राष्ट्रीय समाज पक्षाचे प्रमुख महादेव जानकर यांनी आज परभणी लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी अर्ज दाखल केला. महायुतीकडून महादेव जानकर यांना परभणीची जागा देण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा बंगल्यावर गेल्या आठवड्यात पार पडलेल्या बैठकीत याबाबत निर्णय झाला होता. त्यावेळी महादेव जानकर यांनी आपण महायुतीसोबतच असून आपल्याला एक जागा देण्यात आल्याचं म्हटलं होतं. जानकरांनी त्यावेळी फार बोलणं टाळलं होतं. पण त्यांनी आज परभणी मतदारसंघासाठी अर्ज भरल्यानंतर परभणीत महायुतीकडून भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, भाजप नेत्या पंकजा मुंडे आणि आणखी काही महत्त्वाचे नेते उपस्थित होते. या कार्यक्रमात महादेन जानकर यांनी आपली सविस्तर भूमिका मांडली.
“विमानतळ आणण्याची सोय करु, रेल्वेसाठी प्रयत्न करु. हा जिल्हा समृद्धी महामार्गाला जोडण्याची मी विनंती करेन. परभणी जिल्ह्यातील लोकं मुंबई, पुणे इथे जातात. मी या नेत्यांना विनंती करेन की आम्हाला एमआयडीसी द्या. विकासाची गंगा आणण्यासाठी प्रयत्न करेन. माझं कुठेही कॉलेज, शाळा काही भानगड नाही. लग्न लफडं नाही. काही नाही. काळजी करु नका. आपला देह हा तुमच्यासाठी आहे”, असं महादेव जानकर म्हणाले.
“लोणीकर साहेब, काळजी करु नका. माझ्यानंतर तुमच्या पोराला संधी मिळेल. राजेश विटेकरला मिळेल, मेघना दिदी तुला मिळेल. मी त्यावेळेस मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विनंती करेन की, मला युपीत टाका. मी उत्तर प्रदेशातून निवडणूक लढेन. माझी विनंती आहे. मला तुम्ही दत्तक घेतलं आहे. त्या दत्तकचं चांगलं पारणं फेडेन. या नेत्यांनी माझ्यावर विश्वास ठेवून मला जागा दिली. राष्ट्रवादीच्या उमेदवारासाठी महादेव जानकर बारामतीला येणार आहे. प्रत्येक मतदारसंघात हेलिकॉप्टर उतरवणार आहे. राष्ट्रवादीच्या कोट्यातली ही जागा मिळाली”, अशी भूमिका महादेव जानकर यांनी मांडली.
“मला दोन-तीन महिन्यांपूर्वी देवेंद्र फडणवीस म्हणाले होते की, ती जागा आपण असं करु तसं करु, त्यांनी जागा दिली त्यामळे आम्हाला ही जागा मिळाली. भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंतर आम्हाला संधी दिली, मानसन्मान दिला, त्याबद्दल मी तुमच्या तिघांचं हृदयातून अभिनंदन करतो. मला दिल्लीला जाण्यासाठी तुम्ही आशीर्वाद देताय अशी आशा करतो”, असं महादेव जानकर म्हणाले.