उद्धव ठाकरे यांचे दोन खासदार मोदींना पाठिंबा देणार; नरेश म्हस्के यांच्या दाव्याने खळबळ

| Updated on: Jun 08, 2024 | 12:25 PM

लोकसभा निवडणुकीचे निकाल आल्यानंतर राज्यातील चित्र बदललं आहे. महायुतीला निवडणुकीत मोठं अपयश आलं तर महाविकास आघाडीला यश आलं आहे. चार पाच महिन्यावर लोकसभा निवडणुका आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर महायुती आणि महाविकास आघाडीकडून वेगवेगळे दावे केले जात आहेत. शिंदे गटाचे ठाण्यातील खासदार नरेश म्हस्के यांनीही एक दावा करून खळबळ उडवून दिली आहे.

उद्धव ठाकरे यांचे दोन खासदार मोदींना पाठिंबा देणार; नरेश म्हस्के यांच्या दाव्याने खळबळ
Follow us on

लोकसभा निवडणुकीतील अपयशामुळे महायुतीत खळबळ उडालेली आहे. त्यामुळे महायुतीचे आमदार आपल्या संपर्कात असल्याचा दावा महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. या आमदारांना पक्षप्रवेश द्यायचा की नाही हे आमचे वरिष्ठ नेते ठरवतील असं महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. ही चर्चा सुरू असतानाच आता शिंदे गटाकडूनही मोठा दावा केला आहे. शिंदे गटाचे ठाण्यातील नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी एक मोठा दावा करून खळबळ उडवून दिली आहे.

देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचं सरकार आलं आहे. आमच्या सरकारला पूर्ण बहुमत आहे. हे सरकार पाच वर्ष व्यवस्थित कारभार करेल, असं सांगतानाच उद्धव ठाकरे यांच्या गटाचे दोन खासदार नरेंद्र मोदी यांना पाठिंबा देणार आहेत, असा दावा नरेश म्हस्के यांनी केला आहे. म्हस्के यांच्या दाव्याने खळबळ उडाली आहे. ठाकरे गटात पुन्हा एकदा राजकीय भूकंप होणार की काय? अशी चर्चा आता रंगू लागली आहे. तर दुसरीकडे मोदींना कोणते दोन खासदार पाठिंबा देणार? याची उत्सुकता सर्वांनाच लागली आहे.

ठाकरे गटातून निवडून आलेल्या दोन खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना संपर्क साधला आहे. दोन खासदार आले तर ते अपात्र होऊ शकतात. त्यामुळे खासदारांची संख्या वाढवण्यासाठी प्रयत्न सुरू आहे. किमान उबाठा गटातून 9 खासदार येणं आवश्यक आहे. तर अपात्रतेचा निकष लागू शकणार नाही. तशीही सहा जणांची गरज आहे. अपात्रतेवर मार्ग काढण्याची गरज आहे, असं नरेश म्हस्के मीडियाशी बोलताना म्हणाले.

दोन दिवसात कळेल

आमचे सरकार येत आहे. त्यामुळे खासदार पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि एकनाथ शिंदे यांना पाठिंबा द्यायला तयार आहेत. दोन दिवसात कळेल तुम्हाला. उद्धव ठाकरेंवर हे खासदार नाराज आहेत. येत्या दोन दिवसात काही गोष्टी स्पष्ट होतील, असंही ते म्हणाले.

श्रीकांत शिंदे यांना मंत्री करा

आम्ही पक्षाचे पाईक आहोत. ठाकरेंनी चुकीच्या पद्धतीने मते मिळवली. त्यामुळे शिवसैनिक नाराज आहेत, असं सांगतानाच श्रीकांत शिंदे यांना मंत्रीपद द्यावं ही आमदार आणि खासदारांची मागणी आहे. श्रीकांत शिंदे तीन टर्मचे खासदार आहेत. ते संसद रत्न आहेत. संघटनावाढीत त्यांचं मोठं योगदान आहे. त्यांना मंत्रीपद दिलं तर संघटना वाढीसाठी त्याचा फायदाच होणार आहे. त्यामुळे श्रीकांत शिंदे यांना मंत्रिपद द्यावं ही आम्ही एकनाथ शिंदे यांना विनंती करतो, असं ते म्हणाले.

राऊत पे रोलवर

अनेकजण बाळासाहेबांच्या विचारासाठी मंत्रीपद सोडून आलेच होते ना? तसे हे खासदारही येतील. ठाण्यासारख्या ठिकाणी मला साडे सात लाख मते मिळाली. मतदार आमच्यासोबत आहे. संजय राऊत गेली दोन वर्ष सरकार पडणार म्हणत होते. ते सकाळी उठतात तेव्हा त्यांना शरद पवार यांचा फोन येतो. त्यानंतर ते शिंदे आणि फडणवीस यांच्यावर टीका करतात. राऊत पे रोलवर आहेत. त्यांना चांगल्या मानसोपचार तज्ज्ञाची गरज आहे, अशी टीका नरेश म्हस्के यांनी केली.