लोकसभा निवडणुकांच्या निकालानंतर देशात भाजपप्रणित एनडीएचं सरकार सत्तेवर येणार असल्याचं स्पष्ट झालं असून नरेंद्र मोदी हे सलग तिसऱ्यांदा पंतप्रधान म्हणून शपथ घेतील. या निवडणुकीत एनडीएला बहुतम मिळालं असलं तरी भाजपची मोठी पिछेहाट झाली असून त्यांना स्वबळावर सत्ता मिळालेली नाही. याच पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा गटाचे नेते आणि खासदार संजय राऊत यांनी भाष्य केले आहे. एनडीएने सत्तास्थापनेचा दावा केला असला तरी हे सरकार चालवताना नरेंद्र मोदींच्या नाकीनऊ येतील, अशा शब्दात संजय राऊत यांनी इशारा दिला आहे. एनडीए कुठे आहे ? चंद्राबाबू आणि नितीश कुमार म्हणजे एनडीए का ? हे दोघं तर सगळ्यांचेच आहेत. आज ते तुमच्यासोबत आहेत तर उद्या आमच्याकडे येतील असं राऊत म्हणाले.
सरकार स्थापनेच्या आधीच अग्निवीर योजनेला विरोध झाला आहे, उद्या इतर योजनांनाही ते विरोध करू शकतील. चंद्राबाबू नायडू हे मुसलमानांच्या आरक्षणाच्या बाजूने आहेत. आता मोदी काय करतील ? अनेक मुद्दे आहेत ज्यावर चर्चा सुरु आहे. त्यांना सरकार बनवायचं आहे बनवू द्या. पण मोदींकडे आणि भाजपाकडे बहुमत नाही. मोदी म्हणायचे मी काँग्रेसमुक्त भारत करणार. मात्र आम्ही सर्वांनी मिळून भाजपाला बहुमत मुक्त केलं आहे, असा टोलाही राऊत यांनी लगावला.
कंगनाला कानाखाली मारल्याच्या मुद्यावर काय म्हणाले राऊत ?
सीआयएसएफच्या एका महिला कॉन्स्टेबलने गुरुवारी चंदीगड विमानतळावर मंडीच्या भाजप खासदार आणि अभिनेत्री कंगना राणावतला थप्पड मारली. या घटनेनंतर संबंधित महिला कॉन्स्टेबलला निलंबित करण्यात आलं असून तिच्याविरुद्ध एफआयआर नोंदण्यात आला असल्याची माहिती अधिकाऱ्याने दिली. या प्रकरणावरहीव राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “कॉन्स्टेबलने तिच्या आईसाठी कायदा हातात घेतला. मात्र एका खासदारावर अशा पद्धतीने हाच उचलणं योग्य नाही”, असं ते म्हणाले.
मला कंगनाविषयी सहानुभूती आहे. त्यासुद्धा खासदार आहेत आणि खासदारावर अशा पद्धतीने हात उचललं नाही पाहिजे. मात्र या देशात शेतकऱ्यांचा आदर झालाच पाहिजे, मग ते शेतकऱ्यांचे पुत्र असोत किंवा कन्या असोत. लोकांच्या मनात अजूनही किती राग आहे, हे समजून घेतलं पाहिजे, असंही राऊत यांनी नमूद केलं.
पराभवाबद्दल चिंतन करू
आमचा पराभव जिथे झाला त्याबद्दल चिंतन करून आम्ही कारणमीमांसा करणार आहोत. तसं भाजपालाही करावंच लागेल. भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र व उत्तर प्रदेश मध्ये झालेल्या पराभवाचे चिंतन करणारच . राज्यात काय करायला गेलो आणि काय झालं? यावर चिंतन होईल. हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे असं संजय राऊत म्हणाले.