महाराष्ट्रातल्या TOP 10 लढत, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोण जिंकणार?

| Updated on: Jun 03, 2024 | 9:18 PM

महाराष्ट्रात महायुती आणि महाविकास आघाडीची खरी परीक्षा आहे. शिवसेना आणि राष्ट्रवादीतल्या फुटीनंतर कौल कोणाला?, याचाही फैसला होईल. महाराष्ट्रातल्या टॉप 10 लढतींविषयी आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत.

महाराष्ट्रातल्या TOP 10 लढत, दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, कोण जिंकणार?
लोकसभा निवडणूक
Follow us on

फक्त महाराष्ट्रच नाही तर देशाच्या राजकारणासाठी उद्याचा दिवस हा ऐतिहासिक असणार आहे. कारण 2024 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीचा निकाल हा उद्या लागणार आहे. निवडणूक आयोगाकडून मिळालेल्या माहितीनुसार, उद्या सकाळी 8 वाजेपासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. महाराष्ट्रासाठी ही निवडणूक जास्त विशेष आहे. कारण महाराष्ट्रात गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या आहेत. महाराष्ट्रात 2019 मध्ये विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीची स्थापन झाली. शिवसेना आणि भाजप हे पारंपरिक मित्र पक्ष एकमेकांच्या विरोधात ठाकले. तर शिवसेनेने आपले कट्टर राजकीय विरोधक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस या पक्षांसोबत राजकीय मैत्री केली. या तीनही पक्षांचं राज्यात महाविकास आघाडीचं सरकारही स्थापन झालं. पण या सरकारला शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी अडीच वर्षांनंतर सुरुंग लावला.

एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंड पुकारलं आणि महाविकास आघाडी सरकारचं सर्व होत्याचं नव्हतं झालं. राज्यात सत्तांतर घडून आलं. एकनाथ शिंदे आणि भाजपच्या युतीतील सरकार आलं. यानंतर वर्षभरात राष्ट्रवादीचा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील आणखी एक गट फुटून सत्तेत सहभागी झाला. या फोडाफोडीच्या राजकारणानंतर राज्यात लोकसभा निवडणूक पार पडली आहे. त्याचा निकाल आता जाहीर होणार आहे. विशेष म्हणजे एक्झिट पोलचे अंदाजही समोर आले आहेत. महाराष्ट्रातील टॉप 10 लढतींची माहिती आम्ही तुम्हाला देणार आहोत.

महाराष्ट्रातल्या TOP 10 लढतीत कोण पुढे?

  1. महाराष्ट्रातील TOP 10 लढतींपैकी पहिली लढत आहे अर्थात, बारामतीची… इथं पवार घराण्यातच फाईट आहे. शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या सुप्रिया सुळेंविरोधात अजित पवारांच्या पत्नीच सुनेत्रा पवार मैदानात आहे. TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार इथं सुप्रिया सुळे आघाडीवर आहेत.
  2. दुसरी लढत आहे, बीडची… राजकीय पुनर्वसनाच्या प्रतीक्षेत असलेल्या पंकजा मुंडेंना लोकसभेचं तिकीट देण्यात आलं. बीडमध्ये भाजपच्या पंकजा मुंडे विरुद्ध शरद पवारांच्या राष्ट्रवादीच्या बजरंग सोनावणेंमध्ये लढत आहे. TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार पंकजा मुंडे इथे आघाडीवर आहेत.
  3. तिसरी लक्ष्यवेधी लढत आहे, नागपूरची! 5 लाखांहून अधिक मतांनी विजयाचा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी व्यक्त केलाय. गडकरींच्या विरोधात इथं काँग्रेसकडून विकास ठाकरेंनी चांगली फाईट दिल्याची चर्चा आहे. आणि विकास ठाकरेंनीही विजयाचा दावा केला. TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार इथे नितीन गडकरी आघाडीवर आहेत.
  4. TOP टेन लढतीपैकी चौथी लढत आहे, चंद्रपूरची… भाजपनं मंत्री सुधीर मुनगंटीवारांना लोकसभेच्या मैदानात उतरवलं आहे. भाजपच्या सुधीर मुनगंटीवारांविरोधात काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर अशी थेट लढत आहे…TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार काँग्रेसच्या धानोरकर आघाडीवर आहेत.
  5. पाचवी लढत आहे, अमरावतीची. विद्यमान खासदार नवनीत राणांनी भाजपात जावून तिकीट मिळवलं होतं. भाजपच्या नवनीत राणांच्या विरोधात काँग्रेसकडून बळवंत वानखेडे आणि बच्चू कडूंच्या प्रहार कडून दिनेश बूब अशी तिरंगी लढत आहे. TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, नवनीत राणा आघाडीवर आहेत.
  6. सहावी लढत आहे, कोल्हापूरची… इथं छत्रपती शाहू महाराज काँग्रेसकडून लढत आहेत. काँग्रेसच्या शाहू महाराजांविरोधात शिंदेंच्या शिवसेनेकडून संजय मंडलिक मैदानात आहेत. TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार, शाहू महाराज आघाडीवर आहेत.
  7. TOP 10 लढती पैकी 7वी लढत छत्रपती संभाजीनगरची आहे. इथं शिंदेंचे मंत्री संदीपान भुमरे लोकसभेच्या आखाड्यात आहेत. संभाजीनगरमध्ये तिहेरी लढत आहे. MIMचे विद्यमान खासदार इम्तियाज जलील, शिंदेंच्या शिवसेनेचे संदीपान भुमरे आणि ठाकरेंच्या शिवसेनेकडून चंद्रकांत खैरे रणांगणात आहेत. TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार चंद्रकांत खैरे आघाडीवर आहेत.
  8.  आठवी लढत सोलापूरची आहे. सोलापुरात 2 आमदार एकमेकांसमोर उभे आहेत. सोलापुरात काँग्रेसच्या प्रणिती शिंदेंविरोधात भाजपकडून राम सातपुतेंमध्ये लढत आहे. TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार प्रणिती शिंदे आघाडीवर आहेत.
  9. 9 वी लढत पुण्याची आहे. पुण्यात भाजपकडून मुरलीधर मोहोळ आणि काँग्रेसकडून आमदार रवींद्र धंगेकर अशी थेट लढत आहे. TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार मोहोळ आघाडीवर आहेत.
  10. TOP 10 मधील 10 वी लढत माढ्याची आहे. कारण इथं निवडणुकीआधी फार उलथापलथ झाली. भाजपच्या रणजीत सिंह निंबाळकरांविरोधात शरद पवारांच्या राष्ट्रवादी धैर्यशील मोहिते पाटील मैदानात आहेत. TV9 पोलस्ट्राटच्या एक्झिट पोलनुसार धैर्यशील मोहिते आघाडीवर आहेत.