट्रीक करणार असल्याचं स्पष्ट झालं असून नरेंद्र मोदी हे पुन्हा पंतप्रधान होण्याची शक्यताही दिसत आहे.
रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 359 जागा मिळणार असल्याचं चित्र आहे. तर इंडिया आघाडीला 154 जागा मिळणार असल्याचं चिन्ह आहे. तर इतरांना 30 जागा मिळणार असल्याचा अंदाज आहे. रिपब्लिक टीव्हीच्या एक्झिट पोलमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला स्पष्ट बहुमत मिळताना दिसत आहे. बहुमतासाठी 272 जागांची गरज आहे. त्या जागा भाजपला मिळताना दिसत आहेत.
मॅट्रीजच्या एक्झिट पोलमध्ये एनडीएला बहुमत मिळताना दिसत आहे. या पोलनुसार एनडीएला 353 ते 368 जागा मिळताना दिसत आहेत. इंडिआ आघाडीला 118 ते 133 जागा मिळताना दिसत आहेत. तर इतरांना 43 ते 48 जागा मिळतील असं हा मॅट्रीजचा एक्झिट पोल सांगतो.
जन की बातनेही आपला एक्झिट पोल जाहीर केला आहे. जन की बातच्या एक्झिट पोलनुसार एनडीएला 362 ते 392 जागा मिळताना दिसत आहे. इंडिया आघाडीला 141 आणि 161 जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांना 10 ते 20 जागा मिळतील असं सांगितलं जात आहे.
कर्नाटकात भाजपला सात जागांचा घाटा होताना दिसत आहे. 2019मध्ये भाजपने 25 जागांवर विजय मिळवला होता. यावेळी भाजपला 18 जागा मिळण्याची शक्यता आहे. काँग्रेसला 8 जागांवर विजय मिळण्याची शक्यता आहे. तर जेडीएसला दोन जागा मिळतील असा अंदाज वर्तवला जात आहे.
आंध्र प्रदेशात भाजपला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे. आंध्रात लोकसभेच्या 25 जागा आहेत. त्यापैकी भाजपला फक्त दोनच जागा मिळताना दिसत आहेत. तर काँग्रेसचं खातंही उघडणार नसल्याचं एक्झिटपोल सांगतोय. आंध्रात वायएसआरसीपी पक्षाला 13 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर टीडीपीला 9 जागा मिळतील असा अंदाज आहे.