आतली बातमी, शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्यात बैठका होऊनही तिढा सुटता सुटेना, 5 जागांवर तिढा कायम

| Updated on: Mar 22, 2024 | 9:35 PM

महायुतीचा जागावाटपाचा तिढा काही केल्या सुटताना दिसत नाही. विशेष म्हणजे आता लोकसभा निवडणूक जाहीर होऊन एक आठवड्याचा वेळ होत आला आहे. मतदानाचा पहिला टप्पा अवघ्या एक महिन्यावर येऊन ठेपला आहे. पण महायुतीचे उमेदवार काही केल्या निश्चित होताना दिसत नाहीय. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीत अजूनही 5 जागांवर तिढा आहे. त्यामुळे जागावाटप निश्चित होत नाहीय.

आतली बातमी, शिंदे-फडणवीस-अजित पवार यांच्यात बैठका होऊनही तिढा सुटता सुटेना, 5 जागांवर तिढा कायम
महायुती
Follow us on

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदान अवघ्या महिन्यावर येऊन ठेपलं आहे. पण अजूनही महायुतीच्या जागावाटपाचा तिढा अद्याप सुटताना दिसत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुतीत अजूनही 5 जागांवर तिढा काय आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वर्षा या शासकीय निवासस्थानी काल रात्री मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये बैठक झाली. अंतिम तोडगा काढण्यासाठी जवळपास 2 तास मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री बसले. पण 5 जागांवरील तोडगा काही निघालेला नाही. तर 2 जागांवर अंतर्गतच संघर्ष आहे.

अमरावती, वाशिम-यवतमाळ, रामटेक, सातारा, छत्रपती संभाजीनगर या 5 जागांवरचा तिढा अजूनही सुटलेला नाही. तर माढ्यात भाजपनं पुन्हा रणजीतसिंह नाईक निंबाळकरांना उमेदवारी दिल्यावरही मोहितेंसह अजित पवार गटाचे नेते रामराजे निंबाळकरांनीही उमेदवार बदला म्हणत उघड विरोध केला आणि बारामतीत, अजित पवारांना शिवतारेंनी आव्हान दिलं असून भाजपकडूनही लढण्यास तयार असल्याचं म्हटलंय.

महायुतीच्या 5 जागांवर नेमका तिढा काय हे आपण सविस्तर जाणून घेऊयात.

महायुतीत तिढा, अमरावती

अमरावतीत भाजपचाच उमेदवार असेल हे देवेंद्र फडणवीसांनी स्पष्ट केलं. भाजपकडून खासदार नवनीत राणा इच्छुक आहेत. तर, शिंदेंच्या शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ दावा सोडण्यास तयार नाही. म्हणजेच इथं भाजप विरुद्ध शिंदेंच्या शिवसेनेत तिकीटासाठी सामना आहे.

महायुतीत तिढा, वाशिम-यवतमाळ

वाशिम-यवतमाळमध्ये शिंदेंच्या शिवसेनेच्या विद्यमान खासदार भावना गवळी पुन्हा तिकिटासाठी आग्रही आहेत. मात्र सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सर्व्हेत गवळींविरोधात मतदारांची नाराजी असल्याचं समजतंय. त्यामुळे एक तर शिंदेंचेच मंत्री संजय राठोडांना उमेदवारी द्या किंवा भाजप सीट लढवेल असं भाजपनं सांगितल्याचं कळतंय. त्याचपार्श्वभूमीवर संजय राठोडांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची सागर बंगल्यावर भेटही घेतलीय.

रामटेक

रामटेकची जागा सध्या शिंदेंच्या शिवसेनेकडे असून कृपाल तुमाने खासदार आहेत. मात्र रामटेकच्या जागेवर भाजपनंही दावा केलाय. रामटेकमधून काँग्रेसच्या राजू पारवेंना तिकीट देण्याची रणनीती भाजपची आहे. त्यासाठी पारवे फडणवीसांनाही भेटले. मात्र पारवेंना धनुष्यबाणावर लढवण्यासाठी शिंदेंची शिवसेनाही आग्रही आहे.

सातारा

सातारा लोकसभेत आमचाच उमेदवार असेल अशी घोषणा अजित पवारांनी केलीय. मात्र साताऱ्यातून भाजपचे उदयनराजे इच्छुक आहेत. त्यासाठी उदयनराजे दिल्लीत 2 दिवसांपासून ठाण मांडून बसलेत.

छत्रपती संभाजीनगर

छत्रपती संभाजीनगरच्या जागेवर शिंदेंची शिवसेना आणि भाजप दोघांचाही दावा आहे. शिंदे गटाकडून मंत्री संदीपान भुमरेंच्या नावाची चर्चा आहे. तर भाजपकडून भागवत कराडांचं नाव आघाडीवर आहे. काही दिवसांआधीच केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांनी संभाजीनगरमधून दिल्लीत मोदींसाठी कमळ जाणार असं सांगून भाजपचाच उमेदवार असेल असे संकेत दिले होते.

महाविकास आघाडीचा विचार केल्यास, सांगली, भिवंडी आणि दक्षिण मध्य मुंबईतला तिढा सुटलेला नाही. याबाबतचा नेमका तिढा काय आहे? हे देखील आपण जाणून घेऊयात.

मविआतला तिढा, सांगली

सांगली लोकसभा मतदारसंघावरुन काँग्रेस-ठाकरे गट आमनेसामने आलाय. सांगलीत उद्धव ठाकरेंनी प्रचारसभेतच चंद्रहार पाटील यांची उमेदवारी जाहीर केली. मात्र ही जागा आमचीच असून आणि बैठकीत अंतिम तोडगा निघालेला नसताना उद्धव ठाकरेंनी उमेदवारी जाहीर कशी केली, असं वागणं प्रॉब्लेमेटिक असल्याचं काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणालेत.

मविआतला तिढा, भिवंडी

2019 मध्ये भिवंडीची जागा आघाडीत काँग्रेसनं लढली होती. आता काँग्रेसकडून जिल्हाध्यक्ष दयानंद चोरघे यांचं नाव आघाडीवर आहे. मात्र शरद पवारांच्या राष्ट्रवादीनंही या जागेवर दावा केला असून बाळ्या मामा म्हात्रे इच्छुक आहेत.

मविआतला तिढा, दक्षिण मध्य मुंबई

दक्षिण मध्य मुंबईच्या जागेसाठी गुरुवारी शरद पवारांच्या घरी झालेल्या बैठकीत खडाजंगी झाल्याची माहिती आहे. दक्षिण मध्य मुंबईची जागा सोडण्यास उद्धव ठाकरे तयार नाहीत. दक्षिण मध्य मुंबईसाठी ठाकरे गटाकडून अनिल देसाईचं नाव जवळपास निश्चित आहे. तर काँग्रेसनं ही जागा वर्षा गायकवाडांसाठी मागितलीय.

पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवातही झालीय. मात्र महायुती असो, महाविकास आघाडी अद्याप अंतिम फॉर्म्युला किंवा जागा वाटप झालेलं नाही.